( दि.३१ जुलै २०२१ रोजी मा. वैजनाथ खांडके साहेब हे प्रदीर्घ सेवेनंतर शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन )पुणे,महाराष्ट्र राज्य या पदावरून अत्यंत कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.)
मानवाला जगात काहीच अशक्य नाही. हे त्याने चंद्रावर,मंगळावर पाऊल ठेऊन सिद्ध केले आहे.तसेच आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीनेही हे दाखवुन दिले आहे. जगातल्या अनेक गुढ रहस्याचे प्रगटीकरण ही केले आहे. काही बाबतीत तो या कामी अपूर्ण आहे.असे असले तरी ही त्याने केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे व जिद्दी मुळेच त्याला हे सगळे प्राप्त करता आले आहे. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर महाराज अभ्यासाचे महत्त्व विशद करताना म्हणाले’ अभ्यासासी काही l सर्वथा दुष्कर नाही l म्हणोनी तु मज ठाई lअभ्यासे मिळ ll ‘तर संत तुकाराम महाराज म्हणाले ‘ असाध्य ते साध्य करिता सायास l कारण अभ्यास तुका म्हणे ll’ त्यासाठी अभ्यास असावा लागतो तसीच मनात जिद्दही असावी लागते. त्यातून माणूस यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत जातो.पण त्याचे पाय हे जमिनीसी सतत घट्ट बांधलेले असले पाहिजेत.असे असले की मग तो यशाने हुरळून ही जात नाही आणि अपयशाने खचुनही जात नाही. आपल्या वाट्याला आलेले काम हे ईश्वरीय पुजा समजूनच तो अत्यंत निष्ठेने पार पाडतो.काम हाच त्याचा श्वास झालेला असतो. असेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सततचा अभ्यास व जिद्दीची जोड याच्या माध्यमातून मार्गक्रमण करत ध्येयाचा ध्यास घेत अधिकारीपदाची अनेक शिखरे गाठुन ज्यांचे पाय सतत जमीनीची घट्ट बांधलेले राहीले असे व्यक्तिमत्व म्हणजे मा.वैजनाथ खांडके साहेब होत.
वैजनाथ खांडके साहेबांचा जन्म ०७ जुलै १९६३ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील हातोला नामक छोट्याशा गावी एका शेतमजूर कुटुंबात झाला. घरात अठरा विश्व दारिद्र्य. आई-वडील अशिक्षित पण संस्कारी.त्यांच्या मनाला आपण अशिक्षित असल्याची सततची खंत होती म्हणून आपली मुले शिकावीत ही तीव्र इच्छा. त्यासाठी त्यांनी आपले चिरंजीव वैजनाथ यांना गावाच्या प्राथमिक शाळेत शिक्षणासाठी ठेवले.नंतर माध्यमिक शिक्षणाची गावात व्यवस्था नसल्यामुळे त्यांना महात्मा फुले हायस्कूल हातोला ता.अंबेजोगाई येथून पुढील शिक्षण प्राप्त करावे लागले.तर इयत्ता दहावी या वर्गाचे शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची शाखा असलेल्या कंकालेश्वर विद्यालय, बीड येथून पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे तथा बी.एस्सी., बी.एड.चे शिक्षण अंबाजोगाई येथून पूर्ण केले तर पदव्युत्तर एम.एस्सी.(रसायनशास्र )चे शिक्षण यशवंत महाविद्यालय,नांदेड येथून मिळविले.
शिक्षण घेताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्या काळाच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पडला.त्यात गावात शिक्षणाची उज्वल परंपरा निर्माण करणाऱ्या कुंडलिकराव तरकसे गुरुजींचा प्रभाव राहिला. त्याच बरोबर वसंत उगले, सुगंध ओगले, एकनाथ सुरवसे,श्री दिगंबर (तात्या) चव्हाण यांचा प्रभाव ही पडला. शिक्षण घेताना अत्यंत चांगले मित्र मिळाल्यामुळे ही त्यांना एक वेगळी दृष्टी मिळाल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्या काळात त्यांना मिळालेले जे त्यांचे मित्र होते त्यात वसंत धिमधिमे, आनंद जोगदंड ,सतीश टाक, बोकारे सर,पोहनेरकर यांचा आवर्जून उल्लेख येतो. गावातील डाव्या विचारसरणीने गावात जातीभेदाला गरीब-श्रीमंत ह्या भेद भावाला थारा दिला नव्हता. त्याचाही नक्कीच जीवन घडविण्यात फायदा झाल्याचे ही ते सांगतात.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रथमतः शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी १९८७ साली मिळाली.या काळातही तत्कालीन प्राचार्य पी.जी.पाटील तसेच त्या काळचे सहकारी प्रा.ज्ञानोबा कांबळे,प्रा.गायकवाड सर, प्रा.आर. जी.जाधव, प्रा. विजयकुमार पाटील यांचा सहवास लाभला व त्यामुळे अध्यापनाला एक प्रकारची धार आल्याचे ही ते सांगतात.
