लाल किल्ला : मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ

लाल किल्ला : मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ 

देशाचा ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर लाल किल्ल्यावर येत ध्वजारोहण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यानंतर देशवासियांना संबोधित केले. त्यांचे हे संबोधन मोदी है तो मुमकिन है’ या अनुषंगाने महत्त्वपूर्णच आहे असे म्हणावे लागेल. संपूर्ण भारतवासी आज अनेक संकटांसोबत लढत आहेत. कोरोना, पूर, भूस्खलन आदी संकटांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सरकार मदत करत आहे. तसेच राज्यांवरील आपत्तीवर केंद्र सरकार मिळून मदत करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी लहान मुलं लाल किल्ल्यावर दिसत नाहीत, कोरोनाने सर्वांची वाट अडवली, ‘सेवा परमो धर्म’ मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना त्यांनी अंतःकरणपूर्वक नमन केले. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील त्यांनी म्हटलंय. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युल्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत, या सर्वांना त्यांनी नमन केलं. हे सर्वच टाळी, थाळी आणि दिवे लावण्याच्या प्रक्रियेत शिरोधार्य राहिले आहेत. 

जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला. शेतकरी बंधनमुक्त झाला. देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. कामगारांसाठी शहरांमध्ये राहण्याची योजना राबविणार. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल, विविध क्षेत्रात 7 हजार प्रकल्पांची निवड केली आहे. चार लेनचे हायवे बनविण्यासाठी काम करणार आहोत. परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली असे मोदी यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होतो, तेव्हा शेजाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. ऊर्जा क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास भारत जगाचे हेल्थ डेस्टिनेशन बनेल. कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे.‌ आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. 
 पहिल्यांदा सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय धोरण पाश्चिमात्यांऐवजी पूर्वेकडील देशांना   महत्त्व देण्याचे ठरवले होते. ७४ व्या स्वातंत्र्यदिनी मात्र चीन व पाकिस्तानचा धोका ओळखून मोदींनी आता दक्षिण आशियाई देशांशी संबंध मजबूत करणार असल्याचे संकेत दिले. ईशान्य लद्दाख खोऱ्यात चीनची दादागिरी सहन न करण्याचा मोठा संदेश मोदींनी दिला व त्याचेच प्रतिबिंब आजच्या भाषणात उमटले. लेह दौ-यादरम्यान मोदींनी विस्तारवादी ठरवून अप्रत्यक्षपणे चीनला सुनावले होते. एवढी मोठी आपत्ती असतानाही सीमेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा गलिच्छ प्रयत्न झाला आहे. मात्र, LOC पासून ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्याने डोळा वर करून पाहिले, त्याला आपल्या वीर जवानांनी त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एक आहे आणि संकल्पबद्ध आहे आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत पुढे वाटचाल करत आहे. या संकल्पासाठी आपले वीर जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो हे लडाखमध्ये संपूर्ण जगाने पाहिले आहे.

आताही चीनचे नाव न घेता लद्दाखमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेले शौर्य जगाने पाहिले, असे म्हणून मोदींनी ड्रॅगनला डिवचले. गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्य लद्दाखमध्ये चीनी सैनिक स्वहद्दीत पुढे आले आहे. त्यास भारताने आक्षेप घेतला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने पहिल्यांदाच चीनविरोधात तीव्र सूर प्रकट केला आहे. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व राजनैतिक स्तरावरही चीनची कोंडी भारताने केली आहे. पहिल्यांदाच चीन, पाकिस्तान व नेपाळसमवेत एकाच वेळी भारताचा तणाव वाढला आहे. नेपाळविषयी मात्र मोदींनी कोणतेही भाष्य आजच्या भाषणात करणे टाळले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असो किंवा नियंत्रण रेषा देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सैन्याने त्याच भाषेत उत्तर दिले आहे. दहशतवाद असो अथवा विस्तारवाद भारत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे. राजनैतिक भान राखून मोदी यांनी शेजारी देशांसमेत सुरक्षा, विकास व विश्वास कायम ठेवून भारताने सहकार्य केले असल्याचेही म्हटले. दक्षिण आशियाई देशांमध्ये जगातील एक चतुर्थांश लोक राहतात. सहयोग व समावेशी सहकार्याने या भागात विकास व समृद्धी येईल. या भागातील देशांच्या लोकप्रतिनिधींवर प्रगतीपथावर आपापल्या देशाला नेण्याची जबाबदारी असल्याचे मोदींनी नमूद केले. केवळ शेजारी नव्हे, केवळ सीमा भूभाग नव्हे तर या देशांशी आम्ही मनानेही एकरूप आहोत, अशी साद मोदींनी दक्षिण आशियाई देशांना घातली. भूतान, अफगाणस्तिान, मालिदव, श्रीलंका, बांगलादेश या देशांशी सकारात्मक संवाद साधण्यावर भारताचा भर आहे. नेपाळ व पाकिस्तान मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे चीनच्या दबावाखाली असल्यानेच पंतप्रधान मोदींनी दक्षिण आशियातील उरलेल्या देशांशी संबध सुधारण्यावर भर दिला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच तेथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असा नवा आशावाद मोदी यांनी मांडला. 
           मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या त्या सर्व जवानांना आदरपूर्वक त्यांनी नमन केलं. दहशतवाद असो अथवा विस्तारवाद भारत त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करत आहे. शांततेसाठी जेवढे प्रयत्न, तेवढीच तयारी सुरक्षितेसाठीही करण्यात येत आहे. भारताचा जेवढा प्रयत्न शांता आणि सौहार्दासाठी आहे, तेवढीच तयारी आपल्या सुरक्षिततेची आणि आपली सैन्य शक्ती मजबूत करण्याचीही आहे. आता आपला देश संरक्षण साहित्याच्या उत्पादनातही पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी संपूर्ण शक्तीनीशी कामाला लागला आहे. देशाच्या संरक्षणात आपल्या सीमा आणि कोस्टल इंफ्रास्ट्रक्चरचीही मोठी भूमिका आहे. हिमालयातील शिखरे असो वा हिंदी महासागरातील बेटे, आज देशात रस्ते आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे आणि होत आहे. गावागावात इंटरनेटचे जाळे पसरत आहे. कोरोनाकाळात ‘डिजिटल भारत’ योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. मागील महिनाभरात तब्बल ३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले. त्यामुळे गावागावात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगत पंतप्रधानांनी राम मंदिर विषयावरही भाष्य केले. राम मंदिराच्या विषयावर न बोलणे कसे शक्य आहे? कारण शतकांहून जुन्या विषयाचे शांततेत निराकरण झाले. देशातील शांती, एकता आणि सद्भावना भारताच्या उज्ज्वल भविष्याची खात्री असल्याचे ते म्हणाले आहेत. 
       नुकतेच घोषित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास जागवत पंतप्रधान मोदी यांनी सरकारने अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. २०१४ पूर्वी देशात केवळ साठ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत दीड लाखाहून अधिक ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरशी जोडण्यात आल्या आहेत. येत्या एक हजार दिवसांत देशातील प्रत्येक गावाला आॅप्टिकल फायबरशी जोडण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात केली. भारताने फार कमी काळात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. याच इच्छाशक्तीने प्रत्येक भारतीय नागरिकाला पुढे चालायचे आहे.  लवकरच भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपली धेय धोरणे, आपली प्रक्रिया आणि आपले प्रोडक्ट सर्वकाही सर्वश्रेष्ठ असायला हवे. तेव्हाच आपण एक भारत – श्रेष्ठ भारत ही कल्पना साकार करू शकू. 

 कोरोनावरील औषध कधी येणार, देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार आदी बाबींवर मोदी यांनी भाष्य केले. याचबरोबर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा केली. यावेळी लालकिल्ल्यावरून मोदींनी ज्या हेल्थ मिशनची घोषणा केली. त्या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार असून त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडलाय. तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे. मोदी यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्यावरही मोठे संकेत दिले आहेत. मोदी यांनी नारीशक्तीला सलाम करत मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत सरकार विचार करत असून समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. देशात जी ४० कोटी जनधन खाती सुरु झाली आहेत त्यापैकी २२ कोटी खाती ही महिलांची आहेत. कोरोना काळात महिलांच्या खात्यांवर एप्रिल, मे, जूनमध्ये जवळपास ३० हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. आज महिला कोळसा खाणींसह लढाऊ विमानांद्वारे यश मिळवत आहेत. भारतीय महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले आहे. नोकरदार गर्भवती महिलांसाठी भरपगारी सहा महिन्यांची सुटी देण्यात आली आहे. तिहेरी तलाकमुळे महिला त्रस्त होत्या, त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गरीब मुलींच्या आरोग्याची चिंताही सरकारला आहे, असेही मोदी म्हणाले. 

       स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी यांनी आज सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. असे करणारे नरेंद्र मोदी बिगर काँग्रेसी पहिलेच पंतप्रधान बनले आहेत. देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एक संदेश प्रसारित करून यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या कामगिरीचाच त्यांनी परामर्श घेतला. मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभे आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, केवळ लोकशाही मूल्ये, विविध भाषा, धर्म आणि संप्रदायांच्या विपुलतेमुळेच नव्हे तर आपल्या भारताची कीर्ती ही प्रतिकूल परिस्थितीचाही एकजुटीने सामना करण्यासाठीही पसरलेली आहे. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाशी झुंजत आहे. या परिस्थितीत भारताने एकजुट होऊन या साथीचा सामान केला पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊन ही साथ आणि गंभीर आर्थिक संकटामधून बाहेर येऊ, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते.  गेल्या ७४ वर्षांच्या काळात आपण लोकशाही मूल्यांना वेळोवेळी परीक्षेच्या कसोटीवर परखून पाहिले आहे. तसेच नियमितपणे त्यात अधिकाधिक सुधारणा केली आहे. मात्र आजच्या काळात सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मुल्ये आणि स्थापित परंपरांच्या विरोधात उभे आहे, असे वाटते. भारतीय लोकशाहीसाठी हा चिंतेचा काळ आहे, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला. यावेळी सोनिया गांधी यांनी चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या संघर्षावरही आपलं मत मांडलं. कर्नल संतोषबाबू आणि आमच्या २० जवानांना गलवान खोऱ्यात वीरमरण आल्याच्या घटनेला आता साठ दिवस होऊन गेले आहेत. मी त्यांचे स्मरण करून त्यांच्या हौतात्म्याला वंदन करते. आता सरकारनेही त्यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांचा योग्य तो सन्मान करावा, असे मी सरकारला आवाहन करते, असे सोनिया गांधी म्हणाल्या. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे. आज देशात बोलण्याचे, लिहिण्याचे, प्रश्न विचारण्याचे, असहमती व्यक्त करण्याचे, विचार मांडण्याचे, उत्तर मागण्याचे स्वातंत्र्य आहे का? याचा विचार देशातील जनतेने अंतरात्म्याला स्मरून करावा. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही देशाचे लोकशाहीच्या रक्षणासाठी शक्य तेवढी मदत करू.

गंगाधर ढवळे,नांदेड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *