आठवणीतील विद्यार्थी : इंजिनिअर सुदर्शन लक्ष्मणराव कापेरावेनोल्लू

इंजिनिअर सुदर्शन लक्ष्मणराव कापेरावेनोल्लू :(आठवणीतील विद्यार्थी 03)

             .इस १९८६ ला २० .११ . रोजी मी जि .प . हायस्कूल हदगाव येथे प्रथमच रुजू झालो .माझं गाव कर्नाटक राज्याच्या सिमेवर  वसलेलं . तांडयात जन्मलेलो व किर्र माळावरच्या आश्रम शाळेत शिकलेल मी . मराठी भाषा यायची . पण ती माझी खास मराठी होती . दहावी नंतरच शिक्षण ही  उदगीर जि. उस्मानबाद ( आता लातूर जिल्हा ) येथे झालेलं. उदगीरची भाषा ही कानडी वळणावर जाणारी . मराठी बोलताना वाक्याच्या / शब्दाच्या शेवटी लाव लाव म्हणायची सवय . मी नांदेड जिल्हयात आल्यानंतर मला माझ्या बोली भाषेविषयी कळालं . येथील लोकांच्या भाषेपेक्षा माझी भाषा वेगळी होती . माझ्या सहकार्यां सोबत बोलताना माझ्या भाषेचं मला वेगळे पणा जाणवायचं . माझ्याशी बोलणारा माझ्याकडे निरखुन पहायचा . त्यांच्या चेहर्‍यावर थोडसं नवल थोडसं नाविन्यपूर्ण हास्य चेहर्‍यावर दिसायचं . मला ही कसतरी वाटायचं पण भाषा ही माझ्या भागाच्या वळणावरच जात होती . नाईलाज होतं माझं .

             मी हदगावला रुजू झाल्यानंतर मी शेजाऱ्यांशी गप्पा गोष्टी करताना माझ्या भाषेचं वेगळपण मला जानवायचं . मराठी बोलताना माझं काही तरी चुकतंय असं वाटायचं . समोरचा बोलणारा म्हणायचा , ” गुरुजी , तुम्ही उस्मानबाद जिल्हयातले का ? ” मी म्हणायचो, ” नाही हो मी नांदेड जिल्हयाचाच आहे . ” मग तो म्हणे , ” नाही तुमची भाषा वेगळीच दिसायली ना . ” मी हे ऐकूण थोडं नाराज व्हायचो . वर्गात मुलं आपल्या भाषेला निश्चित हसतील असं वाटायचं . माझ्या पेक्षा विद्यार्थ्यांची भाषा नक्कीच शुद्ध असणार असे मला वाटायचं .   

          मी वरील सर्व शंका कुशंका मनात घेवून त्याचं पक्क गाठोडं बांधून बहुधा नवव्या वर्गात गेलो . वर्ग ९ वी ची ‘ड ‘तूकडी होती . वर्ग खचाखच भरलेला . मी जाण्यापूर्वी वर्गात खसखस पिकली होती . पण मी वर्गात गेल्या बरोबर सर्व शांत बसले होते . आता सर्व मुलं माझ्याकडे एकटक नवलपूर्ण नजरेणे पहात होते . बहुधा सर्व विद्यार्थी शांत बसले होते . काही बेरकी एकमेकांच्या कानात काही तरी फुंकत होती . काहीतरी पुटपुटत होती . काय बोलावं , कसं बोलावं , सुरवात कशी करावी हेही मला समजत नव्हतं . मला वाटत होतं मी बोलताना  ”लाव लाव” करणार व वर्गातील मुले निश्चितच “काव काव” करणार ही माझ्या मनात भिती होती . वर्गातीत मुलं ही शहरातील मुलांसारखी टापटीप असतील , गोरेगोमटे असतील असा माझा अनुमान होता पण ही मुले शहरातील मुलासारखे टापटीप सुंदर दिसत नव्हती . श्रीमंत घरची ही दिसत नव्हती . वर्गात चार पाच मुलं सोडली तर सर्व शेतकरी , शेतमजूरांची मुलं दिसत होती . नाका डोळ्यात देखणी पण मळकट वाणाची होती . 

          वर्गातील मुलांसोबत मी चर्चा करण्यास सुरवात केली . मुले चुणचुणीत होती . ‘ड ‘ वर्ग म्हणजे टेक्निकल विषय घेतलेल्या मुलांचा वर्ग होता . ‘ड ‘ वर्गात समोरच्या बेंचवर एक छोटासा मुलगा बसला होता . रंगाने काळा . टपोरे डोळे . थोडं लांबट गोल चेहरा . डोक्यावरचे केस विस्कटलेले अस्त व्यस्त झालेले . अंगावरचे कपडे ही मळकट व जूणेच होते . राखांडी रंगाची हापचड्डी . त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होतं . त्याच्या दिसण्यावरुन तो गरीब घरचा दिसत होता . त्याला पाहून मला माझं बालपण आठवलं . मला माझ्या अंगावरच्या कपड्याची त्या काळची आठवण झाली . माझं भूतकाळ माझ्या समोरून हळूहळू सरकत बाजूला गेलं . मनात आठवणीची कळ मात्र जाणवली. 

          म्हणतात ना गरिबी , दारिद्रयातच विद्ववता  लपलेली असते ते खरे आहे  . तो मुलगा गरीब होता पण चुणचूणीत होता . मी काही प्रश्न विचारलो तर त्या मुलाचा  सर्वात आगोदर हात वर . मी म्हणालो , ” बाळा तूझं नाव काय सांग ? ” तो म्हणाला , ” सर मुव्ह  नाव सुदर्शन . ” मला काही ही कळालं नाही म्हणुन मी पुन्हा विचारलो, बाळा ,तूझं पूर्ण नाव सांग . ” तो पुन्हा म्हणाला , ” सर मुव्ह नाव सुदर्शन लक्ष्मण कापेरावेनोल्लू . ” आता मला मुव्ह नावाचा काहीच उलगडा होईना . मला वाटत होतं माझी भाषा मुलांना कळणार नाही पण येथे उलटच झालं विद्यार्थ्यांची भाषा मला कळत नव्हती . त्याचं आडनाव ही माझ्या डोक्यावरून गेलेलं होतं .मी प्रश्नार्थक नजरेने सुदर्शन कडे पाहिलो नंतर वर्गातील सर्व मुलांकडे पाहू लागलो . तेवढयात वर्गातील कोणीतरी एक मुलगा उठला व म्हणाला, ” सर मुव्ह नाव म्हणजे माझं नाव असा अर्थ होतो . ” तेव्हा कुठे तरी ते माझ्या डोक्यात शिरल .          पुन्हा मी सुदर्शनला विचारलो, ” बाळा तुझे पुस्तक दिसत नाहीत . पुस्तक कुठं आहेत ? त्याने तात्काळ उत्तर दिलं , ” सर पुस्तक माझ्या झोऱ्यात आहेत . ” आता माझ्या समोर पुन्हा प्रश्न उभा राहीला . आता झोऱ्या म्हणजे काय ?झोऱ्या हा शब्द माझ्या वाचण्यात, लिखानात किंवा ऐकण्यात कधीच आला नव्हता . मी प्रथमच हा शब्द ऐकत होतो . आता मी गप्पच थांबलो . मला माझं अज्ञान मुलांसमोर उघडं करायचं नव्हत .पुन्हा कोणीतरी बोलला ,” सर झोऱ्या म्हणजे थैली .”          आता मला कळालं की भाषेच्या बाबतीत गुरुजी व विद्यार्थी हे एकाच दर्जाचे आहेत . भाषा बोलण्याची जी माझी भिती होती ती सुदर्शन चक्राने केव्हाच भेदली होती . सुदर्शन चक्राने माझी भाषेची भीती पळवून लावली होती . आता मी वर्गात बिनधास्त बोलण्यास सुरुवात केलो होतो . 

           सुदर्शन हा अत्यंत साधा निर्मळ मनाचा ,सर्वात मिळून मिसळून राहणारा पोरगं. सामन्य गरीब घरचा . त्याच्या वडीलाचा मुळ व्यवसाय मासे पकडण्याचा होता . घर म्हणते काय होतं ? चारीबाजूनं वीटा रचलेल्या व वर टीन पत्रे टाकलेले . माझ्या सारख्या बुटक्या उंचीच्या माणसाण थांबले तर डोक्याला  लागणारं टिनपत्र्याचं घर होतं सुदर्शनचं . मी त्याच्या घरी गेलोय . त्याचं घरही पाहिलोय . घरातील गरीबी ही पाहीतलीय . गरीबीतीली माणुसकी ही पाहिली . गरीबीचे चटके मी भोगलोय . गरीबी किती लाचार बणवते माणसाला हेही अनुभवतोय  व अनुभवलोय . सुदर्शन इतक्या हलाकीच्या परिस्थितीत वाढलेलं पण अभ्यासात मात्र सगळ्यांच्या पुढे होतं . त्याच्या अभ्यासात गरिबी आडवी आली नाही . तो दहावीत असताना त्याचे वडील वारले . पण तो डगमगला नाही . अभ्यास करणं सोडला नाही . एस .एस .सी . परीक्षेत त्यावेळी तो हदगाव तालुक्यातून प्रथम आला होता .

जीवनात  तो कधीही डगमगला नाही . त्याने अकारावी बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले . अनेक प्रकारच्या आडचणीना तोंड देत त्याने मेकॅनिकल इंजिनिअरचा कोर्स प्रथम श्रेणीत औरंगाबाद येथूनच पूर्ण केल . शिक्षणाता येणाऱ्या प्रत्येक आडथळ्याची शर्यंत त्याने कष्टाने पण जोमाने , उत्साहात पार केलय . आज तो बजाज कंपणी पुणे येथे उच्च पदावर कार्यरत आहे . उच्च पदावर गेल्यानंतर काही लोकांचे पाय जमीनीवर राहत नाहीत पण सुदर्शनचे पाय जमीनीवरच आहेत . त्याने गरिबी विसरलेला नाही . गरीब मित्राला ही विसरलेला नाही . गरजू मित्रांना नेहमीच तो मदत करत असतो . 

        कष्टाला पर्याय नाही . कष्ट केल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही . सुदर्शनने कष्ट केले .कष्टाचं फळ तो आता चाखतोय . पण हे सुखाचे पळ चाखत असताना तो भुतकाळ विसरलेला नाही . विसरनार ही नाही . याची मला पूरेपूर खात्री आहे . कारण मी त्याचा गुरुजी आहे . सर नाहीं .         म्हणूनच अशा एका गुणवंत मुलाचं म्हणजे सुदर्शन ची आठवण नेहमीच काळजात कोरून ठेवलेली आहे .  मी तुझा गुरुजी आभाळ्या इतक्या मायेने एवढंच म्हणेन :   सुखी रहा . आनंदी राहा . घरात वैभव नांदेलच .#yugsakshilive.in

   राठोड  एम०आर ० ( गुरुजी )
 गोमती सावली, काळेश्वरनगर 
विष्णुपूरी , नांदेड९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *