वसंतराव गुरूजीची शाळा


———————————
उगं कायबी शाळा भरवू नको. लईच भारी शाळा करते रं ते त्यच्या नादी लागू नको. त्यच्या शाळंत जाऊ नको नसता कायमचं घरी बसशील. असे नको ते उपहासात्मक वाक्प्रचार गावाकडं बेरकी राजकारण्यायमुळं रुढ झालेले आजबी ऐकायला भेटतात. मात्र वसंतराव गुरूजीची शाळा १९९५ पासून मनाला भुरळ घालत होती.

तवा मी लोणाळला नवकरीला होतो. शैक्षणिक असो की शिक्षक चळवळ असो या सार्‍या गोष्टींचा तालुक्याचा केंद्रबिंदू म्हणजे वसंतराव गुरूजीची शाळा केंद्रीय प्राथमिक शाळा मुखेडकडं पाहिल्या जायचं.

तवा कै. रामराव कोतापले , कै. रामराव कुंदटवाड, समर्थ कदम व इतर दिग्गज गुरूजी त्या शाळंत होते. हे विविध संघटनांचे प्रतिनिधीत्व करायचे. वसंतराव नाईनवाड सर शाळेचे मुख्याध्यापक होते. ते जि.प.शिक्षक महामंडळाचे पदाधिकारी.

सहकारी शिक्षक व नाईनवाड गुरूजीत संघटनात्मक मतभेद असायचे मात्र मनभेद कधीच दिसले नाहीत. वसंतराव गुरूजी सर्व शिक्षक व सहकार्यातल्या नैपुण्याचा शाळेसाठी हसतखेळत उपयोग करून घेण्यात लईच माहीर .

म्हणून तर आजही मुखेडवासीय नाईनवाड गुरूजी असताना केंद्रीय शाळा लईच बघायसरखी होती हो ! उगंच नाहीत म्हणत. जुलै अठ्ठ्याण्णव मध्ये मला या शाळेत बदली मिळाली. वसंतराव गुरूजींच्या नेतृत्वाखाली जेमतेम दीडसाल काम करायला मिळालं.

(वसंतराव गुरूजी)

त्या दीडसालात गुरूजीच्या सान्निध्यानं व त्यांच्या बारिकसारिक उपदेशातून नवकरीला चाकरी न मानता सेवाभावात बदललं की जीवनाला खुमारी येते. सर्वसामान्यांकडून मान सन्मान मिळतो. तो विकत घ्यावा लागत नाही. आपण लेकरांच्या (विद्यार्थ्यांच्या) मनात आदर्शाचं घर करून राहातो. ही सहजतेनं वसंतराव गुरूजीकडून मला मिळालेली शिकवण. खरंच मी नशीबवान.


हे सारं मांडण्याचं कारण आपले वसंतराव नाईनवाड गुरूजी आज एक्यांशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
निर्भेळ व निरामय जगताना इत्तरांना उभारी देणार्‍या मोहनावती नगरीच्या या देवमाणसानं निरोगी व स्वास्थ्यपूर्ण वाढदिवसाचं शतक साजरं करावं. ही विधात्यास प्रार्थना !

एकनाथ मा. डुमणे
सावरगाव ता.मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *