जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची किन्नरासाठी विशेष लशीकरण मोहिम

नांदेड – मला जन्म कुणी दिला हे माहित नाही. माझी गुरु सांगते तुला आमच्यापाशी कुणीतरी आणून टाकले. तिचीच सेवा करत मी मोठी झाले. लहानपणी स्वाभाविकच मलाही खेळायचे प्रचंड वेड होते. सोबतची मुले कधी मला गोल्या म्हणायचे, कोणी मामू म्हणायचे तर कोणी खूप काही. मला काही त्यांचे त्यावेळी वाईट वाटायचे नाही. मी त्यांचे कधी वाईट वाटून घेतलेही नाही. माझ्यातल्याच गुरुने मला मोठे केले. माझे नाव विचाराल तर तसे मलाही नक्की सांगता येणार नाही. प्रत्येक माणसाने मला वेगळे नाव दिले आहे.

मला विविध सणांसह गणपतीची खूप आवड. एक छोटा गणपती मी असाच एका दुकानदाराकडून मागून घेतला. विकत नाही. आम्ही थोडीच काही विकत घेतो ? या गणपतीमुळे मला कुणीतरी गौरी असे नाव दिले. मलाही हे नाव सगळया नावापेक्षा जास्त भावले. तेंव्हापासून मग मी गौरी झाले. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने समाज आणि किन्नर यातील एक-एक पदर गौरी उलगडून दाखवत होती.

माझ्यासारख्या अनेक गौरी आणि त्यांचे दु:ख सारखेच आहे. हे पाहून आम्हाला आता याचे कुणालाच काही वाटत नाही. समाज आम्हाला काही कमी करतो अशातला भाग नाही. आमच्या वेदना घेवून आम्ही जगतो. एकमेकींचे मन आम्ही एकमेकीना बिनधास्त लाखोळी वाहूनही हलके करुन घेतो. समाज जे काही म्हणायचे आहे ते आम्हाला म्हणत राहतो, त्यामूळे आम्ही त्यांची फारशी पर्वाही करत नाही. वारंवार शल्य मात्र एकाच गोष्टीचे राहते ते म्हणजे सरकार दप्तरी आवश्यक असणारी आमची ओळख !

आधार काढायला जावे तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या नोंदी लागतील. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे. अनेक वर्षे झेललेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक अश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत. इथले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या साऱ्या व्यथा आम्ही घेवून भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले. साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते.

शासनाने तृतीयपंथी तक्रार निवारण समिती नेमल्यामूळे आम्हाला आमच्या भावना मांडता आल्या. याचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वसतीत येवून दिला. याबद्दल गौरी विशेष आभार मानायला विसरली नाही.

याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंह संधु, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व त्यांची टिम, तत्परतेने पुढे झाल्याबद्दल गौरी शानुर बकश यांनी कृतज्ञतेने आभार मानले. यावेळी किन्नराची वरिष्ठ गुरु शानुर बाबु बकश यांची विशेष उपस्थिती होती. या लसीकरण कॅम्पच्या यशस्वीतेसाठी अर्चना शानूर बकश, रेश्मा बकश, शेजल बकश, दिपा बकश, कमल फाउडेशनचे अध्यक्ष अमरदिप दिगंबर गोधने, समाजकल्याण विभागाचे दिनेश दवणे, कैलास राठोड यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *