नेमा न टळे निर्धारी : श्रध्देय वै.बालाजी नारायणराव दराडे

( दि.१७ जून २०२१ रोजी परम श्रध्देय वै.बालाजी नारायणराव दराडे यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम त्या निमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा शब्दप्रकाश.)

मानव म्हणून आपल्या संस्कृतीने आपणास काही नियम घालून दिले आहेत. त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाने आचरणाचे काटेकोर नियम घातले आहेत.

सांप्रदायाचा पाईक म्हणून आपण त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जसे गळ्यात तुळशीची माळ असावी, माथी गोपीचंदन टिळा असावा, मद्य व मांसाहाराचे सेवन करू नये,वर्षातून कमीत कमी आषाढी-कार्तिकीच्या दोन वार्‍या कराव्यात, नीराहार एकादशीचे व्रत्त करावे,नीत्यनेमाने हरिपाठ करावा, असत्य बोलू नये व अन्य काही नियम त्यात येतात. हे नियम जी माणसे पाळतात तीच खरी निष्ठावान वारकरी समजावेत.

अलीकडच्या या धकाधकीच्या जीवनात सगळेच नियम तंतोतंत पाळले जातीलच असे नाही पण परम श्रद्धेय वै.बालाजी नारायणराव दराडे यांनी मात्र आयुष्यभर हे नियम तंतोतंत पाळले.’नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ’किंवा नेमा न टळे निर्धारी ‘ या संत उक्तीप्रमाणे त्यांच्या जीवनात त्यांनी नेमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले.


त्यांचा जन्म ०३ एप्रील १९५६ रोजी माता सरस्वतीबाई व पीता नारायणराव यांच्या पोटी कोरडवाहू शेतकरी कुटुंबात मौजे हिंगणगाव ता.अहमदपुर जि.लातूर या गावी झाला.चार बहिणी व तीन भावंड असा त्यांचा परिवार वडील लहानपणीच वारलेले कुटुंबाची सर्व जबाबदारी कमी वयातच त्यांच्यावरती पडली .अशाही परिस्थितीत त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. सर्व बहिणींचे विवाह चांगल्या घरांमध्ये करुन दिले. गावचे श्रध्दास्थान परम श्रद्धेय वै. ह.भ.प.अंबाजी महाराज त्यांच्या काळात गावात सतत भजन चालत असायचे त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला.तो वसा आणि वारसा त्यांच्या नंतर तसाच पुढे घेऊन जाण्याचे काम बालाजी रावांनी केले.नित्यनेमाने मागील चाळीस वर्षांपासून ते पंचपदीचे भजन करत आले जसे धूप आरती,काकडा भजन, विविध गावात सप्ताहात जागराचे भजन. एकादशीचे भजन ते नेहमीच करत असत. त्यांचे सर्वच महाराजांसी अत्यंत स्नेहाचे नाते होते. संत साहित्याचे त्यांना विपुल पाठांतर होते. संतांची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटत असे. मी जेंव्हा जेंव्हा हिंगणगाव म्हणजे त्यांच्या गावी प्रवचनाला गेलो असेल या अन्य कामानिमित्त गेलो असेल ते आग्रहाने घरी बोलावून पाहुणचार करायचे. ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना त्यांनी आपल्या आयुष्यात उतरवीली होती. त्यांचा स्वभाव अत्यंत खिलाडू वृत्तीचा होता. विनोदबुद्धी त्यांच्याकडे त्यांची आई कै.सरस्वतीबाई व मामा कै.भगवानराव घुले यांच्याकडून आली होती. ते प्रत्येक माणसासी विनोदबुद्धीने संवाद साधत असत. मनाने निर्मळ वाचेचा रसाळ असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.कित्येक महाराजांच्या कीर्तनात ते प्रमाण व ओव्या सांगत असत. कित्येक वेळा ते कीर्तनात प्रमाण उचलत असत. परमार्थाचा कंटाळा त्यांना कधी आलाच नाही. जवळपासच्या गावी जरी कीर्तन आहे असे समजले की विना निमंत्रण रात्रीला अंधाराची तमा न बाळगता कार्यक्रमाला उपस्थित राहायचे.असेच एखदा हरीजागरासाठी रायवाडी येथे अॅटोने जात असता अॅटो उलटुन पाय मोडला. पुन्हा एकदा असाच अपघात झाला या दोन्ही जीवघेण्या अपघातातून ही ते वाचले.यामुळे घरी बसण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तुकाराम गाथा मुखोद्गत करण्यासाठी वेळ दिला व गाथा याचे स्वहस्ताक्षरात लिखाण ही केले.संकटाचे संधीत रुपांतर करण्याचा त्यांचा स्वभाव होता. नंतर ही त्यांनी परमार्थ सेवा सोडली नाही.त्यांना काही दिवसांपूर्वी शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागले पण त्यातून ही ते बरे होत होते.


कुटुंबवत्सलता हा ही त्यांचा महत्वपूर्ण गुण होता.सासरवाडी गावातीलच,मामा मंडळी गावातच,मुलां मुलींचे सोयरपण ही गावाजवळच यामुळे या सर्व नात्यांसी ते अत्यंत संयमाने वागत असत.सर्व पाहुण्यांसी स्नेहभाव जपत.त्यांना दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार. त्यांनी आपल्या स्वआचणातून आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले. मुले शिकली पाहिजेत त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत हा त्यांचा सततचा आग्रह असायचा.

मुलांना कोरडवाहु शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नातून शिकवले.’ काकरी विका पण लेकर शिकवा,लेकर घडवा’ हा संत गाडगेबाबांचा संदेश घेवुन त्यांनी दोन मुल व एका मुलीला शिकवले. आणि म्हणूनच आज त्यांची दोन्ही मुलं शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.मोठा मुलगा ज्ञानेश्वर हा शिक्षक म्हणुन तर छोटा मुलगा जनार्धन हा प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. एक मुलगी चंद्रकला हीला ही उच्चशिक्षित बनवले आहे. मुलांचा स्वभाव ही अत्यंत नम्र आहे अत्यंत आदरातिथ्य करणारी मुले आहेत.मुलांमुलींना सोयरपण पाहताना त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा असणारे पाहिले आहेत. आयुष्यात सांप्रदायाला साजेसे त्यांनी वर्तन केले आहे मद्य आणि मांस त्यांच्या स्वप्नातही कधी आले नाही. आणि हीच परंपरा त्यांची पुढची पीढी ही चालवताना दिसते आहे. आम्ही त्यांचे मावसभाऊ असल्यामुळे त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. मुलेही मातृ पितृभक्ती अत्यंत तन्मयतेने करताना पाहिले आहेत.त्यांच्या अर्धांगिनी लोचनाताईची त्यांना सतत साथ राहिली आहे.त्यांनी अनेक महाराज मंडळींना,गायक गुणी मंडळींना घरी आल्यावर भोजन या अन्य त्यांचा पाहुणचार करण्यासाठी नाक डोळे मोडले नाहीत.कधी कंटाळा केला नाही.याचा अनुभव मी अनेकवेळेस घेतला आहे. त्या प्रत्येक आलेल्या व्यक्तिचे त्यांनी अत्यंत मनातून आदरातिथ्य करतात.
त्यांचे आपल्या शेतीवर ही प्रेम होते.पण त्यांनी शिक्षणाला अधिकचे महत्व दिले.आपण भले आपली शेती भली व उरलेल्या वेळात नामस्मरण भले म्हणजेच शिक्षण,शेती व नामस्मरण या त्रीसूत्रीतच त्यांनी आपले जीवन बांधून घेतलेले होते. राजकारणाची म्हणावी तशी आवड त्यांना नव्हती पण एकदा त्यांनी हिंगणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले आहे.वारकरी संप्रदायातील माणसावर ते जिवापाड प्रेम करायचे. त्यांचे खरे गणगोत अध्यात्मिक क्षेत्रातील माणसेच होती.संत म्हणाल्याप्रमाणे ‘माझीये जातीचे मज भेटो कोण्ही ‘याची आवड होती. त्यांना आमच्या परिवाराचा विशेष अभिमान वाटायचा. माझ्या गावी मौजे देवकरा ता.अहमदपुरला आले की मुद्दाम भेटायला आमच्या घरी यायचे. आमच्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहायचे.आम्ही जेंव्हा आमच्या आई-वडिलांची ज्ञानेश्वरी ग्रंथाने ग्रंथतुला केली तेंव्हा ते आवर्जून उपस्थित राहिले होते व ग्रंथ तुलेचे दृश्य पाहून त्यांना आनंदाश्रू आवरता आले नव्हते. जिथे जिथे चांगुलपणा आहे तीथे तीथे ते उपस्थित राहत. चांगल्याला प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती होती. गावातील तरुण मंडळी ही भजना कडे यावी, त्यांनी गायन शिकावे,पाठांतर करावे यासाठी ते सतत तळमळ करत असायचे
.

परम श्रध्देय वै.विठ्ठल प्रसाद महाराज धर्मापुरीकर यांच्या काळापासून पंचक्रोशीत कुठेही चातुर्मास असेल तर त्यांच्या कार्यक्रमासाठी देखील ते उपस्थित राहायचे.त्यांच्या भजन आनंदा बद्दल त्यांना अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील महाराजांनी शब्दांनी गौरविले होते. आपले गुरुवर्य परमश्रध्देय वै.तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या वाशी या गावी व परमश्रध्देय गुरुवर्य वै. मोतीराम महाराज यांच्या फळा या समाधी गावी ते दरवर्षी भजनाच्या निमित्ताने जात असत.
असे हे अध्यात्मावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व अचानकपणे आपल्याला सोडून ०४ जून २०२१ रोजी गेले. खरं तर कुठल्याही गावाचे वैभव त्या गावात किती उंच आणि मोठ्या इमारती आहेत यापेक्षा त्या गावात संस्कार करणारी माणसे किती आहेत यावरून त्या गावाचे मूल्य ठरत असते. हिंगणगावच्या अनेक ज्येष्ठांच्या तरुणांच्या वरती भजनाच्या माध्यमातून संस्कार करण्याचे काम त्यांना केले. धुपआरती व काकडा भजनातून संगीतमय वातावरणातून मनशांती देण्याचे काम बालाजीराव यांनी कित्येक वर्षे केले.त्यांच्या जाण्याने गावक-यांना या क्षेत्रातली खूप मोठी पोकळी भविष्यात पाहायला मिळेल. असी माणसे जाणे हे गावासाठी कधीच न भरून येणारी पोकळी असते. असे असले तरी त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आपण पुढे चालविण्याचा संकल्प करून त्यांना ख-या अर्थाने शब्दांजली वाहुया.

         प्रा. डॉ.रामकृष्ण बदने 
  ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर,
        ता.मुखेड जि.नांदेड.
    भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *