डॉ.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त परिसंवाद व मान्यवरांचा सत्कार


नांदेड-भारताचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकार्‍यांचा सत्कार व परिसंवादाचे आयोजन दि.14 जुलै रोजी  करण्यात आले आहे.


येथील कुसूम सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार असून मान्यवरांचा सत्कार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळेस सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजीमंत्री नसीम खान यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. मला भावलेले डॉ.शंकरराव चव्हाण या विषयावर या कार्यक्रमात परिसंवाद होणार असून या परिसंवादात मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांचा सहभाग असणार आहे.


डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या समवेत काम केलेल्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींचा याच कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. किशनराव राठोड, माजी आ. केशवराव औताडे, टोकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शंकरराव खराटे, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे, नागपूर येथील अनंत घारड यांचा समावेश आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम दै.सत्यप्रभा या वर्तमानपत्राच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केला आहे. तरी या सोहळ्यास निमंत्रितांनी उपस्थित रहावे असे आवाहन सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, मुख्य संपादक शिवानंद महाजन, संचालक संदिप पाटील, सल्लागार बालाजी जाधव व कर सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *