लहानेपन देगा देवा..! पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने — प्रा. डॉ.रामकृष्ण बदने

(पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने साहेब ३६ वर्षाच्या प्रदीर्घ  शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.या कर्मयोग्यावर लिहीण्याचा मोह आवरला नाही म्हणुन हा शब्दप्रपंच.)

महाराष्ट्र ही संत व समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. साधुची व्याख्या करताना संत तुकाराम महाराज म्हणाले की ‘जे का रंजले गांजले lत्यासी म्हणे जो आपुले l तोचि साधु ओळखावा l देव तेथेची जाणावा ll’ या वचनाला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात जी माणसे उतरवितात तीच खरी संत होत. देवाच्या गाभाऱ्यात बसून पूजा अर्चा, नामस्मरण जरी करत नसले तरी गरिबांच्या अंतःकरणाच्या गाभा-यात स्थान मिळवुन त्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानणारे ही काही कमी महत्वाचे नसतात.असेच काम हजारो दृष्टी हिनांना दृष्टिदान देऊन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.


लातूर जिल्ह्यातील माकेगाव ता. रेणापूर येथील एका शेतकरी कुटुंबात माता अंजनाबाई व पीता पुंडलीकराव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.तातेराव लहानपणापासूनच कष्टाळू,प्रामाणिक व कार्यावर निष्ठा ठेवून काम करणारे होते. गरिबीच्या अनंत वेदना भोगत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांच्या मनाला मेवा मिळविण्याचा मोह कधी पडला नाही.पैसे रुपी मेवा पेक्षा रंजल्या गांजल्यांची सेवा हाच धर्म त्यांनी मानला.ते जिथे जिथे नोकरीसाठी गेले तिथे तिथे त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले.सूरुवातीला १७ मे १९८५ रोजी अंबाजोगाई येथे अधिव्याख्याता म्हणुन रुजू झाले.येथूनच त्यांनी नेत्र शिबीरे घेण्यास प्रारंभ केला.इथे बीड जिल्ह्यात आठ वर्ष काम करताना अनेकांना दृष्टीदान दिले.पुढे धुळे येथे काम करतानाही आदिवासी पाडे व दुर्गम भागात जाऊन काम केले.पुढे किडनीचा आजार बळावल्याने त्यांनी मुंबई येथिल सर जे.जे. रूग्णालयात सेवा द्यायला प्रारंभ केला.साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे ‘ जया न कोणी प्रभू मी तयाचा lतयार्थ हे हात तयार्थ वाचा ll याच उक्तीप्रमाणे ते सतत चंदनाप्रमाणे झीजत राहिले. नोकरी करताना आपल्या आई-वडिलांकडे व भावंडांकडे ही त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही म्हणूनच त्यांचे छोटे बंधू डॉ.विठ्ठलराव लहाने प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रात देशपातळीवरील एक नामवंत डॉक्टर म्हणुन प्रसिद्ध झाले. रुग्णांची सेवा करताना तात्यारावांना किडनीच्या आजाराने घेरले आता आपण जगू शकतो की नाही हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला अशावेळी त्यांची आई अंजनाबाईंनी ज्या आईला आपण ईश्वराचा आत्मा म्हणतो किंवा लेकुराचे हित lवाहे माऊलीचे चित्तl lऐसी कळवळ्याची याती l करी लाभाविन प्रीती l असे वर्णन ज्या संतांनी केले आहे अशा मातेने आपली किडनी मुलाला देऊ केली व डॉ. तात्यासाहेब लहाने यांना जीवदान मिळाले व त्यांचा १९९५ ला दुसरा जन्म झाला.

आता त्यांच्या मनाने असा ठाम निश्चय केला की ‘ उरलो उपकारापुरता ‘ म्हणून ते सतत दृष्टिदान चळवळीत सक्रिय राहीले. ज्यांना ईश्वराने जन्म तर दिला पण बघता बघता अंधत्व यायला लागले व जगण्याचं बळ मृतावस्थेत जाऊ लागलं अशांना मोफत नेत्र शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टिदान देण्याचे काम त्यांनी केले. म्हणजेच तसे ठरले जसे कोणी देवदूत काळोखावर खोदत बसला नक्षत्राची लेणी.नेत्र चिकित्सा करने, नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करने हे नीत्याचेच बनले. या कामी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती सौ. सुलोचनाताई तसेच त्यांच्या मुली ॲड. सपना सावंत (लहाने)व डॉ.सौ सायली वाघमारे, मुलगा डॉ. सुमित लहाने या सर्वांचे सहकार्य राहिले. या कामी डॉ.रागिनी पारेख,कै.मारोती शेलार व ६७ लोकांची टीमचे सहकार्य लाभले.पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत ६६७ शिबीरांमधुन ३० लाखापेक्षा जास्त रूग्णांची तपासणी करून उपचार केले.सर जे.जे. रुग्णालयात २० लाखापेक्षा अधिक लोकांवर उपचार केले.५० लाखाहून अधिक रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.त्याच बरोबर १८० पेक्षा जास्त शिबीरात शस्त्रक्रिया करून १ लाख ३० हजार रूग्णांना दृष्टी परत मिळवून देण्याचे काम केले. तसेच जे. जे.रुग्णालयामधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ आॅफथॅलमोजाजी येथे होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये ६०० पासून ते १९ हजार प्रती वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात गरजू व गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर ज.जी.समुह रुग्णालयात या कालावधीत चार लाख नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या.त्यापैकी 1 लाख 62 हजार शस्त्रक्रिया स्वतः त्यांनी केल्या. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात अन्य डॉक्टरांकरवी नेत्रशस्त्रक्रिया केल्यानंतरही चुकून काही जणांना अंधत्व प्राप्त झाले असेल अशा ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्यांना पुन्हा दृष्टिदान देण्याचे काम त्यांनी केले. सरकारी नोकरीत पाट्या टाकण्याची वृत्ती बळावत असताना तात्यारावांनी केलेले हे कार्य स्पृहणीय आहे.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ही वृत्ती बाळगून ते कार्यरत राहिले.

म्हणजे य: क्रियावान स पंडित: हे तत्व त्यांच्या ठिकाणी दिसून येते. गुणवत्तापूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया सरकारी व मुनिसिपल दवाखान्यात विशिष्ट कार्यपद्धतीने केल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान जगप्रसिद्ध झाले. या कार्यपद्धतीमुळे खाजगी दवाखान्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुपये १५ते ५० हजार खर्च येत असे ते काम आता गरिबांसाठी मोफत होऊ लागले. त्यांनी स्वतः बाबा आमटे यांचे आनंदवन आश्रमात अनेक कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी या रुग्णालयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. या रुग्णालयात येणाऱ्या पाच लाख रुग्ण संख्येत वाढ करून ती दहा लाखापर्यंत नेली.त्याचबरोबर सोळा हजार शस्त्रक्रिया मध्ये वाढ करून त्या बेचाळीस हजार प्रती वर्ष करण्यात यश प्राप्त केले.जे. जे. रुग्णालयांमध्ये कार्यालयीन इमारत,गरजू रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्यात आल्या, तसेच पी.जी.च्या ९७ जागांमध्ये वाढ करून १७५ जागा निर्माण करण्यात आल्या. सुपर स्पेशालिटी रूग्णालय असावे याकरिता ११०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रूग्णालय मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले व त्याचे काम जोमाने सुरु झाले आहे.ग्रँन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतातील सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून पाचव्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवुन दिला. त्यांनी अनेक शोध प्रबंध भारतात व परदेशात प्रसिद्ध केले. लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स या व अशा अनेक दैनिकातून अनेक वेळा प्रबोधनात्मक लेख लिहिले.विविध चॅनलवरुन प्रबोधन केले आहे.
सहसंचालक या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर परिचर्या संवर्गाच्या भरती वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. संचालक म्हणून बारामती, नंदुरबार येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.त्याचबरोबर सातारा आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.

