नांदेड ; प्रतिनिधी
भाजपा महानगर नांदेड व
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने
कायापालट या उपक्रमाच्या तिसऱ्या महिन्यात संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून 36 बेघरांची मोफत दाढी कटिंग केल्यानंतर त्यांना आंघोळ घालून नवीन कपडे, जेवण व शंभर रुपये बक्षिस दिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा कायापालट झाला.एका गतिमंदाला आणताना त्याने कारमध्येच घाण केली तरीदेखील त्याच्यावर न रागवता त्याला आंघोळ घालून दाढी कटींग केली .
आर्थिक अडचणीमुळे किंवा वेडसरपणामुळे डोक्याचे जंगल बनलेल्या रस्त्यावरील वेडसर निराधार,बेघर,अपंग, भ्रमिष्ट व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा ” कायापालट ” हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिलीप ठाकूर हे राबवीत असतात. नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लॉयन्सचे प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिलीप ठाकूर यांच्या समवेत लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा तसेच सुरेश शर्मा, शिवा गिराम, ॲड.बि.एच.निरणे, संदीप छापरवाल, भाजपा नवा मोंढा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे, बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव, संजयकुमार गायकवाड यांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विविध मंदिर परिसरात फिरून ज्यांचे अवास्तव केस वाढलेले आहेत अशांना गोडीगुलाबीने एकत्र जमविले. बजरंग वाघमारे यांनी सर्व बेघरांची कोरोना नियमाचे पालन करून काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने अशोक राठोड, शेख सत्तार शेख इब्राहिम यांनी सर्वांना आंघोळ घातली. जमलेल्या सर्वांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना नवीन अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट ,शर्ट परिधान करण्यासाठी देण्यात आले. पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व मनसोक्त आंघोळ आणि त्यावर नवीन कपडे मिळाल्या मुळे बेघरामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःचेच नवल वाटले. कार्यक्रम संपल्यानंतर चहा नाष्टा चे कप व इतर साहित्य तसेच कापण्यात आलेले केस जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.लॉक डाऊन मध्ये नोकरी गेलेल्या एका बेरोजगारने असे सांगितले की, आम्ही कटिंग करण्यासाठी पैसे घेऊन गेलो तरी आमच्या अवतारामुळे आम्हाला दुकानात येऊ दिल्या जात नाही. पण दिलीपभाऊ मुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदा कटिंग करण्याचा योग आला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.