नांदेड, दि. 8 – नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संजीवनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे नेहमीच हित जोपासली आहे. कारखाना अडचणीत असतानासुध्दा त्यांनी कधीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाची शासनाने निर्धारित केलेल्या एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र.1 देगांव-येळेगाव लक्ष्मीनगर येथील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसाची प्रतवारी लक्षात घेऊन शासनाने 2464.06 रुपये प्रतिटन एफआरपी निर्धारित केली होती. त्यापैकी पहिला हप्ता रुपये 1885, दुसरा हप्ता रुपये 300 तर तिसरा व अंतिम हप्ता रुपये 279.06 असे एकूण 2464.06 रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या डोंगरकडा येथील युनिट क्र. 2 च्या उसाची प्रतवारी लक्षात घेवून 2566.89 रुपये एफआरपी निश्चित केली होती. त्यानुसार कारखान्याने पहिला हप्ता रुपये 1885 , दुसरा हप्ता रुपये 300 व तिसरा व अंतिम हप्ता 381.89 रुपये म्हणजे एकूण 2566.89 एफआरपीप्रमाणे प्रतिटन दर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी दिली आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
कोरोना वैश्विक महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर केल्याने कारखादारी अडचणीत आली .यामुळे कारखानदारी आर्थिक तोट्यात आली आहे. अशा परिस्थितीतही ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम देण्याचा निर्णय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतला आहे. या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतक-यांनी स्वागत करत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.