एकदा शेतकरी होऊन बघाच…..!

ऊन वारा पावसात आयुष्याचा खेळ….
टाइम नसतानाही बिचारा काढतो कसा वेळ….
निदान काही क्षण तरी तुम्ही तसे जगाच…
बोलण लै सोपं राव, एकदा शेतकरी होऊन बघाच……

काळ्या मातीत घाम गाळून पिकवतो बाप मोती…
जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळेल शेती…..
चिखल- मातीला जीव लावून एकदा तुम्ही जगाच….
काळ्या मातीत खिसा रिकामा,करून एकदा बघाच….

स्व आयुष्याच मातेर झालं, तरी दानत असते मोठी….
तो राबतो रात्रंदिनी म्हणूनच, अन्न जाते तुमच्या पोटी..
आठवून त्याचे कष्ट तुम्ही क्षणभर तरी जगाचं……
बोलणं लै सोपं राव,एकदा शेतकरी होऊन बघाच….

मुर्दाड सरकार अन मृत विचार,वरून अस्मानी काठी….
स्वप्ने सगळी चालली वाहून,जिंदगाणीची ताटी….
दुःख कवटाळून अन अश्रू लपवून तुम्ही जगाच……
बोलणं लै सोपं राव,एकदा शेतकरी होऊन बघाच…..

कास्तकारांच्या खांद्यावरती पाय देऊन हुकूमशहा उभा….
दमड्या उधळून ,आमच्या छाताडावर लाखोंच्या होतात सभा…
मेल्या जित्याच्या दुःखाला बाजूला ठेऊन जगाच……
बोलणं लै सोपं राव एकदा शेतकरी होऊन बघाच….

डोळ्यादेखत सुगी चालली,पुन्हा संघर्षाला उभा…
बळीचा राजा करून मजला तुम्हीच देताय दगा…..
असेल तुमच्यात घमेंड मोठी एकदा हिम्मत करून जगा…..
जुगार खेळून अमच्यासारखे सोयाबीन पेरून बघा..…

-विठ्ठल चिवडे,कुरुळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *