सर्वधर्मसमभाव असलेले आध्यात्मिक व्यक्तिमत्व : परम श्रद्धेय डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज

आज दिनांक १४ जून २०२१ रोजी गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथील मठाधिपती परम श्रद्धेय डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.

भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे.इथे अनेक धर्म, पंथ, सांप्रदाय जन्माला आले,वाढले व आज ते सर्वच गुण्यागोविंदाने राहताना दिसतात म्हणूनच या देशाबद्दल एक हिंदी कवी म्हणाला ‘ सारे जहांसे अच्छा हिंदोस्तां हमारा ‘ असे ही म्हटले जाते की ‘ हिंदू मुस्लिम सिख ईसाई l हम सब हैं भाई भाई ll असीच परंपरा आपली राहिलेली आहे. असी परंपरा तेंव्हाच टिकून राहते जेंव्हा धर्माच्या अग्रभागी काम करणारे धर्मगुरू हे सर्वधर्म समभावाची दृष्टी ठेवून वागतात. ज्यांच्याकडे केवळ माझाच धर्म श्रेष्ठ आहे असी भावना असते आणि जे इतर धर्माचा तीरस्कार करतात तिथे वाद विवाद निर्माण होतो. तीथे उच नीचतेची भावना जन्माला येते.त्यातून भेदाभेदांचा जन्म होतो. बऱ्याच ठिकाणी असे कट्टर धर्माभिमान व इतर धर्माची नींदा करणारे लोकही आपणास पाहावयास मिळतात पण आम्हा मोहनावतीकरांचे भाग्य आहे की गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती परम श्रद्धेय डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज हे सर्वधर्मसमभाव ठेवून कार्य करणारे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहे.
श्री.ष.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचा जन्म १४ जून १९८५ रोजी कर्नाटक राज्यात खानापुर ता.आळंद जी.गुलबर्गा येथे माता सरूबाई व पिता मल्लया यांच्या पोटी झाला. वडील हे अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे घरात सतत धार्मिक वातावरण राहत आले आहे.आई ही मुळात महाराष्ट्रातल्या सोलापूरची. त्यामुळे तिच्यातही महाराष्ट्रीयन संतांची परंपरा आलेलीच होती.या माता-पित्याच्या संस्कारात ते वाढत राहिले.त्यांना दोन बहिणी एक भाऊ आहे.दुर्दैवाने काही महीन्यापुर्वीच भावाचे दुःखद निधन झाले. प्राथमिक शिक्षण मूळगावी तर पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण आपल्या बहिणीच्या घरी राहून केले. पाचवी ते बारावी पर्यंततचे शिक्षण आपल्या तालुक्याच्या गावी केले नंतर पदवीचे शिक्षण म्हैसूर येथील जे.एस.एस.गुरुकुल सुत्तुरमठ येथून तर एम.ए. तत्वज्ञान या विषयात केले नंतर त्यांनी ‘ अल्लम प्रभुदेव यांचे तात्त्विक चिंतन विश्लेषणात्मक अध्ययन ‘या विषयावर विद्यावाचस्पती (पी-एच.डी.)ही पदवी प्राप्त झाली. विद्यावाचस्पती (पी-एच.डी.)चे संशोधन मार्गदर्शक हे म्हैसूर येथील मानस गंगोत्री विद्यापीठातील प्रोफे. डॉ. रामचंद्र हे होते.

ते नेहमी सांगतात की मी सुद्धा अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे.माझी आई ही दहावीपर्यंत शिकलेली असल्यामुळे तिला शिक्षणाचे महत्त्व कळाले होते.तिचा सतत आग्रह असायचा की मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे तर वडील हे गौडगाव येथील डॉ. शिवाचार्य रत्न जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या कृपाशीर्वादाने आध्यात्मिक कार्य करीत असल्यामुळे त्यांच्याकडून तो वारसा मला मिळाला. अध्यात्मातून मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे हे लक्षात घेऊन मी ही यात समरस झालो.माझ्या घरात मागच्या चाळीस वर्षापासून अनेक धार्मिक कार्यक्रम चाललेले असतात. त्या निमित्ताने अन्नदान केलेले मी सतत पाहिले आहे त्यात मी सहभाग ही नोंदवला आहे असे ही ते सांगतात.


२४ फेब्रुवारी २००८ ला महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती झाले.यापूर्वी अनेक सिध्द पुरुषांनी ही गादी सांभाळली आहे.या मठाला मागील एक हजार वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा लाभलेली असून वीरशैव धर्मातील पंचपीठांपैकी उज्जेयनी शाखेसी हा मठ संलग्नीत आहे.या पूर्वी लिंगैक्य श्री.ष.ब्र.१०८ सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज येथे कार्यरत होते.
महाराजांनी २००८ पासून या मठाला वैभव प्राप्त करुन दिले आहे. मठा मार्फत केवळ धार्मिक कार्यक्रमाचेच आयोजन न करता अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत. ज्यात दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन, सार्वजनिक वाचनालय उभारून वाचन संस्कृतीला गती देणे,मुखेड येथील शैव बांधवांसाठी शिवयोग मंगल कार्यालयाची उभारणी, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था, कॉपीमुक्तीसाठी पुढाकार घेऊन प्रबोधन, गुणवंत विद्यार्थी व गुणीजन कार्यक्रमात सहभाग, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन ,स्त्रीभ्रूणहत्या बंदीसाठी प्रबोधन,महात्मा फुले महाविद्यालय मुखेड येथे संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिकासाठी आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य ते सतत करत असतात. डॉ.विरुपाक्ष महाराज हे मुखेड वासियांकरीता आदरस्थानी आहेत.सर्वच राजकीय पक्ष असोत की अन्य व्यक्तीं असोत सर्वचजण त्यांचा आशीर्वाद घेतात.
मुळात त्यांचा उद्देश या धर्म प्रचार करणे हा असतोच. त्यासाठी त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रम ही पार पाडतात. धार्मिक व सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या दोन ऑडिओ सीडी मठातर्फे काढल्या आहेत.ज्यात ‘धावत या हो गुरुराया ‘गुरु विना नाही दुजा आधार ‘याचा समावेश आहे.मठात व परिसरात अखंड शिवनाम सप्ताहांचे आयोजन,वीरशैव समाजातील लहान मुलांसाठी रुद्र प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, शिवदिक्षा कार्यक्रम, लक्ष दीपोत्सव,शिवकथा निरूपण,शिव बाल कीर्तनकार व प्रवचनकार घडविणे, मठाच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेऊन त्याचा कृती आराखडा तयार करून त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करणे, गोशाळेसाठी मदत असे विविध धार्मिक कार्य ते करत आहेत.


त्यांच्या या सर्व कार्यात सत्संग हा अध्यात्मिक कार्यक्रम ही अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना या राज्यात अनेक गावात सत्संगाचे आयोजन करून त्यात ते मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्या सत्संग कार्यक्रमास ‘मानवधर्म की जय हो ‘हे नाव दिले आहे. यावरून त्यांची विशाल दृष्टी दिसून येते. आज जगात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत व जग अशांत जीवन जगत आहे. याला जर खर्‍या अर्थाने सुखमय व शांततापूर्ण जीवन बनवायचे असेल तर ते सत्संगानेच घडणार आहे आहे. तेंव्हा सत्संगाची कास धरा, मानवांनी जाती,पंथ, सांप्रदाय याच्या पलीकडे जाऊन मानव धर्माला महत्त्व दिले पाहिजे. एवढेच नाही तर प्राण्यांची हत्या करू नका. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.त्यासाठी पशूवर देखील प्रेम करा. पती-पत्नीने घरात सौख्य राखण्यासाठी संयम ठेवावा, पुरुषांनी व्यसनापासून दूर रहावे,आपल्या मुला-मुलींना शिकवा,शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो, त्याला यातून त्याच्या उणिवा व सामर्थ्य समझते.मुलांवर योग्य संस्कार करा.भुकेलेल्यांना अन्न द्या,तहाणलेल्या पाणी द्या, गरजवंतांना मदत करा असे कितीतरी समाज प्रबोधनाचे विचार त्यांच्या सत्संगातून ते मांडताना दिसतात. मी स्वतः त्यांच्या बऱ्याच सत्संग कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.त्यांचा आशिर्वाद माझ्या वडीलांना लाभला होता.वडील मुखेडला आले की गुरुमाऊलींना भेटायला जायचे.मागील दोन वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले तर गूरुमाऊली वडीलांच्या तेरवीसाठी ८०किमी वरुन माझ्या गावी येवुन उपस्थित राहीले होते.त्यांच्या उपस्थितीने आम्हा परिवाराचे मन भरुन आले.
मानवतावादी विचार मंचाच्या माध्यमातून समविचारी व्यक्तींना सोबत घेऊन ज्यात शिवकुमार बंडे सारखे तरूण उत्साही समाजाविषयी तळमळ असणारे व्यक्ती व बालाजी लींगनवाड,मुख्या.संग्राम मस्कले सरांसारखे व अन्य अनेक ज्येष्ठ व्यक्ती सोबत घेत अस्या सर्वांची एकत्र मोट बांधून त्यांनी मुखेड,कंधार, देगलूर तालुक्यातल्या अनेक गावात स्वतः स्वखर्चाने उपस्थित राहून समाजप्रबोधन घडवण्याचे कृतिशील खूप मोठे काम केले आहे. या मंचाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार समाजातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत घडवून आणला आहे. अशा महान व्यक्तींची प्रबोधनपर मार्गदर्शन ही वेळोवेळी ठेवण्यात आले आहेत.त्याचबरोबर एका वृद्धाश्रमाची उभारणी देखील त्यांच्या सहकार्यातून होताना दिसते आहे.


मुखेड नगरीच्या वैभवात महाराजांच्या रूपाने भर पडली आहे.कुठल्या ही शहरात केवळ रस्ते,पाणी, वीज व उंच उंच इमारती किंवा अन्य भौतिक सुविधा असल्यामुळे ते शहर वैभवाचे ठरत नसते तर त्या गावात चारित्र्यवान विचारवंत,साहित्यिक, जनकल्याणाचा कळवळा असणारे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते किती राहतात व ते समाजाच्या विकासासाठी कसे प्रयत्न करतात यावर त्या त्या शहराचे व गावाचे वैभव अवलंबून असते. अनेक गावे तेथे राहणाऱ्या माणसावरून ओळखले जातात. आज आळंदी संत ज्ञानेश्वरांमुळे,देहू संत तुकारामांमुळे,पैठण संत एकनाथांमुळे ओळखले जाते.तसेच महाराजांची कार्याची दिशा असीच राहिली तर मुखेड हे शहर देखील महाराजांच्या व गणाचार्य मठ संस्थानाच्या नावाने ओळखले जाईल. ते भविष्यात नक्की घडेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. शिवशंभो त्यांना उत्तरोत्तर हे कार्य करण्यासाठी आयू व आरोग्य देवो. त्यांच्यातील सर्वधर्मसमभाव असाच वृद्धिंगत होत जावो. एवढीच प्रार्थना करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन माझा शब्दप्रपंच थांबवतो.

          प्रा. डॉ. रामकृष्ण बदने 
 ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर,
         ता. मुखेड जि. नांदेड
    भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *