मुखेड: प्रतिनिधी
आज तुम्ही माथाडी कामगार आहात पण तुम्ही तुमची मुलं शिकवा, इथल्या प्रत्येकाला वाटले पाहिजे माझा मुलगा शिक्षक होईल,अधिकारी होईल, डॉक्टर होईल, इंजिनिअर होईल अशी खूणगाठ तुम्ही बांधा. माझी आई भाजीपाला विकत असत त्यातून मला पुस्तक घेऊन द्यायची मग मी डॉक्टर झालो. माथाडी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा आली पाहिजे त्यातून तुमचा व कुटुंबाचा विकास होईल असे प्रतिपादन मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी केले. ते स्व. अनिल रामराव कोत्तावार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोत्तावार परीवाराने आयोजीलेल्या माथाडी कामगारांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणाचार्य मठ संस्थान मुखेड चे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज होते तर व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एडवोकेट बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार,आडत व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी देबडवार, जेष्ठ आडत व्यापारी नंदकुमार मडगुलवार, सुप्रभात चे संघटक तथा कार्यक्रमाचे आयोजक अशोक कोत्तावार, शशिकांतशेठ पेन्सलवार, माथाडी कामगार प्रतिनिधी गणेश बनसोडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवर व कुटुंबीयांच्या हस्ते स्व. अनिल कोत्तावार यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, एकीकडे दुःखाचा सावट आहे व त्याला सामाजिक झालर लावण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून अशोक कोत्तावार यांनी केला आहे.
ना चिट्ठी ना कोई संदेश…
न जाने कोनसा वो देश…
तुम चले गये… तुम चले गये…
कोरोनाची पहिली लाट त्यानंतर दुसरी लाठ भयानक होती. अगणित माणसे मेली. मी हजारो पेशंट पाहिली. मागील दीड वर्षे आपण कसं काढलं हे सर्वांना माहिती आहे. अनेकांची अनेक नातेवाईक गेले,कोरोनानं काय काय होऊ शकते, एकीकडे माणुसकी जिवंत होत होती तर दुसरीकडे माणुसकी संपलेली होती. दोन्ही टोकं आपण पाहिली. ‘जे घडू नये ते घडलं आणि कोरोनांच मरन पाहून सरणही रडलं…’ सर्व भिन्नभिन्न बाबी या काळात नजरेसमोर आल्या अनिल आणि अशोक यांनी पैसे किती कमावले हे मला माहीत नाही पण माणसं जरूर कमावले, ते त्याचं प्रतीक आहे.
जीवनामध्ये पैसे कमावणं सोपं असतं पण माणसं कमावनं अवघड असतं हे निश्चित. माणसं जोडण्यासाठी त्याग करावा लागतो याचे उत्तर उदाहरण म्हणजे अनिल कोत्तावार. सुप्रभातला 22- 23 वर्ष झाली.यात सर्वक्षेत्रातील व्यक्ती आहेत. स्व. रामशेठ कोतवार व स्व. राधाबाई यांचे आवर्जून आठवण येते. मुखेडचे सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक चळवळीचं केंद्र म्हणजे कोत्तावार ऑइल मिल. येथे अन्नदान झाले, मोफत विवाह झाले, गरिबातल्या गरीबाला याचा लाभ झाला तुम्ही यांचे साक्षीदार आहात. आपण समाजाला थोडे दिलं की परमेश्वर आपणास भरभरून देतो.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोत्तावार कुटुंब. अनिल मध्ये माणसं जोडण्याची विलक्षण कला होती, कुठला प्रश्न असेल आणि त्याचे उत्तर सापडत नसेल तर त्याचे टेक्निकल उत्तर अनिलकडं राहत असे. मुखेडमध्ये नियोजन करण्याचे दोन गुरू होते, स्व. भाई श्रीराम गरुडकर व दुसरा स्व.अनिल कोत्तावार. अनिलला कल्पना सांगितली की तो विस्तार करायचा. ज्ञान असणं वेगळं शहाणपण असणं वेगळं. तो पुस्तके किती वाचला यापेक्षा माणसाचं मनं वाचण्यात तो तरबेज होता.
पित्तर-पंधरवाडे सगळेच करतात फार कमी लोकांची जयंती व मयंती साजरी होते. आपल्या भावाला सामाजिक योगदानातून जिवंत ठेवण्याचं काम अशोक कोत्तावार यांनी केलं आहे. माथाडी कामगारांना ब्लँकेट वाटप करत आहे, कामगारांच दुःख कोत्तावार परिवाराला माहिती आहे तुम्हाला ब्लँकेट वाटप करत आहेत म्हणजे तुमच्याकडे ब्लॅंकेट नाहीत असा अर्थ नाही, मायेचा ओलावा म्हणून ब्लॅंकेट तुमच्या पाठीवर टाकले आहे.
अशोक कोत्तावार यांना धन्यवाद देत डॉ. दिलीप पुंडे पुढे की, तुमच्या भावातला स्मृतीत जिवंत ठेवलं की तुमचं दुःख नक्की कमी होईल. त्याला आत्मिक नजरेतून पहा प्रत्येकाचं श्वासाचं आयुष्य ठरलं पण ध्यासाचं आयुष्य किती आहे हे फार महत्त्वाचा आहे. अनिल शरीराने गेला पण परंपरागत अशा चालणाऱ्या सामाजिक कार्यातून तो जिवंत राहील ही अनिलच्या आठवणींची साठवण आहे. मित्र असावा आनिल जैसा ! असेही ते म्हणाले.
प्रारंभी अशोक कोत्तावार यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमागची भूमीका सांगत बंधुप्रेमाचे कांहीं प्रसंग सांगीतले. ते म्हणाले की अनिलसारखा भाऊ लाखात एकालाच मिळतो. आम्हा दोघांत कधीच मतभेद झाले नाहीत. एका विचाराने आम्ही मार्गक्रमण करत असत. मला अनीलची आठवण झाली कि मी प्रज्वल, अच्युत, अमृता, अच्युतामध्ये अनिलला पाहतो.
यावेळी उत्तमअण्णा चौधरी म्हणाले की, अनिल कोत्तावार व मी लहानपणापासूनचे मित्र, अनिलला अजिबात गर्व नव्हता. आमच्यासोबत ते एक धडाडीचे नेतृत्व म्हणून वावरत असत. सर्वांना प्रेम ते देत असत. यावेळी डॉ. आर. जी. स्वामी म्हणाले की, अनिल कोत्तावार यांचे वय आमच्यापेक्षा जरी कमी असलं तरी अनुभव मात्र खूप दांडगा होता. व्यवहारचातुर्य यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.
अशा मित्रास आम्ही गमावले याचं खूप मोठं दुःख आम्हाला आहे. डॉ.एम.जे. इंगोले यावेळी म्हणाले की, अनिल कोत्तावार यांच्या कुटुंबाची व आमचे खूप दिवसापासून संबंध. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात आमच्या कुटुंबाची उपस्थिती होती. अनिल कोत्तावार जाण्याने आम्हाला खूप मोठं दुःख झालेलं आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की, अनिल कोत्तावार हे कुठल्याही कामासाठी हाक दिल्याबरोबर ते मठात हजर राहायचे. एक चांगला व्यक्ती गेल्याचं दुःख मलाही आहे. मी या कुटुंबाच्या पाठीमागे सदैव उभा राहील अशी ग्वाही महाराजांनी दिली. स्व.अनिल कोत्तावार यांचे जावई कृष्णा पेन्सलवार यांनीही अनिल कोत्तावार यांचे प्रासंगीक अनुभव सांगत भाऊक झाले.
कार्यक्रमास विक्रमशेठ निलावार, राजू गंदेवार, मधुकर पोलावार, गंगाधर पत्तेवार, उल्हासशेठ रेखावार, यांच्यासह श्रीमती अनुजा अनिल कोत्तावार, सौ. प्रयाग अशोक कोत्तावार, सौ अच्युता विक्रम निलावार, सौ अमृता कृष्णा पेन्सलवार, प्रज्वल कोत्तावार यांची उपस्थिती होती यावेळी सुप्रभात चे डॉ.एस.एन. कोडगिरे, डॉ. विरभद्र हिमगिरे, डॉ. प्रभाकर सितानगरे, सुर्यनारायण कवटीकवार, नारायणराव बिलोलीकर, गोपाळ पत्तेवार, सुप्रभातचे सचिव जीवन कवटीकवार, शिवाजी कोनापुरे, बालाजी वट्टमवार, प्रविण कवटीकवार, सूर्यकांत कपाळे, लक्ष्मीकांत चौधरी यांच्यासह कोत्तावार कुटुंबीयांनी माथाडी कामगारांना ब्लँकेट देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी सरवर मनियार, ज्ञानेश्वर उदगिरे, गणेश कामजे, विश्वनाथ महाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. शिवानंद स्वामी यांनी फ्लेमिंगो च्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण करून सदरील कार्यक्रम अनेक देशात प्रदर्शित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर लक्ष्मण पत्तेवार यांनी आभार मानले. स्व.अनिल कोत्तावार यांची कन्या सौ. अमृता पेन्सलवार यांनी मधूर आवाजात पसायदान गायले.
मिठान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मुखेड तालुका पत्रकार संघाचे सचिव मेहताब शेख, संघटक जगदीश जोगदंड, सुरेश गरुडकर, ज्ञानेश्वर नारलावार, गणपतराव पाळेकर,सचिन बंडावार, दिगंबर बादेवाड, संतोष मेडेवार यांच्यासह कोत्तावार कुटुंबियांचे पाहुणे, निमंत्रित मंडळी, मोंढ्यातील व्यापारी, स्व. अनिल कोत्तावार यांची मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.