स्पर्धा परीक्षांची वयोमर्यादा वाढविल्याने अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई, दि. १० नोव्हेंबर २०२१:

राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

कोरोना काळात नोकर भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नव्हत्या. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पार झाली होती. या पार्श्वभूमिवर पुढील काळात होणाऱ्या नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी; जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध होऊ शकेल,

अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *