बियाचं रूपांतर रोपामध्ये होण्याची प्रक्रिया म्हणजे धर्म. रोपाचं झाड, झाडाला फांद्या, फांदीला पानं – फुलं ! फुलांना फळं धरणं, ती परिपक्व होऊन इतरांच्या उपयोगी पडणं म्हणजे धर्म ! धर्म देण्याची भाषा करतो. स्वतःसाठी काही मागत नाही ! धर्म प्रेम देतो, प्रेम करतो, बदल्यात स्वतःसाठी काहीही अपेक्षा करत नाही !
नामदेव महाराजांनी स्वतःसाठी काय मागितलं ? ज्ञानेश्वरांनी काय मागितलं ? संत तुकाराम, संत चोखामेळा, संत रविदास, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत जनाबाई, संत विसोबा, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आदी संतांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. जे काय मागितलं ते समाजासाठी मागितलं. जगासाठी मागितलं. विश्वासाठी मागितलं. त्यांचा प्रवासच मुळी वैयक्तिकाकडून वैश्विकतेकडे होता. पण तेही लोकांना रचलं. अनेकांचे खून झाले. काहींचे छळ झालेत.
माणसाचा प्रवास असा विस्तारत गेला पाहिजे. नदी कशी करंगळी एवढ्या जागेतून जन्माला येऊन सागराला मिठी मारताना मात्र विस्तारत जाते. शेवटी अथांग सागराचाच एक भाग होऊन जाते. आपल्यालाही तसं व्यापक होता आलं पाहिजे. तोच धर्माचा अर्थ आहे. तोच शिक्षणाचा अर्थ आहे. तोच संस्काराचा अर्थ आहे ! धर्म याहून वेगळा असूच शकत नाही !