नांदेड/ सामाजिक सलोखा आणि एकोपा हे प्रगती आणि उत्कर्षाचे प्रतिक आहे. परंतु काही समाजकंटक तेढ निर्माण करून जाती-जातीत कलागती निर्माण करतात, हा कावा ओळखून सर्वांनी सामाजिक सलोखा राखून शांततेसाठी सहकार्य करणे अतिआवश्यक आहे. सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आज येथे बोलताना केले.
गेल्या 12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा येथील घटनेचे तीव्र पडसाद नांदेड येथे उमटले. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर च्या हद्दीतील मोहल्ला कमिटीच्या कॉर्नर बैठका घेतल्या. सर्व धर्मीय प्रतिष्ठित लोकांच्या बैठका घेतल्या.
त्यांच्याशी सुसंवाद साधून अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले.जनतेच्या मनातील विश्वासाची ज्योत कायम ठेवत समाजकंटक व गुन्हेगारांच्या उरात धडकी भरावी यासाठी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह रूटमार्च देखील काढला.
मस्जिद समितीचे अध्यक्ष व मौलाना यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची शांतता समितीची बैठक आज बुधवारी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे घेण्यात आली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक भगवान दगडे म्हणाले की अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. समाजकंटकांना जात नसते त्यांना विध्वंस आणि कायम अशांतता हवी असते.
जातीजातीमध्ये कलाकृती निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम ही मंडळी करत असते. अशा अशा दुष्ट प्रवृत्तीला ठेचून काढणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे.
समाजकंटकांचा शोध घेण्याची मोहीम आम्ही राबवित आहोत. गिरापराध लोकांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, पण समाजकंटकांवर कारवाई निश्चित केल्या जाईल. कोणाचीही गय केल्या जाणार नाही, असा विश्वास धबडगे यांनी व्यक्त केला.
या बैठकीस मौलाना मुफ्ती आयुब, मौलाना अजीम अहमद साहब, मौलाना सय्यद अलीम अहमद, शेख खाजा, शेख रियाज,
पत्रकार खाजाभाई कपाटवाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, डीएसबीचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद हैबतकर, जमादार अहमद पठाण यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.