कुरुळा ; विठ्ठल चिवडे
दिव्यांग शब्द कानी पडताच एखाद्या निराधार व्यक्तीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.ज्याला खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते शारीरिक उणिवा असल्याने आधारासाठी ते इतरांवर विसंबून असतात परंतु जगाच्या पाठीवर असेही काही दिव्यांग आहेत की,जे स्वतः कुणाकडून आधाराची अपेक्षा न करता संकटकाळात सामान्यांचा आधार बनतात याची यथार्थ अनुभूती हाडोळी ब्र.येथील गावात येते.
एका दिव्यांग व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन व्हाट्सअप्प ग्रुप च्या साहाय्याने गरजूंना आर्थिक मदत केली आहे.
कुरुळा येथून जवळच असलेल्या हाडोळी ब्र. येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असणारे बालाजी केरबा केंद्रे .शरीर दिव्यांग असले तरी विचार दिव्य पाहिजेत अशीच प्रतिभा.शरीरयष्टीत दोन्ही पाय हे महत्वाचे अवयव नसल्याने आपण इतरत्र फिरू शकत नाही यातून केंद्रे यांनी गावातील सुशिक्षित नागरिकांचा “शासन सम्राट” नावाने व्हाट्सअप्प समूह तयार केला ज्यात ८० व्यक्ती समाविष्ट आहेत.
केवळ टिंगल टवाळक्या विनोद व वायफळ बाबी पोस्ट करण्यापेक्षा सोशल मीडियाचा समाजहित लक्षात घेऊन प्रभावी वापर कसा करावा याचा आदर्श केंद्रे यांच्या या व्हाट्सअप्प समूहाने घालून दिला आहे.
गतवर्षी गावातील रामेश्वर केंद्रे हा तरुण वाहनचालक अपघातात मृत्यू पावल्यानंतर या व्हाट्सअप्प समूहाच्या माध्यमातून तब्बल ७६,५०० रुपये जमा करून मयताच्या मुलीच्या नावे पोस्ट खात्यात सुकन्या योजनेअंतर्गत रक्कम भरण्यात आली.
तर आता नुकतेच ता.१७ सप्टेंबर रोजी संग्राम केंद्रे यांच्या राहत्या घरास दुपारी तीन वा. च्या सुमारास विद्युत लघुपरिपथन होऊन आग लागल्याने जीवनावश्यक वस्तुसह सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले त्यासंदर्भात प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला परंतु अद्याप मदत नाही .घर जळाल्याने संग्राम केंद्रे यांचे कुटुंब उघड्यावर आले ही बाब शासन सम्राट समूहात बालाजी केंद्रे यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे आणली ज्यामुळे ६७,८२९ रुपये जमा झाले ज्यामुळे खचलेल्या भूमिहीन संग्राम केंद्रे यांना मोठा आर्थिक आधार मिळाला.
यासह आगामी काळात प्रत्येक महिन्याला रक्कम जमा करून गावातील गरजुंच्या विवाहसोहळ्यात मदत करण्याची इच्छा बोलताना बालाजी केंद्रे यांनी व्यक्त केली.
दोन्ही पाय नसलेल्या या दिव्यांग बांधवाची वाटचाल शरीराने परिपूर्ण असणाऱ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल.