मुख्यमंत्री साहेब आतातरी जागे व्हा , शेतकरी हवालदिल झालाय हो….प्रणिताताई चिखलीकर-देवरे

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

       अतिवृष्टी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असतांना ते फुलवळ ला येण्यापूर्वी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुकन्या तथा जि.प. सदस्या प्राणिताताई चिखलीकर-देवरे यांनी थेट बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेती व शेती पिकांची पाहणी केली आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासा देत मुख्यमंत्री साहेब आतातरी जागे व्हा , बंगल्यातून बाहेर या  कारण शेतकरी हवालदिल झालाय हो अशी सहानुभूतीपूर्वक साद घालत थेट सरकारवर निशाण साधला.

   अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दोन दिवस नांदेड दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस , प्रवीण दरेकर हे फुलवळ ला येण्यापूर्वी जि. प.सदस्या प्राणिताताई चिखलीकर-देवरे या फुलवळ येथे आल्या असता त्यांच्या सोबत कंधार भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,शरद पवार, गंगाप्रसाद  यन्नावर  , उपनगराध्यक्ष जफर भाई शेख , किशनराव डफडे सह लोहा कंधार परिसरातील अनेक भाजपचे कार्यकर्ते व फुलवळ सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यंदाच्या खरीप हंगामात एकानंतर एक अशा संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपामुळे तीन वेळा अतिवृष्टी झाली आणि शेती पिके होत्याचे नव्हते झाली. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्ती ने हिरावला असल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा महासंकटात सापडला असताना सध्याचे सरकार झोपेचं सोंग घेऊन वावरत असून शेकऱ्यांनो काळजी करू नका असे घरात बसून संगल्याने होत नाही तर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट बांधावर यावं लागत तेंव्हा त्यांच्या भावना कळतात असे मत ही प्राणिताताई यांनी व्यक्त केले.

फुलवळ येथे त्या आल्या असता येथील शेती पिकांची पाहणी करत असतांनाच येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर  आपल्या व्यथा मांडताना अक्षरशः आपल्या भावना अनावर करत दुःख व्यक्त केलं आणि व्यथा मांडत ताई आम्हा शेतकऱ्यांचा वालीच हरवला असून शेतकरी उघड्यावर पडला आहे हो , चक्क कंबरड मोडलो आमच अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.

     हे सरकार कसलीच मदत करत नसून काही महिन्यांपूर्वी हेच मुख्यमंत्री आपल्याच लोहा तालुक्यात दौऱ्यावर आले असता २५ हजार रुपये थेट मदत देऊ असे पोकळ आश्वासन देऊन गेले होते पण अद्याप २५ पैसेही आम्हाला मिळाले नाहीत हो असे गहिवरून सांगतानाच आता हेच सरकार अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांनी  ७२ तासात ऑनलाईन तक्रार दाखल करावी असा फतवा काढून पुन्हा शेतकऱ्यांना अडचणीत आणत असून जशी तक्रार ७२ तासात पाहिजे तशीच मदतही ७२ तासात का देत नाहीत , असा संताप ही शेतकऱ्यांनी व्यक्त केला . त्यामुळे आम्हाला कोणी मायबाप आहे का नाही असाच प्रश्न पडला असून झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकार ला कोण जागे करावे असा सवालही उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *