मुंबई ;
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे.
चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून, या पत्रात त्यांनी सदरहू मार्गाची आवश्यकता व या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पिड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली असून, पुढील काळात मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूर मार्गे मुंबई ते हैद्राबाद अशा मार्गांचे नियोजन केले जाते आहे. परंतु, या नियोजनात मराठवाड्याला योग्य न्याय मिळालेला नाही. मुंबईहून हैद्राबादला जाण्यासाठी औरंगाबाद, नांदेड हा मार्गसुध्दा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा दुसरा मार्गही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने समृध्दी महामार्गाला जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्ग मंजूर केला असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीतून मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला जालना- नांदेडपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. हाच मार्ग पुढे नांदेडवरून हैद्राबादपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करता येईल. त्यामुळे मुंबई- हैद्राबाद प्रवासासाठी पुणे-सोलापूर मार्गे आणि औरंगाबाद-नांदेड मार्गे असे दोन पर्याय उपलब्ध होतील
या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा बुलेट ट्रेनचा मार्ग हाती घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा. तसेच या प्रस्तावात मुंबई- औरंगाबाद- नांदेड टप्प्यासाठी समृध्दी महामार्गातून जमीन उपलब्ध करुन देत आहोत, असेही नमूद करावे. जेणेकरून मुंबई- औरंगाबाद- नांदेड असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प तात्काळ मार्गी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.