संपादकीय……
अखेर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वत:च 15 अॉगस्ट 2020 रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर मैं दो पल दो पल का शायर हूँ हे गाणे अपलोड करीत आपल्या कारकीर्दीतल्या निवडक फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. सन २००४ साली भारतीय संघात प्रवेश केलेल्या धोनीने एक माणूस म्हणून आणि एक यशस्वी कर्णधार म्हणून एक महत्त्वपूर्ण पारी खेळली आहे. त्याच्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना हुरहूर लागली असली तरीही तो आयपीएल क्रिकेट सामन्यात खेळणार आहे.
Thanks. Thanks a lot for ur love and support throughout from 1929 hrs consider me as retired.
या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर त्याच्यासाठी देण्यात येणाऱ्या शुभेच्छांचा महापूर ओसंडून वाहत आहे. २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदाच वरच्या क्रमांकावर फलंदाजीला संधी मिळाल्यानंतर दुसऱ्याच डावात १४५ चेंडूत नाबाद १८३ धावा काढून मालिका निर्विवादपणे जिंकून देऊन मालिकावीर ठरलेल्या लांबलचक केसांच्या धोनीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. भारताने जेव्हा पाकिस्तानचा दौरा केला होता त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ हे धोनीच्या केसांचे कायल बनले होते. त्यांनी धोनीला केस न कापण्याचा सल्ला दिला होता. २००७ मध्ये धोनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला.
धोनीची कारकीर्द पल दो पल नाहीतर एका दृष्टीने महत्त्वाचीच आहे. तो एक दुर्लभ प्रतिभावान खेळाडू आहे. छोट्या शहरांतील खेळाडूंच्या आशा पल्लवित करणारा आणि आपला वारसा मागे सोडून येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा खेळाडू आहे. भारतासाठी धोनीने ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत एकूण १०, ७७३ धावा, कसोटीत १६१७ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या १९० सामन्यांमधून ४४३२ धावा धोनीने काढलेल्या आहेत. कर्णधार म्हणून तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाहून अधिक देशांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेत सर्वाधिक फायनल खेळणारा कर्णधार ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंगचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहिलेला आणि आयसीसीच्या तिन्हीही म्हणजे T-20, one day World Cup, champion’s trophy या तिन्ही स्पर्धांचे जेतेपद मिळवणारा जगातील तो एकमेव कर्णधार आहे.
धोनी हा एक चांगला खेळाडू किंवा महान कर्णधार होताच परंतु एक चांगला माणूस म्हणून त्याच्या अंगी असलेले माणूसपण अनेकांनी अनुभवले आहे. तो खेळाडूंना प्रोत्साहन देतो, प्रेरीत करतो. दबावाचा सामना करतो आणि अडचणीच्या काळात आत्मविश्वासाने खेळतो असे त्यावेळेसच्या जाणकारांचे मत आहे. खेळात हारजीत असते, काहीवेळेला ड्रॉ असतो. परंतु या हारजितीपेक्षाही खेळण्यात सर्वोत्तम देण्याची, शंभर टक्के जीव ओतण्याची प्रक्रिया अर्थात प्रक्रियामहत्त्वाची हा कार्यकारण भाव धोनीने ठसवला. विकेटच्या पाठी उभं राहून सल्ले देताना त्याने अनेक खेळाडूंना मोठं केलं. अंतिम निकाल काय याबरोबरीने तिथपर्यंतची प्रक्रिया महत्त्वाची हा धोनीच्या कारकीर्दीचा गाभा होता. एक प्रकारे तो या प्रक्रियेचा भक्तच होता. त्यालाही जिंकायचं होतं पण जिंकण्यासाठी वाट्टेल ते हा मंत्र त्याने स्वीकारलं नाही. ध्येयाप्रती जीवतोड मेहनत करायची पण जिंकता आलं नाही म्हणजे संपलं हा निराशावाद धोनीने मिटवून टाकला. जिंकण्याने माणूस किंवा संघ अढळस्थानी जातो आणि पराभवाने तीच माणसं टाकाऊ होतात हा बाजाराने मांडलेला सिद्धांत धोनीने नाकारला. टॉस असेल, प्रेझेंटेशन सेरेमनी असेल किंवा मुलाखती असतील.. त्याच्या बोलण्यात त्या प्रक्रियेचा उल्लेख सातत्याने यायचा. जिंकण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करायलाच हवेत, त्यात तसूभरही मागे हटून चालणार नाही हे तत्व धोनीने जपलं. स्वत:च्या खेळाचा अभ्यास, त्यात सातत्याने सुधारणा, प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास, वातावरणाचा नूर समजून घेणं, मैदानाचे चलनशास्र कोळून पिणं ही पद्धती धोनीने कारकीर्दभर राबवली. खेळाडू म्हणून धोनीने जी तत्वं जपली ती सर्वसामान्य माणसाने अनुसरली तर त्याचं जगणं सुकर होऊ शकतं. हे असं करणं सोपं नक्कीच नाही. खेळाडू, कर्णधार धोनीपेक्षा धोनीचं माणूसपण त्याला मोठं करतं. भावनांवर नियंत्रण मिळवत कर्माशी तादात्म्य पावणं ही शिकवण धर्माधर्मात शिकवली जाते. धोनी नावाच्या खेळियाचा खेळण्याचा धर्म होता. तो खेळाचा आणि खेळ त्याचा आजन्म ऋणी राहील.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय ची छान सेटिंग जमली आहे. धन्यवाद!!!
thanks a lot sir.