व्यासपौर्णिमा /गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा कोटी कोटी प्रणाम.

मानवी जीवनात गुरूला महत्वाचे स्थान आहे. याचबरोबर भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्नशील असतो.

चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.

अर्थात गुरु म्हणजे आई- वडील,शिक्षक. गुरुला ईश्वराचे दुसरे रूप मानतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता.

ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घे तू’ असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे. कारण शेवटी “गुरुविण कोण दाखविल वाट..”..

आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण त्याच्या कडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके या शिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरूच असतात. जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. गुरुला वयाचे, जातीचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो.

गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांचे नावलौकिक करायला हवे.


हिच गुरुंना अर्पण केलेली खरी गुरू दक्षिणा राहिलं.

सौ.रूचिरा बेटकर नांदेड
मो.9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *