संपूर्ण लसीकरणाने कोरोनाविरोधात सामुहिक रोगप्रतिकारक क्षमतेची निर्मिती – गंगाधर ढवळे ‘करु सर्वांचे लसीकरण, लावू कोरोनाला पळवून’ या गिताने जनजागृती ; ७५ तासांच्या विशेष लसीकरण सत्रात सरासरीने वाढ


नांदेड – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महामारीच्या विरोधात आता प्रत्येक जण उभा ठाकला आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत असल्यामुळे आपण कोरोनाची तिसरी लाट रोखली आहे. तसेच संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास त्या ठिकाणी सामुहिक रोगप्रतिकारक क्षमतेची (हर्ड इम्युनिटी) निर्मिती होते.‌ मास्क, सॅनिटाईझर आणि सुरक्षित अंतराबरोबर लसीकरण करुन घेणे घेणे गरजेचे आहे.‌ आपल्या सर्वांचे लसीकरण झाले तर आपण कोरोनाला आपल्या गावातूनच नव्हे तर देशातून पळवून लावू असे आश्वासक मत येथील साहित्यिक तथा लसीकरण मोहीमेचे नोडल अधिकारी गंगाधर ढवळे यांनी लसीकरण जनजागृती पथदर्शी उपक्रमा दरम्यान व्यक्त केले.

यावेळी डॉ. शीतल नितनवरे, आरोग्य कर्मचारी शंकर गच्चे, आरोग्यसेविका आर. एस.हातोडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार, आनंद गोडबोले, ग्रामसेवक संदिप अंबुलगेकर, सरपंच साहेबराव शिखरे, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे, पांडूरंग गच्चे, पुंडलिक गच्चे, कमलबाई गच्चे, फातिमाबी शेख, साहेब ससाणे आदींची उपस्थिती होती. 


        जिल्ह्यात मिशन कवचकुंडल अंतर्गत ७५ तासांचे विशेष सत्र दि. २१ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आले. मिशन कवचकुंडल चा कालावधी २ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. जवळा देशमुख व जवळा ( पू ) येथे २०० लाभार्थ्यांचे लसीकरण संपन्न झाले. तत्पूर्वी गावात वार्डनिहाय दवंडी, गृहभेटी, मायकिंग आदी माध्यमातून जनजागृती करण्यात आली.  ‘करु सर्वांचे लसीकरण, लावू कोरोनाला पळवून’ या गीत गायनाने व घोषवाक्यांनी जनजागृती करण्यात आली. 

जवळ्यात आत्तापर्यंत एकूण ५०२ डोसचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोस घेणारे ३५० असून १५२ दुसरा डोस घेणारे लाभार्थी आहेत. दगडगाव उपकेंद्रांतर्गत जवळा दे, जवळा पू, खरबी, बामणी, जानापूरी, दगडगाव आदी गावांमध्ये या चार दिवसांत  संपन्न झालेल्या लसीकरण मोहीमेदरम्यान सरासरीत वाढ झाली असल्याचे शंकर गच्चे यांनी सांगितले.

नोडल अधिकारी ढवळे जी. एस. यांनी लसीकरण बुथवरील सर्व आरोग्य कर्मचारी व बिएलओ यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *