खरीप हंगाम २०२१ पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी महाडीबीटी महाआयटी ही संगणक प्रणाली कार्यान्वित केली असून कृषी विभागाच्या इतर सर्व योजनांसह यावर्षी बियाणे या घटकासाठी या प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. सदर योजनेअंतर्गत कंधार तालुक्यातील ४२७९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज विविध घटकांसाठी योजनेअंतर्गत विविध बियाण्यासाठी केलेले होते. प्राप्त अर्जाची ऑनलाइन सोडत होऊन निवड झालेल्या ११९१ शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात आले असून ऑनलाइन अर्ज केलेल्या जवळपास २८ टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
उत्कृष्ट नियोजन व समन्वयातून लाभार्थी शेतकऱ्यांना बियाण्याचा वेळेवर पुरवठा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव ,तंत्र अधिकारी वैभव लिंगे ,जिल्हा व्यवस्थापक महाबीज अशोक निकम यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनातून व समन्वयातून प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या बियाण्यांचा शेतकऱ्यांना वेळेवर पुरवठा झाला. प्राप्त बियाणेचे वितरण तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी मंडळ कृषी अधिकारी, विकास नारनाळीकर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी रमाकांत भुरे यांच्या सहकार्याने क्षेत्रीय कर्मचार्यांच्या मदतीने तातडीने पूर्ण केले.
पीक प्रात्यक्षिक अंतर्गत नवनवीन वाणांचा सहभाग
खरीप हंगामात विविध पीक प्रात्यक्षिके आयोजित केली असून या प्रात्यक्षिकात नवनवीन वाणांचा सहभाग आहे .सदरील पिकांचे वाण कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून पुढे आलेली असून बाजारातील जुन्या वाणांच्या तुलनेत या वाणांची गुणवत्ता,किड व रोग बाबतीत सहनशीलता, प्रतिकारक्षमता ,उत्पादकता अधिक चांगली असल्याने या वाणांची निवड प्रात्यक्षिकासाठी करण्यात आली आहे. जुन्या वाणांपेक्षा ही नवीन वाणे अनेक गुण वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट दर्जाची असून या वाणांची ओळख व्हावी, शेतकऱ्यांमध्ये प्रचार प्रसिद्धी व्हावी, परिसरातील इतर शेतकऱ्यांना माहिती व्हावी व नवनवीन वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा हा या योजनेमागील उद्देश आहे.
ऑनलाइन अर्जाची संख्या व ऑनलाइन लक्की ड्रॉ मध्ये बारूळ मंडळ अव्वल
बियाणे या घटकासाठी तालुक्यातील एकूण अर्जांची संख्या पाहता बारुळ मंडळातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्याखालोखाल पेठवडज तर कंधार मंडळातून सर्वात कमी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. बारूळ मंडळात या योजने अंतर्गत एकूण ५१५ लाभार्थ्यांची बियाणे घटकखाली निवड झाली असून ही संख्या सर्वाधिक आहे, त्याखालोखाल पेठवडज मंडळात ४७२ शेतकऱ्यांची तर कंधार मंडळ २०४ शेतकऱ्यांची या योजनेत लाभ घेण्यासाठी निवड झाली आहे.
असे मिळाले बियाणे
प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य या बाबीअंतर्गत एकूण २१६ शेतकऱ्यांना १०.४४ क्विं तर गळीत धान्य या बाबीअंतर्गत १६४ शेतकऱ्यांना १०४.४० क्विं बियाणेचे नियोजन आहे. तूर मिनीकीट प्रात्यक्षिक अंतर्गत प्रति मिनिकिट ४ किलो प्रमाणे एकूण १७५ लाभार्थ्यांना ७.०० क्विं. बियाणे वितरित करण्यात आले आहे. पौष्टिक तृणधान्य अंतर्गत ज्वार या पिकासाठी पीक प्रात्यक्षिका अंतर्गत एकूण ७५ शेतकऱ्यांची निवड झाली असून प्रति प्रात्यक्षिक ३ किलो प्रमाणे २.२५ क्विं. बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.संकरित कापूस आंतरपीक प्रात्यक्षिक अंतर्गत एनएचएच ४४ बीटी कॉटनचे ५० पाकिटे तर मुग बियाणे २ किलो प्रमाणे ५० किलो बियाणे २५ शेतकऱ्यांना वितरित केले आहे. सलग तूर प्रात्यक्षिक अंतर्गत प्रति प्रात्यक्षिके ६ किलो प्रमाणे एकूण १०० शेतकऱ्यांना ६.०० क्विं. बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीन अधिक तूर आंतरपीक प्रात्यक्षिक अंतर्गत एकूण ५० शेतकऱ्यांची निवड झाली असून या प्रात्यक्षिकात सोयाबीनचे १०.०० क्वि.तर तुरीचे १.०० क्विं. बियाणे प्राप्त झाले आहे. सोयाबीन पीक प्रात्यक्षिक अंतर्गत प्रति प्रात्यक्षिके ३० किलो प्रमाणे एकूण ३६१ शेतकऱ्यांची निवड झाली असून १०८.३० क्विं. बियाणे वितरित करण्यात आले आहे. उडीद नंतर रब्बी ज्वारी ह्या पिक पद्धतीच्या प्रात्यक्षिका अंतर्गत उडीद पिकाचे प्रति प्रात्यक्षिक ६ किलो प्रमाणे एकूण २५ शेतकऱ्यांना १.५० क्विं. बियाणे वितरित करण्यात आले आहे.
खरीप हंगामात विविध घटकांतर्गत शेतकऱ्यांना नवनवीन जातींचे बियाणे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात उडीद एकेयु १०-१, सोयाबीन एम एसयूएस १५८,एमएसयूएस १६२ ,डीएस २२८,मुग उत्कर्षा, ज्वारी एसपीएच १६५५ , तुरीचे पिकेव्ही तारा व बीडीएन ७१६ या अतिशय निवडक व नवीन वाणांचा समावेश आहे.या प्रात्यक्षिकाद्वारे तंत्रज्ञानाच्या माहितीचा प्रचार , प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन प्रक्रियेतून अर्ज मागवून योजना राबविली असून शेतकऱ्यांची निवड व बियाणे वितरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे.