कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी कंधार या पदावर कार्यरत असलेले रमेश देशमुख हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांची जवळपास ३८ वर्षाची सेवा झाली आहे.
रमेश देशमुख नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रहिवाशी आहेत. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या अधिकार्यांचे शालेय शिक्षण ग्रामीण भागातील भोकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडच्या सायन्स कॉलेज येथून तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
कृषी विभागात १४ ऑक्टोबर १९८३ रोजी त्यांची कृषी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली.सुरुवातीला नांदेड येथे विभागीय मृद संधारण अधिकारी या कार्यालयात कृषी अधिकारी या पदावर ते प्रथम रूजू झाले त्यानंतर जिल्हा बियाणे अधिकारी नांदेड ,जिल्हा बिज प्रमाणीकरण अधिकारी परभणी, नांदेड या पदावर त्यांनी सेवा बजावली. २९ सप्टेंबर २००५ नंतर तंत्र अधिकारी या पदावर जालना येथे तर त्यानंतर तालुका कृषी अधिकारी पालम, परभणी, भोकर,तर सेवेच्या अखेरच्या टप्प्यात कंधार येथे या पदावर काम करून आता दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.

कृषी विभागात विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी आपल्या कामाची चांगली छाप व वेगळी ओळख निर्माण करीत कृषी विभागात अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पडली या संपूर्ण कालावधीत त्यांचा कृषी विभागाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून तीन वेळा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आगाऊ वेतनवाढ सुद्धा कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आली, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनात केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सत्कार केला,तर पंचायत समिती कंधार यांनी अभिनंदनाचा ठराव घेतला,विठ्ठलराव विखे पाटील परिषद, नांदेड, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यासाठी शांतिदूत प्रतिष्ठान कंधार, विस्तार व प्रशिक्षण कामासाठी ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मिडीया एक्झीबिटर्स प्रा.लि.नाशिक यांचा कृषीथॉन पुरस्कार २०१९ या संस्थांनी कामाची दखल घेत सत्कार केला.
कृषी विभागात अतिशय झोकून काम केले कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची संधी त्यांना तालुका कृषी अधिकारी या पदावर नेमणूक झाल्यानंतर मिळाली. या पदाला त्यांनी योग्य न्याय देत कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांच्या जीवनात उपयोग व फायदा होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले प्रयत्न केले. त्यांनी ज्या ज्या तालुक्यात काम केलं तेथील शेतकरी आजही त्यांच्याशी संपर्क ठेवून कृषी विषयक बाबीवर चर्चा करतात शासकीय योजनांची अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन अनेक गावात अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मोलाची साथ देऊन शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले.बिज प्रमाणीकरण यंत्रणेतील अनुभवाचा फायदा घेत ग्राम बीजोत्पादन ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली अनेक गावातील शेतकऱ्यांना एकत्रित करून गटाद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रमाणित बियाणांची निर्मिती करून बियाण्याची उपलब्धता करून दिली आजही हा उपक्रम शेतकरी गट चांगल्या पद्धतीने करताना दिसत आहेत.

जलयुक्त शिवार अभियानात केलेल्या कामामुळे अनेक गावे टॅंकर मुक्त होऊन पाणीपातळीत वाढ होत लागवड क्षेत्रात वाढ झाली. विभागीय पातळीवरील स्पर्धेत बेंबर गावाची प्रथम क्रमांकाने निवड झाली व कामाची चांगली पावती मिळाली. याच काळात सत्यमेव जयते अंतर्गत लोकसहभागातून पाणलोटाची मोठ्या प्रमाणावर कामे पार पाडली त्यात चांगला सहभाग नोंदवून अनेक गावात या कामाबाबतची जनजागृती करून गावकऱ्यांमध्ये या कामाच्या बाबतीत आवड निर्माण केली. त्याचा परिणाम होऊन अनेक गावातील गावकऱ्यांनी स्वपुढाकारातून व लोकसहभागातून ही कामे पूर्ण केली.
त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या. कृषी विभागाचे सचिव मा. एकनाथ डवले यांनी भोकर व कंधार येथे कार्यरत असताना भेटी दिल्या कामाची पाहणी केली कामाचे कौतुक केले. विभागीय आयुक्त औरंगाबाद मा.सुनील केंद्रेकर यांची ही कंधार तालुक्यातील भाजीपालाकृषी विभागाचे संचालक, विस्तार,मृदसंधारण, फलोत्पादन,, विभागीय कृषी सहसंचालक,लातूर, जिल्हाधिकारी, नांदेड,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड,उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, यांच्यासह मा.मंत्री,मा.खासदार मा.आमदार, जिप, पंचायत समिती या पदाधिकार्यांच्याही अनेकवेळा भेटी झाल्या.

