कंधार ; प्रतिनिधी
मार्च 2020 पासून गेले चौदा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील जवळ एक लाख खाजगी कोचिंग क्लासेस संपूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे क्लाससंचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाची समस्या उभी राहिली आहे. क्लासेस बंद असल्यामुळे त्यावर आधारित इतर सेवा पुरवणारे देखील आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. प्रदीर्घ लॉकडाउनमुळे क्लास संचालक क्लासेसचे भाडे, नोकर वर्गाचा पगार दैनंदिन खर्च, लाईट बिल, पाणी बिल यांचे प्रचंड आर्थिक ओझे यामुळे पुरता खचला आहे. तसेच काही क्लास संचालक आपले निवासी भाडे तसेच कर्जाचे हप्ते देता येवू न शकल्याने प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहेत.
शासनाने कोणतेही पॅकेज अद्याप पर्यंत दिलेले नाही. ब-याच क्लास चालकांना भाड्याची जागा सोडावी लागली आहे. काहींनी बेंचेस व इतर फर्निचर विकून उदरनिर्वाह केला आहे. विद्यार्थ्यांना ताठ मानेने जगायला शिकवणा-या क्लासचालकाला आपले दुखः व्यक्तही करता येत नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील विविध क्लास संचालक संघटनामार्फत यापूर्वी लोकप्रतिनिधीना प्रत्यक्ष भेटून, चर्चा करून, आपल्या अडचणी सांगून तसेच निवेदन देण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु शासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक हालचाल सुरु झाली असल्याचे दिसून आलेले नाही यामुळे सर्वच क्लास संचालक संघटनांचा संयम सुटत चालला आहे.
गेल्या चौदा महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झालेले आहे ते कोणतही शाळा किंवा महाविद्यालय भरुन काढू शकणार नाही फक्त क्लासच्या माध्यमातूनच भरुन काढणे शक्य आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. शाळा तसेच महाविद्यालये जरी त्यांच्यापरीने ऑनलाइनव्दारे ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असेल तरी ऑफलाइनप्रमाणे ते प्रभावी व रताना दिसून आलेले नाही व म्हणूनच ऑनलाइन शिक्षण पध्दती तितकीशी प्रभावी नसल्यामुळे त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
शासन जरी ऑनलाइन शिक्षण पध्दतीला प्रोत्साहन देत असले तरी गरीब तसेच ग्रामीण भागातील विदयार्थी ज्यांना स्मार्ट फोन घेणे परवडत नाही अथवा त्यांकडे इंटरनेट कनेक्टीविटीची समस्या असल्यामुळे या ऑनलाइन शिक्षणापासून आजही वंचित राहिले आहेत व या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे त्याच्यात शैक्षणिक दरी निर्माण होवुन एक प्रकारची न्युनगंडाची भावना निर्माण होउ लागली आहे. ऑनलाइन शिक्षणाचा वापर पूरक शिक्षणपध्दती म्हणून करायला हरकत नाही परंतु ऑनलाईन शिक्षण हे प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय म्हणून कायमची व्यवस्था होउ शकत नाही.मोबाईल च्या छोटया स्कीनवर तासान तास पाहून डोकं दुखायला लागणे, तसेच मान व पाठ दुखायला लागणे, डोळ्यातून पाणी येणें तसेच आरोग्यविषयक इतर समस्या सुरु झाल्या आहेत. कोचिंग क्लास संचालक संघटनेच्या कृती समितीतर्फे अलीकडेच झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मार्गदर्शक नियमांसह (जसे मास्क, दोन विद्यार्थ्यामध्ये अंतर व स्वच्छता, पालकांचे संमती पत्र वगैरेचे) पालन करुन लासेस सुरु करण्याची क्लास संचालकांनी तयारी सुरु केली आहे.
विद्यार्थी आमचेकडे शिकायला तयार आहेत, पालक क्लास घ्या म्हणून मागे लागले आहेत. क्लास संचालकांकडे विद्यार्थी स्वेच्छेने येतात तसेच पालक आपल्या पाल्याची जेवढी काळजी घेतो तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त क्लासचालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतच असतो. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हायब्रीड मॉडेलव्दारे काही विषय ऑनलाइन तसेच काही विषय ऑफलाइन पध्दतीने कसे शिकवले जाउ शकतील याचाही विचार या सभेत करण्यात
आला. शिकवणी वर्ग हा स्वतंत्र व्यवसाय आहे. शाळा व महाविद्यालयाच्या बरोबर त्यांना जोडणे योग्य होणार नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी शाळा व महाविद्यालये करीत नाहीत तर ती तयारी आजमितीला फक्त खाजगी शिकवणी वर्गाच करीत असतात हे सर्वज्ञात आहे. वरील सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे सर्व नियम पाळून आदर्श S.O.P. नुसार 21 जून 2021 पासून आम्ही महाराष्ट्रातील सर्व क्लासेस सुरु करीत आहोत, त्यास शासनाने सहकार्य करावे अशी आमची कळकळीची नम्र विनंती.
यावेळी प्रा. संभाजी मुंडे सर,श्री लक्ष्मण विभुते सर,प्रा. विठ्ठल राजुकरकर सर, प्रा. ज्ञानेश्वर लोंढे सर, श्री संतोष कुरूंदे सर ,अदित्य गव्हाणे सर ,श्री भास्कर घुमे सर, श्री नितीन जोंधळे सर,श्री पवन तुतरवाड सर, श्री सागर मंगनाळे,(विध्यार्थी प्रतिनिधी), वेंकटेश पेठकर(विध्यार्थी प्रतिनिधी) श्री सोपान मुंडे सर, श्री शिवा डांगे सर, श्री दिलीप बसवंदे सर उपस्तिथ होते.
या निवेदनाच्या प्रती
उपविभागीय अधिकारी , उपविभाग कार्यालय कंधार!
तहसिलदार , तहसिल कार्यालय कंधार , मुख्याधिकारी , नगर परिषद कंधार यांना देण्यात आल्या .