मराठी भाषेच्या विकासासाठी कटिबद्ध – प्रा. यशवंत भवरे

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ; गोणारला ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन होणार

नांदेड – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वस्तरातून मागणी होत आहे; तसे प्रयत्नही होत आहेत. भाषाविकासासाठी मराठी भाषेत अनेकानेक संशोधने झाली पाहिजेत. मराठीतील विविध बोलीभाषेतील लोकवाङमयाचे इंग्रजीत भाषांतर झाले पाहिजे. मराठी भाषेच्या विकासासाठी आम्ही सप्तरंगी साहित्य मंडळाच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याची ग्वाही येथील सुप्रसिद्ध युवा कवी तथा यशवंत इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. यशवंत भवरे यांनी दिली. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य महासचिव पांडूरंग कोकुलवार, राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, राज्य कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राज्य सहसचिव कैलास धुतराज, राज्य कार्याध्यक्ष मारोती कदम, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांची उपस्थिती होती.

          शहरातील मालेगाव रोडस्थित तथागत नगर परिसरात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे समीक्षक गंगाधर ढवळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. भवरे बोलत होते. अध्यक्षपदावरून बोलताना पांडूरंग कोकुलवार म्हणाले की, शिक्षण आणि साहित्य यांचा अन्योन्य संबंध आहे. दोन्हीही ज्ञान, प्रबोधनाची तसेच जनजागृतीची प्रभावशाली साधने आहेत. साहित्य मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आली पाहिजेत. कार्याध्यक्ष मारोती कदम यांनी कंधार तालुक्यातील गोणार येथे मंडळाचे एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलन होणार असल्याचे सांगितले. ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी ग्रामीण कवी, साहित्यिकांना या साहित्य संमेलनाच्या मंचावर संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार सहसचिव कैलास धुतराज यांनी मानले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे लक्ष्मण लिंगापुरे, उल्हास काटे, गोविंद बामणे, इन्स्टिट्यूटचे सहशिक्षक श्रद्धा पाटील, दीक्षा सरोदे, ऋतुजा जाधव, निखिल कांबळे, गंगाधर पावडे, शैलेश कांबळे, दुधमल, सुनिता कावळे, संगिता कांबळे, भीमराव भवरे, शांतीमुनी भरणे आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *