मी २०.११.१९८६ रोजी जि.प.हायस्कूल हदगाव येथे प्रथम समयी रुजू झालो. माझ्यासाठी सगळं काही नविन होतं. सहकारी शिक्षक, विद्यार्थी वर्ग व गाव सगळंचं नविन होतं. जि. प. हायस्कूल हदगाव शाळेची इमारत निजामकालीन होती. इमारत “ओ” आकाराची होती. शाळेच्या प्रवेशव्दारालाच कमानीचं आकार दिलेलं होतं. सुंदर कमान केलेली. त्या कमानीवर सुंदर उठवदार अक्षरात शाळेचं नाव लिहीलेलं होतं.
माझ्यासाठी सर्वकाही नविन अनओळखी होतं. श्री.आवचार सरांच्या मदतीने मी शाळेत रुजू झालो. शाळेचं प्रवेशव्दार उत्तररेकडे तोंड करून होतं. प्रवेशव्दारातून आत शिरलं की डाव्या बाजूला मुख्याध्यापक साहेब याचं टुमदार कार्यालय होतं. शाळेची छोटीशी टुमदार इमारत होती. शाळेच्या आतल्या बाजूस भल्लमोठं जांभुळ वृक्ष होतं.
मुख्याधापक आदरणीय अतकूरकर सर सरळ, सालस व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्याकडे पदांचा कुठलाच मीपणा नव्हता. गर्व नव्हतं. त्यांच्या बोलण्यात मृदूता व प्रेम होतं. हळूहळू ओळखी वाढत गेल्या. शाळेतील गुरुजी व विद्यार्थ्यांमध्ये मी चांगलाच रमलो. काही दिवसानंतर हायस्कूल जुन्या इमारतीतून भव्य अशा नविन इमारतीत स्थलांतर झाले. या इमारतीत प्रशस्त कार्यालय, मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांसाठी विश्राम कक्षही होतं. शाळेतील शिक्षक मंडळी अनुभवी होती. आपपाल्या विषयात तज्ज्ञ होती. मराठी विषय शिकवण्यासाठी सौ.कुळकर्णीताई, श्री भाऊ (भोजनकर ) सौ.पोटेकरताई व आदरणीय प्रभाकरराव अक्कावार सर होते.
मी नविन असल्यामुळे फारसं कोणाशी बोलत नसे. वर्गात शिकवणे, विद्यार्थ्यांबरोबर खेळणे व शाळा सुटल्यानंतर आवचार सरांबरोबर तर कधी पदमाकर सरांसोबत फिरणे असंच माझं ठरलेलं होतं. वरील मंडळी मराठी विषयात तज्ज्ञ होती. पण अक्कावार सर हे त्यांच्यापेक्षा वेगळे होते. अक्कावार सर विषयात तज्ज्ञ तर होतेच पण ते चांगले कलाकार होते. विनोद सांगण्यात पटाईत होते. विनोदाचं अचुक टाईमींग ते साधत असत.
अक्कावार सर प्रत्येक कार्यक्रमात प्रसंगानुरूप विषयाला धरून भाषण करायचे. त्यांनी बोलत असताना सर्व विद्यार्थीगण त्यांचे कानं सरांना देवून टाकत. त्यांनी बोलतना जेवढी शांतता तेवढचं हस्यांचा फवारा उडायचं. सर्वजण खळखळून हसायचे. सर्वात आनंदाची लहर पसरायची. शिक्षक कक्षातही सर सर्वांना काही तरी नविन किसा सांगून सर्वांना हसवायचे.
अक्कावार सर उंचीला थोडे बुटकेच होते रंग काळा सावळा. नाक थोडसं मध्येच दबलेलं नकटं पण त्यांच्या चेहऱ्याला ते शोभुन दिसायचं. चेहरा थोडसं गोल. टपोरे डोळे. डोळे नेहमीच लाल दिसायचे. डोळ्यातील बारीक रक्तवाहिण्या लालभडक दिसायच्या. पांढरे केसं मागे फिरलेले ,विचरलेले असायचे. सर त्या केसांना कधी कधी कलप लावायचे. पांढरं शर्ट व पांढरं पॅन्ट ते परिधान करायचे. ते इनशर्ट करून शाळेत यायचे. डोळ्यावर करड्या रंगाच्या काड्या असलेला चष्मा वापरावयचे . तलवारी कट मिशा सरांनां शोभुन दिसायचे . अक्कावार सर म्हणजे हस्याचा झरा. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतून ते विनोद सांगायचे. सर्वांसोबत मनमोकळेपणाने वागायचे.
सरांकडे त्यावेळी एसएससी परीक्षा विभाग होता. दहावी परीक्षेचे ते फॉर्म भरायचे. फॉर्म भरताना मला बोलावून घ्यायचे. फॉर्म कसा भरायचं हे मला समजावून सांगत. सरांचं मराठी आणि इंग्रजीचं अक्षर आगदी मोत्या सारखं निर्मळ होतं. काही लोक म्हणतात ज्याचं अक्षर सुंदर ज्यांची सही वाचनीय असते ती मानसं मनानं निर्मळ असतात. हे सरांच्या बाबतीत तरी खरं होतं असे मला वाटते.
सरांची लिहीण्याची एक आगळी वेगळी पद्धत होती. ते आपण लिहीताना पेन पकडतो तसे ते पेन पकडत नसत. सर लिहिताना पेन एका विशिष्ट पद्धतीने धरत. ते लिहीताना पेन अंगठा व तर्जनीच्या मध्ये धरून लिहीत. मी तसा प्रयत्नही करून पाहिलो पण मला ते काही जमले नाही.