कंधार येथे मागील तीन वर्षांच्या काळात अनेक शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी केली.विविध प्रचार प्रसार प्रसिध्दी माध्यमांचा वापर करत तंत्रज्ञानाची योजनांची माहिती दिली, कृषी विभागाच्या शेतकरी या अग्रगण्य मासिकात तसेच ॲग्रोवन या दैनिकात यशोगाथांना प्रसिद्धी मिळाली, आकाशवाणी केंद्रावर विविध विषयांवर मुलाखती प्रसारीत झाल्या. कृषी विभागाच्या मार्फत कृषी विभागात काम करत असताना राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमध्ये सामूहिक शेततळे, शेड-नेट, फलोत्पादन,सुक्ष्म सिंचन,कृषी यांत्रिकीकरण, पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला,पिक विमा, नैसर्गिक आपत्तीत मदत, भाजीपाला बिजोत्पादन,मृद चाचणी, आरोग्य पत्रिका,कोरडवाहू क्षेत्र अभियान,शेतकरी प्रशिक्षण, विस्तार,पोकरा, या व इतर योजनांसह फळबाग लागवडग्रामबिजोत्पादन, विस्तार,खरीप हंगाम पुर्व गावनिहाय प्रशिक्षण,पिक प्रात्यक्षिके, शेतीशाळा,मृद चाचणी, जमीन आरोग्य पत्रिका, बियाणे प्रक्रिया, विविध पिक पद्धतीचा अवलंब,पिक कापणी, पि एम किसान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,ई पिक पाहणी,शेतकरी गटांची निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना,विकेल ते पिकेल,बांधावर खत पुरवठा, शेततळ्यातील मत्स्य पालन,लॉकडाऊनच्या काळात फळे , भाजीपाला विक्री व्यवस्था,स्मार्ट, पीएमएफएमई, किटकनाशकांचा सुरक्षित वापर, रूंद वरंबा सरी पद्धतीने लागवड, कांदाचाळ, कृषी दिन, शेतकरी दिन,वृक्ष लागवड, गुण नियंत्रण, कृषी निविष्ठा परवाणा,पाणलोट व्यवस्थापन या योजनांची अंमलबजावणी करून तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला.
सन २०१८ ते २०२१ या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात पावसाचे प्रमाण चांगले राहीले या चार वर्षात पाण्याची उपलब्धता चांगली झाली व त्यामुळे खरीपानंतर रब्बीच्या क्षेत्रात व उन्हाळी हंगाम लागवड क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

कंधार तालुक्यात भाजीपाला बिजोत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या सहकार्याने बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला व आताही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे, तालुक्यात रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवडीस प्रोत्साहन दिले, कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनामध्ये जिल्ह्यात या तालुक्यात भरीव काम करून उत्पादकतेत सरासरीच्या तुलनेत चांगली वाढ झाली, सोयाबीन बियाण्याची घरच्या घरी उपलब्धता होण्यासाठी खरिपातील बियाणे साठवणीसह तालुक्यात बिगर हंगामातील सोयाबीन पिकाची लागवड करून दर्जेदार बियाणे उत्पादनावर व नवनवीन वाणांच्या बिजोत्पादनावर भर देत मोठ्या प्रमाणावर उ
बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला.
येत्या काळात याच पद्धतीने सोयाबीनची लागवड करून बिजोत्पादन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकुण २४६ हे.क्षेत्रावर फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०१८ व २०१९ या दोन वर्षांत ४४ ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत औजारे ई.मोटार , पीव्हीसी पाईप यापोटी शेतकऱ्यांना १ कोटी ९ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले.तालुक्यात पोकरा योजनेअंतर्गत १०९८ लाभार्थींना ३,१४,७३,६५१ रू अनुदान वितरित करण्यात आले, शेतकरी गटांना औजारे बॅंकची १४ प्रकरणे मंजूर झाली, तर प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत १०८९ शेतकऱ्यांना ३,९४,१३,१५७ रू.अनुदान वितरीत केले.पिक विमा,नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

योजनांच्या अंमलबजावणीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तर वरीष्ट स्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक या अधिकार्ऱ्यांच मार्गदर्शन व पाठबळ मिळालं.महसूल विभाग ,पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.कृषी निविष्ठा पुरवठादार यांचेही सहकार्य लाभले. योजनांच्या अंमलबजावणीची व केलेल्या कामांची माहिती पत्रकार, छायाचित्रकार,इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमातील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी प्रसिद्धीस दिल्यामुळे सर्व सामान्यांपर्यंत योजनांची माहिती मिळाली, शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे , क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून माहिती दिली त्यामुळे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फायदा झाला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कापूस संशोधन केंद्र नांदेड, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी,सगरोळी येथील शास्त्रज्ञांचे सहकार्य लाभले. प्रगतशील शेतकऱ्यांकडून अनेक बारकावे व तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.

सेवा कालावधीत अधिकार्यांचे विशेष सहकार्य व पाठबळ मिळाले.
सेवानिवृत्तीनंतरच्या काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती यासह शेतीच्या माध्यमातून पुर्ण वेळ कार्यरत राहणार आहे.

