कंदोरी ( रुमणपेच ) लेखक ; सु.द.घाटे

नागादाच्या दोन्ही सुनांना पोरं झाली आणि सारे झकास आनंदी झाले. पोरं दिसामासा वाढायला लागले. अन् नागादाचा वाडा फुलायला लागला. बाळाचं रडणं, पडणं, हासनं, खेळणं, पहात पहात बोबडे अमृताचे गोड बोल ऐकून सर्वाचे कान तृप्त झाले. होता होता मुलं चांगली वर्ष दीड वर्षाची झाली. मुलांची जावळ आता मानेवर रूळत होती. त्यामुळे मुलं अधिकंच सुंदर दिसत होती.

पण घरातल्या बाया बापड्यांना केंव्हा एकदा आपण जावळ काढून देवीच्या ऋणातून मुक्त होऊ याची चिंता लागली होती. प्रत्येक वडील मुलाचे जावळ दिग्रसच्या सटवाईला वाहून बकरं कापण्याची नागाद्याच्या घराण्याची जुनी रित होती. त्यामुळं नागादा पै पैशाची जुळवाजुळव करीत होता. पणकांही जमत नव्हते. त्याचे दोन्ही तरणे पोर पाटलाच्या वाड्यावर नोकर म्हणून रात्रं दिवस राबत होते. सुना लागल ती रोजंदारीची कामं करीत होत्या. पण आलेली सारी कमाई घर खर्चात जात होती. नागादाची हाडं तर पार थकून गेली होती.

एके दिवशी सकाळी म्हातारा विचार करीत पाटलाच्या वाड्यावर गेला. पाटील नुकतेच स्नान वगैरे आटोपून ढाळजत लोडाला टेकून बसले होते. गरम गरम चहा पाण करीत होते.

जोहार मालक……

“अरे ये ये… बऱ्याच दिसानं आलासकी वाड्यावर. आधी च्या घी, मग बोल काय असल ते. ती बग कपबशी त्या देवळीत हाय. थोडं हिसळून घी. बेटा अनुसया, नागाच्या बशीवर पाणी टाक अन् च्या दी त्याला.

इतक्यात अनुसया आतून आली. तिनं नागादाच्या बशीवर पाणी ओतलं आणि आतून चहा आनला. नागादाच्या बशीत चहा ओतला. तसे पाटील म्हणाले, “थोडं वरून वाढत जावं बेटा, तुला कधी अक्कल येईल ते देवच जानो.” तशी अनुसया ओसाळल्या गत करून आत निघून गेली. नागादानं चहा पिऊन घेतला. आतून पुन्हा पाणी मागून घेऊन बशी

विसळली आणि नेहमीच्या देवळीत ठेवून दिली. मग ढाळजच्या पायरीवर बसून तो बोलू लागला. “तुमच्याकडं म्या एका कामासाठी आलाव मालक “सांग की रं मंग, काय काम हाय ते.” यंदा म्या नाताचे जावळ काढावं म्हणतूया त्यासाठी मला दोनशे रुपये द्या. अन् ते मया पोराच्या नोकरीतनं मोडून घ्या, म्हणजे तुमच्या कृपेनं सुटल म्या देवीच्या “अरं पन, या वक्ताला पैसे हाईत कुणाकडं?’

“नाही नाही, असं म्हणू नका जे मालक, तुमच्या बिगर जायचं कुठं आम्ही ?

“बरं, असं कर, नागा तुला देवीला बकरंच कापायचंय ना, तर आपल्या घरचंच बकरं तू घेऊन जा दोनशे रुपयात. ” तसं करा मालक. ” ‘तुमच्या मनाला येईल

असं बोलून नागा खुशीत उठला होता. लगबगीनं घरी जाऊन त्यानं घरच्यांना बकरं खरेदी केल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार येत्या मंगळवारी देवीचा नवस फेडायचं असं ठरलं. त्यामुळं बरीच धांदल उडाली. नागाच्या थोरल्या पोरानं पाहुण्यांच्या गावाला जाऊन कंदोरीची आमंत्रणं पोचती केली. रविवारी माल मसाला, उद, फूल, नाडा, नारळ, सारं नागानं आणून घेतलं.

सोमवारी नागादानं शेजाऱ्याची गाडी मागून घेतली. देवाच्या कामाला कोण नाही म्हननार? गाडी भेटली. गाडीत सामानसुमान भरून घेतलं बाया माणसं व लेकरंबाळं गाडीत बसली अन् पाच वाजण्याच्या सुमारास गाडी लागली वाटेला. गडी माणसं पायी होती. पाटोदा ते दिग्रसचे अंतर सातआठ कोसाचे होते.

गाडी जांबच्या जवळ जवळ पहुंचली असेल नसेल, तोच अचानक सोसाट्याचा वारा सुटला. पिसाट वारा गोल गोल फिरत होता. भिंगरीगत. कडाडकड विजा चमकू लागल्या आणि अवेळी आलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला. अशा झालेल्या अचानक माऱ्यानं बगता बगता बैल बावचळले अनं वाट फुटेल तिकडे चारी पायावर उधळू लागले.

म्हाताऱ्यानं बैलांच्या येसनी धरून त्यांना धांबवलं. पटापट बाया माणसं खाली उतरली. सामानसुमान शाळेत नेऊन ठेवलं. माणसं शाळेच्या आश्रयाला थांबली. म्हाताऱ्या नागानं रात्री दोनदा उठून बैलांना चारा टाकला……..(क्रमशः )

सु.द.घाटे

छोटी गल्ली ,हिराई भवन,
कंधार ता.कंधार जि.नांदेड
(९४०५९१४६१७)

रुमणपेच (कथासंग्रह)
प्रकाशक ; गणगोत प्रकाशन
(९६६५६८२५२८)

मुल्य ; २१०/- रु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *