आज दि.१५ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्रातील उत्कृष्ट वक्ते,माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची जयंती.त्या नीमित्त लीहिलेला हा प्रासंगिक लेख
आज आपण गुणवत्तेचा संबंध गुणांसी लावून अंकवंतांना गुणवंत म्हणून संबोधतोय व त्यांचे सत्कार संपन्न केले जाताहेत.पण गुणवत्ता ही केवळ मार्कावर अवलंबून नसते. चित्रकाराच्या कुंचल्यातून ही ही गुणवत्ता झळकते, गायकाच्या कंठातूनही ती प्रकटते,तर वक्त्याच्या वाणीतून ही ती प्रस्फुटीत होते. जी प्रबोधनाचे काम करू शकते. या वाणीच्या स्वसामर्थ्यावर महाराष्ट्र ते अमेरिकेपर्यंत आपल्या वाग्यज्ञाने मोहीत करून टाकणारे नाव म्हणजे कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होत. त्यांचा जन्म १५ जुलै १९२७ साली सातारा जिल्ह्यातील कलेढोण सारख्या छोट्याशा गावी झाला.वडील प्राथमिक शिक्षक होते पण वडिलांची इच्छा आपली मुले शिकून मोठी व्हावीत असी होती म्हणून त्यांनी दोन्ही मुलांची नावे महापुरुषांच्या नावावरून ठेवली. एकाचे नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून बाबासाहेब ठेवले पुढे ते बॅरिस्टर बनले व नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर दुसऱ्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजी ठेवले. या शिवाजीने वक्तृत्वाच्या क्षेत्रात स्वराज्य निर्माण केले. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावी घेतले नंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वसतिगृहात राहून पुढील शिक्षण घेताना त्यांना स्वावलंबनाचे खऱ्या अर्थाने धडे मिळाले. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे वा अन्य कामे करावी लागली.पुढे शिवाजीराव आपणास मोठे झालेले दिसतात पण त्यांनाही अशा बिकट परिस्थितीतून जावे लागले आहे.
अनेक थोर पुरुषांना ऐकणे भेटणे व त्यांच्याशी चर्चा करण्याचे भाग्य त्यांना लाभले.ते म्हणतात पहिल्यांदा चांगला श्रोता झाल्याशिवाय आपणास चांगला वक्ता बनता येत नाही. अथक प्रयत्नामुळे अभ्यासू वृत्तीने त्यांना महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणुन नियुक्ती मिळाली तदनंतर ते प्राचार्य व कुलगुरू पदापर्यंत पोहोचले. सरांनी आयुष्यभर साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासली. वाचन, मनन, चिंतन,व्याख्यान हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले होते.ते नेहमी म्हणत ” व्यासंगाच्या उद्यानातून विचारांची फुले वेचावीत व मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे गुंफावेत.” पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद करताना म्हणतात की ‘वृत्तीने समाधानी व विचाराने श्रीमंत होण्यासाठी ग्रंथ मैत्री केली पाहिजे. आपण तपाचा मार्ग आचरल्याशिवाय आपणास मोठे होता येत नाही. असे सांगत सरांनी आपल्या वैखरीच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र प्रबुद्ध केला. माझ्यासारखे असंख्य वक्ते घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.वक्तृत्वाचा जेंव्हा केंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा भोसले सरांना टाळून तो पूर्ण होवुच शकणार नाही.वक्तृत्वाच्या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने ते भिष्माचार्य होते.सरांनी आपल्या वाणीने अनेकांना जाणते केले. त्यांच्या विचारांचा संक्षिप्त भाग जरी आपण इथे पाहिला तरी लक्षात येते की सर किती महत्त्वाचे प्रबोधन करीत होते.ते सतत म्हणत असत ‘विचार संपन्नता, विचारशीलता व विचारप्रवणता ते खरे पदवीधरांची स्थायीभाव आहेत.ज्याच्या आचार, विचार व उच्चारात समन्वय आहे, जो बोलताना दक्ष आहे, चालताना ज्याच्या चालण्यावरती विवेकाचे नियंत्रण आहे, तो खरा पदवीधर. विद्यापीठाने ज्यांना पदव्या दिल्या, दिल्या म्हणून ज्यांनी घेतल्या पण त्या घेतल्या नंतर काय करावे ?असा प्रश्न ज्यांच्यासमोर उपस्थित झाला त्यांना खर्या अर्थाने पदवीधर म्हणता येत नाही. माणूस पदवीने बाहेरून बहरलेला दिसेल पण त्याला आतून शहाणपण समजणे गरजेचे आहे.’खरा सुविद्य व्यक्ती कोण? याबद्दल बोलताना ते सांगत की ‘नव्या विचारांची पालवी ज्याच्या मनाला फुटत नाही त्याला सुविद्य म्हणण्यात काही अर्थ नाही, सारखं काहीतरी स्फुरल पाहिजे, सुचलं पाहिजे,कळलं पाहिजे ,दिसलं पाहिजे, डोळ्यापुढून ही तरारल पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, तसं देखील वाटलं पाहिजे,हातून देखील घडलं पाहिजे हे ज्याच्याकडे आहे तो खरा सुविद्य’.
त्यांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास समाज किंवा राज्य धनसंपत्तीने मोठे होते पण समाजाच्या बौद्धिक व सांस्कृतिक उंची मुळे निर्माण झालेले विचारांचे मोठेपण अधिक श्रीमंती मिळवून देते. ती श्रीमंती महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जर कोणी मिळवून दिली असेल तर त्यात प्राचार्य भोसले सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
आज चांगल्या आचारांचा, चांगल्या विचारांचा दुष्काळ आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सामाजिक संवेदनांचा, जाणिवांचा लोप होत आहे.अशा परिस्थितीत चांगल्या व्यक्तींच्या विचारांची कास आपणास धरावी लागणार आहे व ते सर्व आपणास त्यांच्या व्याख्यानात व लेखनात मिळते. ते नेहमी आपल्या वक्तव्यात म्हणत असत की ‘ पूर्वी इमारती खुज्या होत्या पण माणसं मनाने मोठी होती. आता इमारती उंच झाल्या आहेत पण माणसे मनाने खुजी होत चालली आहेत. घरासाठी सर्व काही करायचं, त्यासाठी दिवस-रात्र घराबाहेर राहायचं म्हणजे सुखाच्या शोधात भटकणार्यांची एक वन्य मानव जमात आता अस्तित्वात येईल की काय असे वाटते आहे.फार पूर्वी गावे लहान होती आणि माणसे मोठी होती.तुकाराम महाराज देहू गावात राहत होते तेंव्हा तेथे नळाचे पाणी नव्हते पण अभंग वाणी होती.ज्ञानदेवांच्या पादुकांवरती आज वीज लखलखते आहे पण माऊलीच्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा प्रकाश पुन्हा मिळण्याची शक्यता लोपली आहे.सज्जनगडावर जागोजाग चिरेबंदी पायर्या आहेत पण समर्थाचे पाय गडाला लागणार नाहीत ही खंत आहेच. जगभर असेच काही घडते आहे.
शेक्सपिअरचे निवासस्थान, लिंकनचे जन्मस्थान,वॉशिंग्टनचे विश्रांतीस्थान ही राष्ट्रीय स्मारके झाली आहेत पण कर्तृत्वाची ती उंची व झेप आता दिसेनासी झाली आहे. इमारतींना उंची असावी पण त्यात राहणाऱ्यांना ती नसावी असे काही विपरीत घडू लागले आहे.माणसांचे लोंढे रस्त्यावरून वाहत आहेत पण माणूस माणसासाठी उरला नाही. मोठमोठाली नगर हे माणसांचे महासागर झाले आहेत. भरल्या समुद्रात पाण्याची वाणवा नसावी पण तहान मात्र न भागता तशीच रहावी तसेच समाज जीवनाचे झाले आहे. गर्दीत वाट्याला एकाकीपण येत आहे. पोरकेपण प्राप्त होत आहे. ज्ञान आले आहे पण जाण आली नाही, सुधारणेचा वेग वाढला आहे पण संस्कृतीची पावले जड झाली आहेत.
असे किती तरी वास्तविक व भविष्यवेधी विचार त्यांच्या वाणीतून ऐकावयाला मिळायचे.
भोसले सरांचे व्याख्यान म्हणजे गंगेचे संथ वाहने,तिचे पावित्र्य, शीतलता, तहान भागविण्याची क्षमता हे सगळे त्यात ओतप्रोत भरलेले असत. प्राचार्यांनी अनेक विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेत आपली भाषणे दिली. हा वाणीचा यज्ञ करणारा माणूस अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला तो केवळ आपल्या वाक् नैपुण्यामुळे, त्यासाठी उचललेल्या अपार कष्टामुळे व तपश्चरणामुळे. प्राचार्यांची मागील काही वर्षापूर्वी बीडच्या आई महोत्सवात २० व्याख्याने झाली. त्यात त्यांनी अनेक विषयावर आपले विचार मांडले.महापुरुषांच्या अंतरंगात या विषयावर बोलताना ते सांगत की ‘मी महापुरुषांच्या जीवन प्रकाशात खरंतर पाऊल टाकत राहिलो. मी घडलो वाढलो ते त्यांच्याच सहवासात. महापुरुषांनी बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी मनोभावे केल्या. त्यांच्या बोलण्यात व वागण्यात सुसंगता होती. हे महापुरुष गरीब होते पण त्यांनी इतिहास घडविला कारण त्यांच्याकडे मनाची श्रीमंती होती.आता आपण आपल्या ओंजळभर रक्ताची राखण करण्यात गढून गेलो आहोत.विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणायचे की ‘काही बाबतीत आजची पिढी प्रगत आहे. योग्यता वाढली आहे पण दिशा लाभली नाही, मुलांनो तुम्ही पहिल्यांदा स्वतःकडे बघायला शिका, आयुष्या मधला समोरून गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही.विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत व वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. थोडा व्यायाम करावा, शरीरबल व मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. हल्ली आपला जास्तीचा वेळ हा आरश्यासमोर जातो. त्यापेक्षा तुमच्या आत मध्ये एक आरसा बसवलेला आहे त्याच्यात बघायला शिका. विद्यार्थ्यांनी अंगभूत क्षमता विकसित कराव्यात. आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगावे. संतुलित व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे.
ते विज्ञान व धर्म याबद्दल समन्वयात्मक भूमिका मांडत असत. ते सांगत की धर्माशिवाय माणूस जगू शकणार नाही आणि विज्ञाना शिवाय माणूस बदलू शकणार नाही. आपल्या ठायी असणाऱ्या ईश्वराचे प्रकटीकरण हे धर्माचे प्रयोजन आहे. तसे सृष्टीचे रहस्य उलगडून सांगणे हे विज्ञानाचे काम आहे. म्हणून धर्म आणि विज्ञान याच्यात विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मानवाला संपन्न करण्याचे काम दोघांनीही केले पाहिजे. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धांचे उद्यान वाढता कामा नये तसेच विज्ञानाच्या नावाखाली नुसती आंधळी तंत्रविद्या कामाची नाही. हा विज्ञानाचा डोळसपणा आणि धर्माची भावनिक उत्कटता यांच्या बळावरच माणसाचा देव करण्याची प्रतिज्ञा आपली झाली पाहिजे. ‘आई’ या विषयावर बोलताना ते सांगत की आपत्य प्राप्ती झाली म्हणजे मातृत्व सिद्ध होतं असं नाही तर मातेने त्यासाठी किती तप आचरल आहे यावर ते अवलंबून आहे. अपत्यामध्ये जे काही गुणधर्म येतात ते माते कडूनच बहुदा संक्रमित होतात. बऱ्याच मोठ्या माणसांच्या महत्तेचे उगमस्थान मातेच्या जवळ आढळते. वडील काही मोठे नसतात असे नाही पण त्यांचा जास्त सहवास लाभत नाही. मातृत्व हे अंगभूत असतं, निसर्गदत्त असतं,स्वाभाविक असतं ती एक प्रेरणा असते आणि हे मातृत्व सर्व प्राणीमात्रात दिसून येते.’
या साठी बोलणे ऐकणे याबद्दल त्यांचे मत होते की वक्त्याच्या बोलण्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व आपल्या व्यक्तिमत्त्वाला नकळत उंची येते, लोकमत जागृत करण्याचे कार्य घडते कारण लोकमत हा लोकशाहीचा खरा आधार आहे. लोकशाहीची उंची त्याच्यावर अवलंबून आहे. उद्यासाठी वक्ते निर्माण करावयाचे असतील तर गावोगावी वक्तृत्वाची व्यासपीठ निर्माण झाली पाहिजेत.खरं तर आपल्याकडे सांगण्यासारखं काही असलं, सांगावसं वाटलं,मन तस प्रयत्न करू लागलं तर बोलण्यासारखं काही ही सोपं नाही.’
याशिवाय प्राचार्य हे स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व अन्य महापुरुषांच्या जीवनावर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार पेरत असत. विषय कोणताही असो त्यावर मुद्देसूद व विचारपूर्वक मांडणी ते करत. शब्दांच्या, वाक्यांच्या सहज कोट्या करून विनोद निर्मिती करत. मराठी भाषे इतकेच त्यांचे इंग्रजी भाषेवर ही प्रभुत्व होते. अशा या वैखरीच्या वारकऱ्याने श्रोत्यांना पांडुरंग समजून वाणीच्या माध्यमातून त्याची पूजा केली व हे व्रत त्यांनी शेवटपर्यंत जपले.ते आमच्या संस्थेत दोन दोन वेळेस वआले.मला त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण्याचे भाग्य लाभले. एम.ए.ला दयानंद महाविद्यालयात असताना जिल्हास्तरीय यूवकमहोत्सवात वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलो होतो ते पारितोषीक सरांच्या हस्तेच स्विकारले होते.मला या विषयावर बोलण्यासाठीची प्रेरणा सरांकडूनच मिळाली होती.अशा या वक्तृत्वाच्या क्षेत्रातील भिष्माचार्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करून.मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५