covid-19 चा प्रादुर्भाव उदभवल्यानंतर covid-19 चे नोडल अधिकारी म्हणून मनुष्यबळासाठी आवश्यक असणारे डॉक्टर त्यामध्ये खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स, रेसिडेंट डॉक्टर्स,,बंधपत्रीत डॉक्टर्स त्यांना आदेश देऊन त्यांची नियुक्ती आवश्यकतेनुसार ग्रामीण व शहरी भागांमध्ये करण्यात आली.तसेच आवश्यक त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यात आली.त्याच बरोबर कोविड महामारीच्या सुरुवातीला फक्त ०३ प्रयोगशाळा कार्यरत होत्या. त्यामध्ये वाढ करून एकूण २५४ (शासकीय १३० व खाजगी १२४) प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करून त्याचे निकष ठरविण्यासाठी व्ही.सी. द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.२० महाविद्यालयांमध्ये कोविडसाठी वेगळे कक्ष स्थापन करण्यात आले. ऑक्सिजन कॅपॅसिटी, आयसीयू कॅपॅसिटी यामध्ये लक्षणीय वाढ करून रुग्णांचा मृत्यू दर ०२ पर्यंत कमी करण्यासाठी रोज व्ही.सी. द्वारे तज्ञांचे मार्गदर्शन देऊन प्रत्येक रुग्णांचा पाठपुरावा करून मृत्यू दर कमी करण्यात आला. त्याच बरोबर आयुष टास्क फोर्स,पेडीयाट्रीक टास्क फोर्सचे सदस्य म्हणून कोविड उपचारांच्या मार्गदर्शक सूचना सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम केले.

अधिष्ठाता किंवा संचालक असतानाही त्यांनी अंधत्व निवारण करण्याचे काम बंद पडू दिले नाही. नम्रभाव,प्रसिद्धीपासून दुर राहणे हे ही त्यांच्याकडे दिसते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते कै. विलासराव देशमुख साहेब व माजी उपमुख्यमंत्री लोकनेते कै.गोपीनाथरावजी मुंडे व अन्य नेत्यांचे त्यांना या कामी प्रोत्साहन मिळत होते.त्यांच्या प्रती ते कृतज्ञताभाव व्यक्त करताना दिसतात.
कार्य कर्तुत्व आणि माणसाच्या कामाची दखल घेऊन जर त्याला प्रोत्साहन दिले तर काम करणाऱ्या माणसाला प्रबलन तर मिळतेच पण समाजात एक चांगला संदेश जातो व माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास दृढ होतो. या साठीच पुरस्कार देण्याची योजना असते. त्यांच्या वरील कार्याची दखल घेऊन थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा नाशिक नगरीत ह्रदयनागरी सत्कार करण्यात आला होता. तसेच निष्ठेने,कार्यतत्परतेने,निस्वार्थी भावनेने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.या बरोबरच त्यांना आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी घेतली आहे त्यांच्या बाबतीत एका प्रसिद्ध हिंदी कवीच्या पुढील ओळी तंतोतंत लागू होतात.


मंजिले उन्ही को मिलती है l जिनके सपनों में जान होती है l
पंखो से कुछ नही होता lहौसलों से उडान होती है ll
विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर कोटग्याळ ता.मुखेड जि. नांदेड येथे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक आश्रम शाळा कंधार फाटा कमळेवाडी ता. मुखेड येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर साठी त्यांनी दिलेले योगदान आज ही स्मरणात आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना आणखीन दृष्टिदान करण्यात मोठे योगदान देता येणार आहे. खरे तर अशा माणसाच्या बाबतीत ईश्वराकडे जर काही मागायचेच असेल तर आपण त्यांच्या चरीत्राचा मागोवा घेतल्यास ईश्वराला एवढेच मागावे की ‘हे ईश्वरा, लहानेपन देगा देवा’ म्हणजे त्यांच्यातील काही गुणवैशिष्ट्ये ईश्वराने आमच्याकडेही काही प्रमाणात द्यावेत.
अस्या या कर्मयोग्याला भविष्यात आणखीन कार्य करण्यासाठी ईश्वराने त्यांचे आयु आरोग्य अबाधित राखावे असीच या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करुन मी माझा शब्द प्रपंच थांबवतो.

          प्रा. डॉ.रामकृष्ण बदने 
 ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
          ता.मुखेड जि.नांदेड.
       भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *