रुमणपेच कथासंग्रह ; तांडा (सु.द.घाटे ..भाग ३)

… तारवटल्या डोळ्यांचा गंग्या पालाम्होरं आला अन् खवळून खेकसला. शाले “कोण ही बाई. ?” असल्या लई पुढारनी येत्यात रोज शाळा देऊ घर देऊ म्हणत्यात अन् मत मागत्यात. पर साली कोण बी काय करत न्हायीती…” त्याचं बोलणं चालू असतानाचा जमलेल्या लोकात एकच गलका वाढला व्हता. त्याचं जोरजोरात बोलणं ऐकून म्हवं डोस्क झपाटलं. म्या गंग्यासनी पालाबाहीर ढकलून समद्यासनी म्हणलं. “खबरदार, ईथं कोण काय बोलायचं न्हायं. आपापली वाट धरा, जा चालती व्हा. नसता बाला हाका मारीन बाचं नाव काढताच समदी टरकली अन् एकेकानं सटकली. म्या बाईकडं बघितलं. बाई शांत व्हती. “ये इथं बस.” बाई म्हणली. म्या बाईम्होरं जाऊन बसले. “शाळाबिळा काई शिकलीस की नाही.” बाईनं पूसलं.

आम्हासनी कसली शाळाबिळा म्या तसं नव्हं गं. असा आता सरकारनं सर्वांना शिकायचं काढलंय.” ‘काय म्हणता? आम्हीबी शिकायचं म्हणलं बरं, ते खरं असलं तरी

या वयात कसलं येतया शिक्षण आम्हासनी बाई.” म्या अचंब्यानं म्हणलं.

“शिकायला कोणतंही वय चालतयं. तू माझ्या घरी येत जा, मी तुला शिकवीन. माझ्या यादीत तुझं नाव आहे. तेंव्हा तुला आता रोज सहा वाजता माझ्याकडं यावं लागेल, हेच सांगायला मी आले व्हते बरं का, जाते मी. आताशिक शिकून म्या अशी काय दिवं लावणारं हाय व बाई ?’

ते तुला शिकल्यावर आपोआप कळंल तू येत जा माझ्याकडं. मी वाट पाहीन तुझी.” ऐवढं बोलून बाई गेली व्हती.

मास्तरीन बाई मही वाट बघणार म्हणल्यावर पालात मव्ह मन जाग्यावर बसाया राजी व्हईना. सहा वाजता न इसरता म्या बाईच्या घरी हजर झाले. तिथं बऱ्याच बायका जमल्या व्हत्या. आडाणी बाया एकएक अक्षर गिरवीत व्हत्या. म्याबी अक्षरांची पंगत धरली. अन् तिथं मह्या फाटक्या जिनगानीच्या समद्या अपयशाची कोंडी फुटली.

चढत व्हते म्या पायरी पायरीनं अक्षरधारा. अन् किड लागल्या हयातीचा सरत व्हता बाधा सारा. अक्षरधारा भाग एक मधला ‘औषध’ धडा शिकतानी मला कळलं व्हतं की, कोणत्याबी रोगावर दोरी गंडा, नवस, सायास हे इलाज नव्हं तर रोग्यानं दवाखान्यात जावं. डॉक्टर चखोट इलाज करत्यात,

हे मह्या ध्यानात आल्यावर म्या वर्ग सुटल्यावर नकर मागं राहून बाईसनं पुसलं व्हतं. बाई मला लेकरू बाळ व्हईना झालया. तवा दवाखान्यात काइ इलाज गावल का हो ? “व्हयं की दवाखान्यात त्यावर इलाज आहे.” बाई म्हणली, अन् एक दिवस मला बाईनं दवाखान्यातबी नेलं व्हतं. डॉक्टर साहेबांन तपासून औषधपानी दिलं व्हतं. समदा खर्च बाईनंच केला व्हता. हुरळल्या मनानं म्या गोळयाऔषध रोज घेत व्हते. पर बाला पैशाची जोड व्हत न्हवती अन् मव्हा नवरा न्यायला येत न्हवता. एक दिवस ही कोंडीबी म्या बाइसनी सांगितली व्हती. हरहुन्नरी विद्याताई बाई हसली. तिचं हसनं न्हाऊ केल्या सुवासिनीच्या मोकळ्या केसागत निर्मळ वाटलं मला. हासून बाडू म्हणली. “यावरबी ईलाज आहे की.” ईलाज हाय म्हणल्यावर मवं कुणबावू काळीज नवलाईनं भरून आलं.

“ते कसं वं बाई ?” हरखून म्या गडबडीनं पूसलं व्हतं. उद्याच वकील सायबाकडं जाऊ, नि इलाज करून टाकू” बाई

म्हणली.

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी तालुक्याला वकील सायबाकडं गेल्या व्हत्या. बाईनं वकील सायबासनी मह्या फुटक्या कपाळाची समदी कोंडी सांगून इलाज काढा म्हणलं. वकील सायबांनं बाईचं ऐकून वकिली करायचं मान्य केलं. अन् एका पंदरवाढ्यातचं मव्हा नवरा धावत पळत आला. बाचे पाय धरून गयावया करू लागला. “म्या शालिसनी कधी नेत नाय म्हणलं ? म्या तर तिला आज न्यायला तयार हाय. तेवढं कोर्टाचं केस काढून घ्या. म्हणजे झालं. शालिसनी काई तरासबी देणार न्हाय.” त्याची काकलूत बघून बाचं थोराड काळीज आपसुकचं ईरगळलं व्हतं. कदीम जानता बा तालुक्याला गेला सुल्ला करून बानं केस उचलून घेतली. अन् म्या म्हया नवऱ्यासंग हाळद्याला आले. तसं संसाराचं समदं शिवपन दाटून आलं.

म्या साक्षर झाल्याचं म्हया नवऱ्याला कळलं, अन् त्याचं त्वांड सोनसतेज दिवटीगत उजळून आलं. अर्ध्या वरती मोडलेला डाव म्हया साक्षरतेनं जितनीत जसाच्या तसा मांडलेला बघून आमच्या समद्या तांड्याला मव्हं अन् सरकारच्या साक्षरता अभियानाचं ग्वाड कवतिक वाटत व्हतं. आमच्या तांड्यात बी आता वर्ग घ्यायचं ठरलं व्हतं. साक्षरतेचे आगटी, पलोते पेटवून उजळतं ठेवायचं पक्कं झालं व्हत.

समाप्त….

सु.द.घाटे

छोटी गल्ली ,हिराई भवन,
कंधार ता.कंधार जि.नांदेड
(९४०५९१४६१७)

रुमणपेच (कथासंग्रह)
प्रकाशक ; गणगोत प्रकाशन
(९६६५६८२५२८)

मुल्य ; २१०/- रु

पुढील कथा वाचा ; कंदोरी

*रुमणपेच कथासंग्रह ; तांडा (सु.द.घाटे ..भाग २) http://yugsakshilive.in/?p=12706 युगसाक्षी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *