दि.१४ जूलै २०२१ रोजी परमश्रध्देय कै.शंकररावजी चव्हाण साहेबांची जयंती. त्या निमित्त लिहिलेला हा प्रासंगिक लेख.
मराठवाड्याने तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई व संत एकनाथ यांसारखे चार मोठे संत दिले. ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सारा देश ढवळून काढला व आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. त्याप्रमाणे विसाव्या शतकात देशपातळीवर व महाराष्ट्रात राजकीय लोकशाहीचे बळकटीकरण करणारे चार थोर राजकिय नेते मराठवाड्याने दिले. ज्यामध्ये प्रामुख्याने कै.डॉ. शंकरराव चव्हाण,कै. प्रमोदजी महाजन,कै. विलासराव देशमुख, कै.गोपीनाथरावजी मुंडे यांचा उल्लेख करावा लागेल. दि ०१ मे १९६० रोजी मुंबईसह स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री व अनेकदा केंद्रीय मंत्री होण्याचा बहुमान कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांना मिळाला. तर पुढे त्यांचे शिष्य कै.विलासराव देशमुख यांना शंकररावजी सारखे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री होण्याचा सन्मान मिळाला.कै. प्रमोद महाजन हेही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते तर कै.गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते.
तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने शंकररावांची निवड जिल्हा सरचिटणीस पदी केली. इ.स.१९५२ ची पहिली सार्वत्रिक निवडणूक शंकराव चव्हाण यांनी हदगांव मतदारसंघातून लढवली परंतु ते अल्प मतांनी पराभूत झाले. त्यानंतर नांदेडचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री म्हणून तर २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दुसऱ्यांदा मार्च १९८६ ते २४ जून १९८८ या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कार्य केले.
जलसिंचन हा त्यांच्या कार्याचा ध्यास असल्यामुळे अनेक प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी धरण,भीमा प्रकल्प, कुकडी प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, येलदरी धरण, अप्पर पैनगंगा, लेंडी, मन्याड,मांजरा धरण,ठाणे खाडीवरील पूल, सिद्धेश्वर धरण, अप्पर वर्धा धरणांचा समावेश होतो.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच नांदेडला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय, धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय व अन्य शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. त्या सर्व संस्था आज नावलौकिक प्राप्त आहेत.यशवंत महाविद्यालयात तर महाराष्ट्रातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.बाकीच्या संस्थेच्या शाखा संपूर्ण नांदेड जिल्ह्याची शैक्षणिक भूक भागविण्याचे काम करत आहेत. नांदेड येथे त्यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेला विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. त्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी मराठवाडा मित्र मंडळ स्थापन केले. परभणी येथील कै. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्र, मुंबई दूरदर्शन केंद्र या योजनाही त्यांच्याच काळात कार्यान्वित झाल्या.
महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात जे स्थान नरहर कुरुंदकरांचे आहे, ते स्थान राजकीय क्षेत्रात शंकररावांचे राहिले आहे. अत्यंत संयमशील, विवेकशील,सत्यशील,कार्यतत्पर व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते प्रसिद्धीपासून स्वतः दूर राहत असत. राजकारणातील हेडमास्तर म्हणून ही त्यांची ओळख आहे.’ बोले तैसा चाले’ ही तुकारामांची युक्ती त्यांच्या जीवनाला तंतोतंत लागू होते. भ्रष्टाचाराचा भुंगा त्यांच्या आयुष्याला कधी कुरतडू शकला नाही. माझे संस्थाचालक माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड व माजी आमदार दलितमित्र गोविंदराव राठोड यांच्यावर ते भावागत प्रेम करीत असत. हे राठोड बंधू ही आवर्जून त्यांची कृतज्ञता नेहमीच व्यक्त करताना दिसतात. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते आमच्या संस्थेत वसंतनगर ता.मुखेड येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माझ्याकडे होते. ते सूत्रसंचलन ऐकून ते प्रसन्न झाले व त्यांनी मला शाबासकी दिली होती. या घटनेने मी कृत कृत झालो.ज्याप्रमाणे भगवान शंकराने आपल्या डोक्यावर गंगा धारण केली आहे तशी या शंकराने डोक्यामध्ये विकासाची गंगा धारण करून विकास घडून आणला. जसे भगवान शंकराच्या डोक्यातून गंगेचा उगम तसेच वाहत्या प्रवाहाला प्रकल्प रूपाने अडवून विकास गंगेचा जन्म असे साम्य या दोन्ही शंकरा मध्ये दिसते. एवढेच नाही तर भगवान शंकराने समुद्रमंथनातून निघालेले हालाहल पचविले व जगाला अमृत दिले. तसे या शंकराला ही पंजाब, काश्मीर, आसाम सारख्या अनेक जटिल प्रश्नांचे वेळोवेळी हलाहल प्राशन करावे लागले.
डॉ.शंकराववांनी आयुष्यभर पक्षनिष्ठा जोपासली. तीला कधीच तडा जाऊ दिला नाही. त्यांच्या राजकीय जीवनातील काही प्रसंग यावरून त्यांच्या मनाची संवेदनशीलता दिसते. तसे ते गृहमंत्री असताना हजरतबल दर्ग्यात अतिरेकी घुसले व बाहेर सैनिक तैनात करण्यात आले होते. त्यावेळी दिवाळीचा सण होता पण मला हा सण गोड लागला नाही उलट माझी भूकच मरून गेली असे उद्गार त्यांनी काढले होते.यावरून त्यांची संवेदनशीलता लक्षात येते. कुठलेही जनतेच्या कल्याणाचे काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी ते अंतरंग मिसळुन झटत असत. डॉ. शंकराव साहेबांनी आपल्या आचार, विचार व उच्चारातून, नीतिमान वर्तणुकीतून भीतीयुक्त दरारा देशाच्या व राज्याच्या राजकारणात निर्माण केला होता. मुळात ज्या काळात ते वाढले तो काळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा होता. त्या काळातील अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सहवास त्यांना लाभला. यामुळे त्यांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील थिंक टँक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ म्हणाले होते की ‘ ते एक निष्ठावंत सैनिक आहेत ‘ कूळ कायद्याची अंमलबजावणी त्यांनीच केली.महाराष्ट्राच्या शेती व औद्योगिक विकासाला गती देण्यात त्यांचे जलप्रकल्प कारणीभूत ठरले. शून्याधारित अर्थसंकल्प,भिकाऱ्यांचे पुनर्वसन, रोजगार हमी योजनेचा विस्तार, मराठवाडा ग्रामीण बँकेची स्थापना, यासारखे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले.भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या दिल्लीच्या विज्ञान भवनात दि.१०ऑगस्ट १९९४ रोजी अमृतमहोत्सवी समारंभात त्यांचे सार्थक वर्णन खालील शब्दात केलेले आहे-
“नैतिकता हा मराठवाड्यातील मातीचा गुण आहे. मनुष्यजन्म अती दुर्लभ त्यात आरोग्यदायी व जनसेवेसाठी खर्च झालेला जन्म अती दुर्लभ आहे असे आपला धर्म सांगतो. शंकररावांचे जीवन तसे आहे. त्यांना आपले पद प्राप्त झाले त्यामागे त्यांची साधना आहे.त्यांचे परिश्रम, त्यांची अध्ययनशीलता, त्यांची प्रशासन कुशलता यांचा संगम आहे.चोहीकडे अंधार दिसत आहे. त्यात त्यांचे चारित्र्यपूर्ण जीवन हे एखाद्या दीपस्तंभासारखे आहे”.
यावेळी माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा म्हणाले होते “कमलपत्रा प्रमाणे सार्वजनिक जीवनात वावरणारे शंकरराव चव्हाण राष्ट्राला प्रेरणा देणारा आदर्श आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे स्वतंत्र भारताचे पायाचे दगड असून श्री. चव्हाण यांनी सार्वजनिक जीवनात याचा सतत पाठपुरावा केला आहे. कमलपत्रा प्रमाणे पाण्यात राहूनही त्यापासून अलिप्त राहणारे शंकराव चव्हाण अजात शत्रू आहेत. राज्यात व केंद्रात त्यांनी अनेक पदे भूषविली. तेथे आपल्या पदाचा ठसा उमटविला. ते राजकीय जीवनातील अमूल्य पैलूंचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणून राष्ट्रपुरुषांच्या मालिकेत चव्हाण यांचा नंबर लागतो.”
शेवटी एवढेच म्हणेन की आता आपल्याला पूर्णार्थाने डॉ.शंकररावजी चव्हाण साहेबां सारखे होता येणार नाही.त्यांच्या जीवनातील एखादा गुण त्यांच्या चरित्रातील एखादं पान होता आलं तरी पुरे आहे. म्हणून म्हणतो समुद्र होता नाही आलं तर थेंब तरी व्हावं, हे होण्यासाठी पाण्याचे गुणधर्म असावे लागतात.ते नसेल तर रेती कणांना काही थेंबाची बरोबरी येणार नाही, म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या अंगी असणारे मोठेपण खरे तर शोधायला पाहिजे. मोठी माणसे आपल्याला तेंव्हाच कळतात जेंव्हा तुमच्या अन्तर्यामी तो मोठेपणा असतो. तो तुम्हाला त्यांचे दर्शन घडवितो. डॉ. शंकररावजी चव्हाण साहेबांनी जे जे ध्यास आपल्या आयुष्यात घेतले ते ध्यास आपण आपला श्वास बनवुन कार्य केल्यावर खर्या अर्थाने साहेबांना आजच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली ठरेल. या अपेक्षेसह माझा शब्द प्रपंच थांबवतो.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि. नांदेड
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५