तदनंतर त्यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग- २ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत १९९१ ला निवड झाली व पहिल्यांदाच गटशिक्षणाधिकारी म्हणून ते आमच्या मुखेडला रुजू झाले.१९९१ ते १९९६ या कालावधीत त्यांनी मुखेडला गटशिक्षणाधिकारी म्हणून अत्यंत चांगले काम केले. येथे असताना माजी आमदार दलितमित्र कै.गोविंदराव राठोड साहेबांसी त्यांचे अत्यंत स्नेहाचे नाते होते. तदनंतर ते परभणी येथे पंचायत समितीला उपशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी १९९८पर्यंत काम पाहिले. १९९३ ते २००३ पर्यंत उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे कार्यरत राहिले. त्यानंतर २००३ ते २००८पर्यंत लातूर येथे शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक, लातूर येथे कार्यरत राहिले. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांनी नांदेड येथे जि.प.मध्ये उपशिक्षणाधिकारी (प्रा.) येथे काम पाहिले.तर मागील सर्व कामाचा उत्तम अनुभव पाठीशी असल्यामुळे शासनाने २०१० मध्ये महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग-१ या पदावर पदोन्नती केली व जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून पदस्थापना केली. तदनंतर २०१४ ला पुन्हा पदोन्नतीने शिक्षण उपसंचालक म्हणून लातूर येथे पदस्थापना झाली येथे ते २०१७ पर्यंत कार्यरत होते.२०१८ ते २०२० या कालावधित औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून काम पाहिले. यानंतर २०२० पासून आजतागायत पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालय शिक्षण उपसंचालक ( अंदाज व नियोजन ) व शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारून काम करताहेत.
वरील प्रमाणे त्यांचा एकूण शिक्षण व सेवा प्रवास राहिला आहे. याबरोबरच वरील काळात साहेबांना शासनाने अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. तो असा- संचालक, मिपा औरंगाबाद,संचालक,राज्य प्रौढ प्रशिक्षण संस्था,अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळे, औरंगाबाद व लातूर, शिक्षण उपसंचालक पुणे, शिक्षण सहसंचालक (अंदाज /नियोजन ) शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) इत्यादी.
आपल्या एकंदर सेवेच्या काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम तन्मयतेने राबविले. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी झाला. ज्यात नांदेड जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी म्हणून श्रीकर परदेशी असताना त्यांच्या कार्यकाळात चौथी, सातवी स्कॉलरशिप करिता दहा वर्षे व तेरा वर्षे वयाच्या मुलांचे निवासी वर्ग आयोजित करुन राज्यात चौथी व सातवी परीक्षेत नांदेड जिल्हा अव्वल क्रमांकात आणण्यात मोठे योगदान दिले. साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून मुखेड तालुका राज्यात व विशेषतः नांदेड जिल्ह्यात अव्वल आणण्याचे काम केले. शिक्षण उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना मराठवाडा विकास मंडळाचा कार्यक्रम तसेच दहावी निकाल सुधार प्रकल्प राबविला.उस्मानाबाद येथे कार्यरत असताना जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गरीब, होतकरू मुलांकरता एम.पी.एस.सी.च्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करून घडवुन आणलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी एम.पी.एस.सी. परीक्षेत यशस्वी होऊ शकले.
मिपाचा संचालक म्हणून कार्य करताना संपूर्ण राज्यात मा.नंदकुमार साहेब शालेय शिक्षण विभागाचे सचिव असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या करिता Leadership devpt. कार्यक्रम प्रभावीपणे राबविला या कामी एन.सी.ई.आर.टी.चे व एस. सी. ई. आर. टी.चे सहकार्य लाभले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही गुणवत्तेची चळवळ प्रभावीपणे राबविण्याची संधीही त्यांना राज्याचे उपसंचालक म्हणून कार्य करताना मिळाली.या प्रकारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवून ते पूर्णार्थाने राबविण्याचा ध्यास घेतला.
प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीच्या नंतरच्या नियोजना बध्दल त्यांना विचारले असता ते सांगतात की भविष्यातही वंचितांच्या शिक्षणाकरिता यथाशक्ती ते प्रयत्न करणार आहेत.त्यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांना आता एक आदर्शवत प्रकारची शेती करावयाची आहे. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे.
आपल्या जीवनाला आकार देण्यात ज्यांचा ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव ते व्यक्त करताना दिसतात.त्यात सर्वप्रथम ते आपल्या शेतमजूर असलेल्या आई-वडिलांच्या प्रती नेहमीच आदरभाव व्यक्त करतात व त्यांच्या कष्टामुळेच व संस्कारामुळेच मी घडलो हे प्रामुख्याने सांगतात. तसेच त्यांच्या शिक्षणात ज्या ज्या नातेवाईकांनी मदत केली त्यात त्यांचे मेहुणे श्री.सोपान सोनवणे, मोठी बहीण सत्यभामा सोनवणे, मेहुणे देविदास सोनवणे यांचे मोठे योगदान व आशीर्वाद लाभल्याचे ही ते सांगतात. तसेच त्यांच्या ३४ वर्षाच्या सेवेच्या काळात त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या त्यांच्याप्रती ही ते कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. त्यात त्यांचे प्रशासकीय गुरू श्री एम. आर. पाटील- देशमुख, श्री. पी.आर. राठोड, गोविंद नांदेडे, श्री ठाकरे साहेब, श्री खतीब साहेब, श्री आनंद जोशी तसेच आयुक्त शिक्षण कार्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले आयुक्त शिक्षण श्री धीरज कुमार साहेब, श्री भापकर साहेब, श्री सोळंकी साहेब हे येतात.
त्यांची गुणवैशिष्ट्ये पहायची ठरवली तर ते अत्यंत कर्तव्यनिष्ठ म्हणून कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. हाती घेतलेल्या कामाचा निपटारा केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. आपलाला शासनाने प्रश्न सोडविण्यासाठी बसवले आहे प्रश्न वाढविण्यासाठी नाही ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अधिकारी, ज्या विभागाचे ते काम करतात त्या विभागाचे सर्व आदेश व नियम अगदी तोंडपाठ करून काम करणारे अधिकारी, साहेबीपणाचा कुठला ही अहंकार न बाळगता कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने व सौहार्दपुर्ण रीतीने संबंध ठेवणारे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करणारे,गावकऱ्यांसी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे, प्रशासनावर आपली नैतिक छाप ठेवणारे, कर्तज्ञताभाव अंगी बाळगून काम करणारे, कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे, अस्या विविध गुणवैशिष्ट्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व गुंफले गेले आहे.
माझा आणि त्यांचा पहिल्यांदा परिचय २००३ साली झाला. पहिल्यांदा त्यांना भेटायला गेल्यावर असे वाटले की हे मोठ्या पदावरील व्यक्ती आहेत ते आपणास निट बोलतील का ? आपण घेऊन आलेल्या प्रश्नाचे उत्तर आपणास व्यवस्थित सांगतील का ? अशी धाकधूक होतीच पण जेंव्हा त्यांच्याजवळ गेलो तेंव्हा अनुभव आला की हे अधिकारी माणुसकीने ओतप्रोत भरलेले आहेत.प्रश्नांचा गुंता वाढू न देता सकारात्मक दृष्टी ठेवून सोडवणारे आहेत.जीवनात एकदा स्नेहबंध जोडले की टीकवणारे आहेत.त्यांचे मित्र प्रा.मुकुंद बोकारे यांच्यामुळे मला त्यांचा जवळ वेळीवेळी जाण्याचा संबंध आला व मला माझ्या शिक्षक प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यास मदत झाली. त्यांनी मला पहिल्या भेटीपासून जे प्रेम दिले ते आजपर्यंत वाढतच गेले पण कमी झाले नाही. आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा मा. संभाजीराव केंद्रे साहेब यांच्या प्रतीही ते नेहमी कृतज्ञता व्यक्त करतात. आमचे साहेब ही सांगतात की खांडके साहेब एक सक्षम अधिकारी आहेत.दुरदृष्टी ठेवुन काम करणारे समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देणारे अधिकारी आहेत. आज खांडके साहेबां सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या समाजाला गरज आहे.त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे ही उणीव नेहमीच जाणवत राहाणार आहे.
अशा प्रकारे एक शेतमजुराचा मुलगा ज्याला लहानपणी शिक्षणासाठी गावात सोय नसल्यामुळे आजूबाजूच्या गावी जाऊन शिक्षण घ्यावे लागले. तोच विद्यार्थी पुढे पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतो कनिष्ठ महाविद्यालयाचत प्राध्यापक म्हणून काम करतो पण एवढ्यावरच थांबत नाही तर एम.पी.एस.सी.परीक्षेतूनद्वारे गुणवत्ता सिद्ध करुन अधिकारी बनतो व उच्च पदाचा एकेक पायर्या चढायला लागतो पण आपला भूतकाळ मात्र कधीच विसरत नाही. आपल्यासारखे शिक्षण घेतानाच्या आडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.अशा सतत कामालाच श्वास समजून काम करणाऱ्या व्यक्तीच्या सेवेला कधीच निवृत्ती नसते. तो सतत काम करतच राहतो पण शासनाच्या नियमाने सेवानिवृत्ती सारखा कार्यक्रम करावा लागतो. त्यांना सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा व पुढील आयुष्यात त्यांच्याकडून विविध माध्यमातून समाजसेवा घडावी व त्यासाठी ईश्वराने त्यांचे आयू व आरोग्य अबाधित राखावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या वरती चालविलेल्या लेखन प्रपंचाला पूर्णविराम देतो.
प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय,
शेकापुर,ता.कंधार जि.नांदेड
भ्रमणध्वनी-९४२२३८०४४८