अक्कावार सर म्हणजे हरहुन्नरी व्यक्तीमत्व लाभलेलं एक भला माणूस. ते कलाकार होते . ते कवी होते .मी नविनच. माझ्याकडे इंग्रजी विषय. मी मुलांना बऱ्यापैकी माझं विषय शिकवायचो. माझ्या परिनं विषयाचा भाग समजावून सांगायचो. विषय शिकवताना मी रमून जायचो. पण सार्वजनिक ठिकाणाचं स्टेज करेज माझ्याकडे अजीबात नव्हते व आजही नाही. एकदा शाळेत फक्त तालुक्यातील होते का तीन चार तालुक्यातील शिक्षकांचे इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण जि. प. हा. हदगाव मध्ये ठेवलेले होते. विषय तज्ज्ञ म्हणून माझं नाव होतं. मी नविन असल्या मुळे चक्क घाबरून गेलो होतो. छातीचा भाता फुग्या सारखं लईच फुगलं होतं. छाती धडधड होती. काळीज लपलप करत होतं. मी माझे हातपाय गाळून बसलो होतो. काय करावे हे मला कळत नव्हते. रजा घ्यावी असा विचार करत होतो. यातून कशी सुटका होईल याचंच विचार मनात काहूर माजवत होतं.
तेवढयात अक्कावार सर मी बसलो त्या ठिकाणी आले व मला म्हणाले, “अरे येथे असं गुपचूप का बसलास? काही त्रास होतो का? “मी म्हणालो,” नाही सर काही त्रास होत नाही. मला नोकरीला लागून दोन चार महिने ही झाले नाहीत” सर माझे बोलणे मध्येच तोडत म्हणाले,”मुद्द्यांचं बोल.” मी म्हणालो,”सर, मला येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आदेश आलेत.”सर म्हणाले,”मग काय झालं चांगली गोष्ट आहे तुझ्यासाठी.” मी म्हणालो,” सर माझ्याकडे स्टेज करेज नाही. मी स्टेजवरून कधी बोललोही नाही.” “अरे चल सोड भिती. माझ्या सोबत चल. मी थांबतो तुझ्या सोबत. कसं बोलायचं ते मी सांगतो. अजीबात घाबरायचं नाही.”
मी अक्कावार सरांसोबत दहावा “अ” म्हणजे शाळेची दक्षिण बाजू पण वर्गाची खोली पूर्वपश्चिम आहे व खोली उत्तरेकडे तोंड करून आहे त्या वर्गात गेलो. तेथे शिक्षकांनी वर्ग खचाखच भरलेलं होतं. सर्व शिक्षक अनुभवी व वयस्क दिसत होते. जवळपास सर्वच गुरुजींचे केसं पांढरे झालेले. ते पांढरे केस केवळ वय वाढल्यामुळे झाले नव्हते तर ते अनुभवानेही पांढरे झालेले होते. वर्गाच्या स्टेजवर अक्कावार सर थांबले. माझ्या विषयी बराच वेळ त्या प्रशिक्षणार्थी समोर बोलले. म्हणाले,”नविन आहे माझं फलंदाज पण बॅटींग चौफेर करतोय. नविन आहे पण चुणचुणीत आहे. सांभाळून घ्या.”मी स्टेजजवळ थांबून होतो; पण स्टेजवर गेलो नव्हतो. हिंमत होत नव्हती. माझे हात-पाय थरथर कापत होते. काळजाची धडधड वाढाली होती. तेवढ्यात अक्कावार सरांनी माझं हात धरून वर स्टेजवर घेतले. सर्व बसलेल्या शिक्षकांना पाहून भितीने मला चक्कर आली. दोन्ही हातांनी माझं डोकं धरून मी मटकन खाली बसलो. सर्व गुरुजी खोखो करून हसू लागाले. कोणीतरी बॉलींग करण्यापूर्वीच मी त्रिफळाचित झालो असे मला वाटले.
अक्कावार सर मला तेथून वर्गाच्या बाहेर आणले व म्हणाले,”बघ हिच सुवर्ण संधी आहे तुझ्यासाठी. आज जर तू हिम्मत हरलास तर जीवनभर कधीच तू स्टेजवर थांबू शकणार नाहीस. धाडस कर. तुझ्याकडे तुझ्या विषयाचं ज्ञान आहे. तुला जेवढं सांगता येते तेवढंच सांग. भिवू नकोस. घाबरू नकोस. त्या लोकांच्या वयाला घाबरू नकोस.”हे धिराचे बोल ऐकून मला हिंमत आली. मी हिंमत एकवटून म्हणालो,”हो सर मी त्यांना प्रशिक्षण देतो.”हे एकूण सर खुपच आनंदी झाले व मला म्हणाले तुला एक उघड गुपीत सांगतो, “स्टेजवर थांबल्या नंतर आपण स्वतःलाच बोलायचं ते म्हणजे समोर बसलेल्यांना काहीच येत नाही. त्यांना आपण बोलणाऱ्या विषयाचं काहीच माहित नाही असे समजून बोलायचं मग आपोआपच स्टेज करेज येते. मी स्टेजवर गेलो. प्रशिक्षण दिलो व त्यावेळी मी जिंकलो”
अक्कावार सरांनी सांगितलेले हे गुपित मी माझ्या मनात आजपर्यंत जपून ठेवलोय. त्यानंतर मी अनेक ठिकाणी अनेक प्रशिक्षणासाठी स्टेज चढलो. स्टेज जिंकलो. हे स्टेज करेज दिलं मला आदरणीय प्रभाकरराव अक्कावार सरांनी. आज अक्कावार सर आपल्यात नाहीत. पण त्यांची शिकवण आपल्या ठायी कायम आहे. शिक्षकदिनी अक्कावार सरांच्या पावन स्मृतीस सलाम.
राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७