वडिलांमाघारीची आमची आई.


आम्हा सर्व भावंडांना शिकवून सवरून, स्वतःच्या पायावर उभे करून, बहिणींचे लग्न करून, आमच्या वडिलांनी ( किशनराव बाबा आमलापुरे यांनी ) दि १४ आँगस्ट ०४ रोजी जेवढे अचानक तेवढेच अवेळी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांची १७ वी पुण्यतीथी. त्यांची आठवण आणि आम्हासाठी घेतलेल्या कष्टास प्रथमतः विनम्र अभिवादन. आम्हा सर्वांचे ओढून ताणून का होईना पण ठीक आहे. पण आईच्या वाट्याला बऱ्याचवेळा काही प्रमाणात कुचंबणा आली. त्याविषयी…..


वडिलांचं तसं म्हणजे जसं अवेळी तसं अचानक जाणं कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता. पण तो आईसाठी सर्वात मोठा धक्का होता. वडिलांचं कायमस्वरूपी जाणं झालं पण आईची मात्र घाण निघाली ती कायमचीच. ती एकाकी पडली. वडिलांनी दुखात भर किंबहुना दुखाची भर टाकली आईच्या पदरी. आज घर – वाडा, नातवंडं – पंतवंडानी भरलेला आहे. पण आईचा जगण्यातील रस ओसरला आहे.


एका परीनं ते बरोबर आहे. तसं होणारंच होतं, होतंच आले आहे. कारण शेण पडले तर ते माती घेऊन उठते असं म्हणतात. मग हे तर एका हाडामासाच्या ‘ बाप माणसाचे ‘ ,जोडीदाराचे, किंबहुना आईच्या सौभाग्याचे कायमचे हे जग सोडून जाणे होते.आज शेती – भाती ,आम्ही सर्व जाग्यावर आहोत. पण जोडीदारा अभावी आईचे मन वाऱ्यावर आहे. बाकी सर्व काही इथे असतांना फक्त एकच झाले आहे.

ते म्हणजे जोडी फुटली आहे. आईला मात्र नशिबच् फुटले असं वाटतं. असे ती समजते. मी अभागी आहे असं ती मानते आणि म्हणते. कधी कधी कायी बरं नाही, आन बरं हाय बी ! असं म्हणते. यातून ती आपलं म्हणणं, जगणं सांगून जाते.हे सांगताना अर्थातच सुर आणि स्वर बदललेला असतो. त्यामुळे हे ऐकनं मला भुतकाळात घेऊन जाते.


मी म्हणणार नाही की आईवडीलांचा ‘ राजा – राणीचा ‘ दरबार होता.पण एवढे मात्र निश्चितपणे सांगतो की, आजच्या पेक्षा कमी भरजरी आणि मोडका तोडकाच का होईना पण तो स्वतःचा होता. शिवाय महत्त्वाचे म्हणजे तो समाधानाचा होता. कमळंत एखादीच नोट, पण भल्या पहाटे सोबत घेतलेला चहाचा घोट, दिवसभराची उर्जा देत असावा. ताकाचा डेरा, आपापल्या परीने फुलविलेल्या शेतमळ्यास फेरा, आठवडी बाजार, त्याची स्वतावरंच मदार. कुणाच्या तरी हातापायाकडे बघण्याची गरज नाही. स्वतः होउन हसमुख ,पाहुण्यांची करायची उठबस. संदकाची चावी, पोरांचं उज्वल भविष्य घडवणार भावी. अंथरूण स्वतःपुरते असणारा, कुणाच्या आद्यात मद्यात नसणारा.सोडलेला बाजार आणि बऱ्याचवेळा अंगावर काडलेला आजार. आपली नसतानाही वाड्याच्या ढाळजीची वाड्यातील माणसाइतकीच काळजी घेणारी जोडी आणि संसार सुखाचा होता.


परवा मी वाडीला गेलो होतो. आमच्या आईची दोस्तीन विठामामीची गणपतीच्या वट्यावर सहज भेट झाली. चरणस्पर्श करून, शेजारी बसून माझे नाव सांगितलो. मी भगवान हाव. आमलापुऱ्याचा ! मामीने प्रथमतः आर्शिवाद दिला. भुवया उंचावून पाहीलं माझ्याकडे. चेहरा आनंदी झाला, डोळे चमकदार वाटले, मन भरून आलं असावं त्यांचं. माझा चेहरा निरखून : बरा हाइस काय.मी : हो मामी, चांगला हाव.मामी म्हणाल्या आन माय.मी : माय पण चांगली आहे. फक्त कंबरेला त्रास आहे. तो आता सोबतच येणार आहे वाटतं.


माझी ती क्रिया आणि आमचा तो संवाद मामीच्या ( दगडू जक्कलवाड ) एका नातवाने पाहीली आणि ऐकला. तो पण काही वेळ स्तंभित झाला. पण यात नवल ते कसले ? सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात दुसरे काय असणार आहे. पीला – पाजला तर चहा. नाही तर पडलं तर पाया, आर्शिवाद जाणार नाहीत वाया म्हणून.


वयामुळे, जोडीदार जाउन अपंग झाल्यामुळे, आजारपणामुळे, उत्पादन घटल्यामुळे माणसावर अशी वेळ येते ही. पण त्यामुळे कुणीही उठावं आणि त्रास देत सुटावं. असे होउ नये. कारण हे दिवस प्रत्येकालाच येत असतात,येणार आहेत. याचं एक सुजाण भान हवं.
आपल्याकडे ‘ घर की मुर्गी….’असं म्हणतात.आपल्याला जवळच्यानं विशेषतः लहान माणसानं काही सांगितले तर ते आवडत नाही.

एक म्हणजे तो उपदेश वाटतो. बक्कळ शहाणा आहेस, असं वाटतं. तसं म्हणतात देखील. इतका शहाणा असतास तर इतके कशाला लागले असते ? असही म्हणतात. ते बरोबरच आहे. लहान असल्याने सर्व रेषा आणि क्रतत्व माहिती असतंय,वडीलधाऱ्या मंडळींना.
तरीही ०४ – ०५ वेळा मी कळकळीची विनंती केली होती. माय तूं बाई आहेस, आई आहेस.

बाईची तुलना प्रथवीशी, जमीनीशी केली जाते. म्हणजे तुझ्या मनात खूप सहनशीलता आहे. आम्हासरख्यांनी त्रास दिला, टाकून बोललं, कमी जास्त झाले, नाव ठेवले, वेड्यात काढले, कोड्यात बोलले, ऐकलं नाही, ऐकून सोडून दिले, बघून न बघीतल्यासारखं केलं, बहिणींना कमी जास्त झाले, कुणाचा फोन आला नाही, कुणी तो दिला नाही, कुणी लावून दिला नाही, कुणी गावाला – प्रसादाला – देवाला जातांना सोबत केली नाही.

डिकाशमध्ये टाकायला लिंबू आणून दिले नाही, काय दुखतंय,काही पाहिजे काय ? ही विचारपूस केली नाही, कुणी तुझ्या आधाराची काठी नाही झाले, कुणी काठी हातात नाही दिली, चष्मा हुडकून आणि आणून नाही दिला, नसंची डब्बी शोधायला मदत नाही केली तर……..तूं आधीच जगापेक्षा मोठी आहेस, आणखी मोठी हो आणि दे सोडून आम्हा नालायकांना !
परवा म्हणजे ०५ आँगस्ट २१ रोजी आमची कामानिमित्त भेट झाली.

आर्धा तास काही तरी बोलणं झालं. नेहमी प्रमाणे मी म्हणालो माय ५०:०० रूपये देऊ काय? ती म्हणाली नको. मी : २० रूपये देऊ काय ? ती म्हणाली नको. आम्हा माय – लेकराचा हा संवाद चालू असताना आमच्या जवळ रामराम टापरे, रुईकर, हे पाहुणे होते. ते म्हणाले, आजी कुणी थोडे पैसे दिले तर घेत जावं. काही फरक पडत नाही. एकतर तुम्ही मागण्या अगोदर आणि थोडे पैसे द्यायलेत. त्यामुळे घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा माईला ओशाळल्यासारखे वाटलं.


जस्ट उद्या सकाळी म्हणजे दि ०६ आँगस्ट शिवरात्र होती. घरात तीन माणसे. तीघांना पण शिवरात्र म्हणजे उपवास. मी आर्धा किलो पेंडखजूर घेतली आणि माईला दिली. तेव्हा ती नको नको म्हणत होती. शिक्षक बंधूनी एकदा घेऊन दिलेली आठवण माईने सांगितली. तेवढ्यात बागवान : आजी घेऊन दिल्यास खात जावं. शरीराला बरं असतय. एकदा माणूस गळाल्यालर काय उपयोग ? बिचारा घेऊन द्यायला की. त्यावर माय : बरोबर हाय. पण दुसरं बी बघावं लागतंय की त्याला. काही वेळाने बोलताना माय : आज दोन जण भेटले बापा, आजी पैसे घेत जा, खायला घेत जा म्हणणारे. आणि माईचा चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं.

म्हणजे इतरांनी सांगितले की पटतंय आणि आम्ही मात्र ,’ घर की मुर्गी……
यापूर्वी मी दि ११ जुलै २१ रोजी आमचे मदवे बंधू दतात्रय आमलापुरे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या वास्तू शांतीसाठी गावी गेलो होतो. त्यावेळी म्हटलं माय डोळ्याचा ड्राँप आणून देऊ काय ? त्यावर ती म्हणाली नको. मी म्हणालो तसं काही नाही माय.

आपल्याला बरं वाटणाऱं, कामावर पडणारं कुणी काही देत असेल तर लगेच बरं म्हणून घ्यावं. इतरांचं आणि पैसाचं सोडून द्या, राहू द्या बाजूला. आपल्याला २०- १९ ,तोळा – मास्याचा आनंद आणि आराम भेटतोय ना, सुख मिळतंय ना ? मग, वाट कशाची बघताय ? म्हणा की हो आणि आणू द्या की डोळ्याचा ड्राप !
शेवटी ज्यांची कुणाची असेल त्यांना आठवण करून आणि त्यांची माफी मागून त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावं वाटतं,


” ती जाचातून चालून थकली
ती वर सर्वांची शिरजोरी.
तीच्या राशीवर आपण बसलो
नका दाखवू कुणी शिरजोरी.”


प्रा .भगवान आमलापुरे.
फुलवळ : ९६८९०३१३२८
शं गु महाविद्यालय, धर्मापुरी.
ता परळी वै

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *