एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप संपेना; ऐन दिवाळीत प्रवाशांचे झाले बेहाल ! खाजगी वाहनाला आले सुगीचे दिवस

मुखेड; प्रतिनिधी

एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे.

सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. आज यावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज हायकोर्टाच्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली.

यामुळं उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तूर्तास एस.टी. कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संपाविरोधात एस.टी. महामंडळानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज राज्यातील २५० डेपों पैकी ५९ डेपोंचं कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

निर्देशांनंतरही कामबंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये?, अशी विचारणा करत हायकोटांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. मुखेड बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने प्रवाशांचे बेहाल होत आहे.

एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीत संप पुकारला आहे तसेच ही काळी दिवाळी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार, परिवहन मंत्री अनिल परब तसेच एसटी महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाच्या धोरणामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या करत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्याने लावला आहे. तर ही दिवाळी आमची काळी दिवाळी असल्याचे देखील कर्मचारी म्हणाले.

आपली समस्या मांडत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रही अनावर झाले. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसेच एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. तर दुसरीकडे खाजगी बसेस चालकांनी भाव वाढ करून लूट करत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात एकुन
९ आगारा मधे हा आंदोलन चालू असुन एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आज आंदोलन तीव्र केलं असून जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दिवाळीच्या सणादिवशीच हे आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकात आले आहेत मात्र या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने पूर्ण बस गाड्या बंद आहेत.

त्यामुळे प्रवाशांना आता मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे हे आंदोलन आता चिघळलं आहे. जोपर्यंत पगार वाढ आणि एसटीचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *