(,रुमणपेच कथासंग्रह ; तांडा (सु.द.घाटे ..भाग १) http://yugsakshilive.in/?p=12598 युगसाक्षी)पुढे चालू…भाग-२
पर बाहेर गदारोळ उठला म्हणूनशान ती तिकडं धावली. तिच्या काळ्या कोंबडीचं ढवळं पिलू बहिरी ससाण्यानं सूर मारून नेलं व्हतं. ससान्याच्या घट्ट पकडीत चिवचिवणारं पिलू यल्ली दुखऱ्या काळजानं बघत व्हती.
दुपार टळतीला लागल्यावर झाडीतनं बा आला व्हता. डोस्क्यावरला फोकांचा भारा त्यानं यल्लीच्या पालाम्होरं दाणकन टाकला. तसं हरहुन्नरी तांड्याचं हास्तीनापूर गजबजलं. पालापालातल्या राजराण्या धावल्या, अन् त्यांच्यात फोका वाटून घेण्यापायी रोजचाच इरसाल कालवा दाटला. कोण कोणाच्या झिंज्या कवा धरून हासडील, काई नेम दिसत नव्हता. कपाळाला हात मारून दरवेशी बा गुमान आपल्या पालाकडं निघाला व्हता. माकड नाचवून पोराबाळांची करमणूक करायची बाचा धंदा. झबलं, टोपडं घालून लाल्या अन् भागी ही माकडमाकडीन बाच्या हुकुमावर नाचत्यात खोटी खोटी मारामारी करत्यात. संसारी ताणतणावाचा करीना बाच्या इशाऱ्यावर करून दाखवितात. मुकी बिचारी जनावरं नितळ काळजाची म्हणील तशी वागत्यात, पर या तांड्यातल्या बायका डोस्क नसल्यागत अडाणी बियाच्या, डोस्क्यात चूड पेटलेला बा मुकाट झपझप पावलं टाकीत पालात आला व्हता.
हिरमुसला बा पालात मह्याकडं बघून सुखावला. त्याच्या तोंडावर हसू फुटलं, “कवासीक आलीस बरी हाईस नव्हं.” जवळ येत बानं पुसलं. म्या बुडा पासून शेंड्यापरसोक समदं सांगितलं. मह्या सासूचा बिनबुडाचा जाच ऐकून बा बराच खवळला. पर म्या न सांगताचं आले म्हणल्यावर बा गांगरून गेला. हे काई तू बरं केलं नाहीस. म्हणला.
चारआठ दिवस कशीतरी गोजच्या सुखाचे गेले व्हते. नवव्या दिवशीच मव्हा नवरा यलप्पानं बारुळात जात पंचायतीचा फड घातला व्हता. पंचायतीचा फड त्या रखरखीत गायरानामधल्या ऐकट्या उभ्या लिंबाच्या सावलीत बसला व्हता. अन् बसल्या पंचायती म्होरं बा हात बांधून उभा राहिला व्हता. म्या नवऱ्यानं, “शाली मला न सांगता पळून आलीया. पळून येण्यापायी तिला तिच्या बाची फूस हाय, असा बट्टा लावला व्हता. म्या तोंड फोडून सफाई केली. पर कोण काय ऐकल न्हाय. पंचायतीनं बाला दोनशे एक रुपयाचा दंड लावला. बा हात चोळून गप्प राहिला. दंड द्यायला तवा बा जवळ कवडीबी नव्हती. तोंड दावाया त्याला जागा उरली नाही. पंचाच्या हातापाया पडून
दंडाची रक्कम सटीला देण्याचं बानं कबूल केलं व्हतं. दंड चुकता करजेस्तोवर शाली इथचं राहील म्हणून पंचायतीनं बाला बजावलं व्हतं. मंग दारू ढोसून जात पंचायत उठली व्हती. त्या रखरखीत गायरानात सावली देणाऱ्या एकट्या लिंबाच्या जागी मला मव्हा बा दिसत व्हता.
सट जसजशी जवळ येत व्हती. तसतसा बा खगत चालला व्हता. पंचायतीनं लावल्या दंडानं त्याला येरगाटलं व्हतं. दोनशे एक रुपया जमवायची तोड त्याला गावत नव्हती. म्या गावात केरसुनी, फडे, फणी, मणी, सुया, बायकांच्या पोती या इकून पै पैसा आणीत व्हते. पर त्यो घरखर्चाला पुरत नव्हता.
अशी एकादिशी म्या मया इकायच्या दिवसांचं गाठोडं काखला बांधून निघायच्या तयारीत व्हते. तेवढ्यात शिवाजी शाळेची विद्याताई फड मास्तरीन मह्या पाला म्होरं येऊन उभी राहिली. मह्या पालाम्होरं मास्तरीण बघून म्या तर चकरावलेच व्हते. काय करावं काई सुधरंत नव्हतं. मह्या मनांचा उडालेला गावरान गोंधळ ओळखून ती बाई म्हणली, “घाबरु नकोस मी तुझ्या कडेच आले. मला तुझ्याशी कांही बोलायचंय पालात बोलावतेस ना ?” म्या भानावर येत “व्हय” म्हणलं. बाईला बसायपाई गोंधडं अंथरलं. बाई बेलाशक बसली. पर त्या घाणेरड्या कोंडाळ्यात मास्तरीण बाईला बघून मवा जीव पार शरमंदून गेलता. पालाम्होरं अंगणात केरसुनीच्या फडांचा सडा पडलेला व्हता. मह्या अंगावर चिमूटभर घडत्याचं लक्तर व्हतं. जागजागी फाटल्या जुनेरातून काटकुळ्या अंगाचं सुरकुतलं काताडं दिसत व्हतं. त्या बाईला चहाबी काई करावं म्हणलं तर पालात एखादं पितळाचं भगोनंबी नव्हतं. तसच चहा पिता का बाई म्हणायची मह्या दपडल्या छातीत हिंमतबी नव्हती. चांगल्या घरच्या त्या बाईची मह्या पालात चहा घेता काय बाई अशी म्या म्हनीन तरी कशी? पन त्याचं उलटचं झालं. चहा करतेस ना? बाईच म्हणली, ऐकून म्या गांगरले. इकडं तिकडं उगीच चापळू लागले. साखरपत्ती नव्हती. बाईनं हे समदं वळकीलं असावं. तिनं वस्तीवरल्या एका पोरासनी बोलावून हॉटेलात चहा आणायला धाडलं. म्या नुसतं बघतच राहिले.
बाईनं मला जवळ बसवून घेतली. अन् ती बोलू लागली. तेवढ्यात म्होरल्या लिंबाखाली बसलेला तरण्या पोरांचा पत्याच्या डाव मोडून तांबूस…. (भाग;-३वाचा)
पुढील भाग ..
क्रमशः
सु.द.घाटे
छोटी गल्ली ,हिराई भवन,
कंधार ता.कंधार जि.नांदेड
(९४०५९१४६१७)
रुमणपेच (कथासंग्रह)
प्रकाशक ; गणगोत प्रकाशन
(९६६५६८२५२८)
मुल्य ; २१०/- रु
रुमणपेच कथासंग्रह ; तांडा (सु.द.घाटे ..भाग १) http://yugsakshilive.in/?p=12598 युगसाक्षी