मार्चपर्यंत माळाकोळी-नागदरवाडी-मजरेसांगवी-दगडसांगवी-कुरूळा रस्ता होणार !!
लोहा – मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या ‘ जाऊ तिथे खाऊ ‘ या चिञपटात विहीर चोरीला गेल्याची कथा होती.माञ,लोहा तालुक्यातील माळाकोळी-मजरेसांगवी-दगडसांगवी-कुरूळा हा प्रजिमा-59 नंबरचा हा रस्ताच चोरीला गेल्याचे वास्तव समोर आले.अखेर बांधकाममंञ्यांसमोर हा प्रकार गेला आणि त्यांच्या मध्यस्थीने रस्ता सापडला.
माळाकोळी-मजरेसांगवी-दगडसांगवी-कुरूळा हा प्रजिमा-59 नंबरचा रस्ता आहे.हा रस्ता स्वातंञ्यापासून आहे.अनेक वर्षे या मार्गावर एस.टी.महामंडळाची वाहतूक सुरू होती.या रस्त्याचे काम व्हावे,म्हणून या भागातील नागरिक,पञकार व राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.अनेकदा निवेदने देण्यात आली.अशोकराव चव्हाण बांधकाममंञी झाले.त्यानंतरही अनेकदा निवेदने देण्यात आली.कुरूळा पञकार संघाचे शिष्टमंडळही बांधकाममंञ्यांना भेटले.
शेवटी या रस्त्यासाठी 12 कोटींचा निधी मंजूर झाला.पण दुर्दैव असे की,हा मंजूर रस्ताच चोरीला गेल्याची तक्रार लोहा तालुका काँग्रेसचे सचिव दिगंबर मेकाले व सहकार्यांनी नांदेडचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंडळ अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता व लोहा उपअभियंता यांच्याकडे दिली.तसेच मुख्यमंञी व बांधकाममंञी अशोकराव चव्हाण यांनाही निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.कारण काम मंजूर होते प्रजिमा-59 म्हणजेच माळाकोळी-नागदरवाडी-घोनातांडा-मजरेसांगवी-दगडसांगवी ते कुरूळा या मार्गाचे.पण प्रत्यक्षात हे काम माळाकोळी-वागदरवाडी-चोंडी या मार्गावर नियम डावलून चुकीच्या मार्गाने सुरू होते.स्थानिक लोहा येथील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या सांगण्यावरून कंञाटदार संजय जोगदंड यांनी हे काम सुरू केले होते.
हे काम थांबविण्यात यावे.चुकीच्या रस्त्यावर सुरू आहे.म्हणून दिगंबर मेकाले व सहकार्यांनी गेल्या 13 महिन्यांत चार वेळा निवेदने दिली.पण त्यांच्या निवेदनांची दखल स्थानिक व वरिष्ठ अधिकार्यांनी घेतली नाही.उलट त्यांना दादागिरीची भाषा केली.तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागितली तरी 30 ते 35 वर्षे निघून जातील.तोपर्यंत तुम्ही तरी वाचणार का? ज्या मार्गावर काम सुरू आहे,तोच मार्ग खरा आहे.यापूर्वीही आम्ही प्रजिमा-59 नंबरच्या रस्त्याचे काम या मार्गावरच केले आहे.आमच्याकडे याबाबतची कागदपञे आहेत,अशी धमकीवजा भाषा उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी निवेदनकर्त्यांना वापरली.
प्रकरण हाताबाहेर जात आहे.यंञणा ऐकत नाही.काम थांबवत नाही.वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नाहीत.म्हणून हताश झालेल्या निवेदनकर्त्यांनी ही बाब याच भागातील भूमिपुञ असलेले औरंगाबादेतील पञकार प्रकाश भगनुरे पाटील यांना कळविली.सा.बां.च्या औरंगाबादेतील मुख्य अभियंत्यांकडे याबाबत दाद मागता येईल का ? असा सवाल केला.
त्यावर पञकार प्रकाश भगनुरे यांनी दि.20.10.2021 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रादेशिक अभियंता दिलीप उकीर्डे यांची भेट घेऊन चौकशी करण्यासाठी निवेदन सादर केले.मुख्य अभियंत्यांनी तात्काळ दखल घेऊन सहायक प्रादेशिक मुख्य अभियंता श्री.सय्यद यांना चौकशीसाठी नांदेडकडे पञव्यवहार करण्याचे आदेश दिले.त्यानुसार नांदेडचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी सदरचे काम बंद करण्याचे आदेश दिले.एवढेच नाही तर स्वतः माळाकोळी-नागदरवाडी-घोनातांडा-मजरेसांगवी-दगडसांगवी असा दौरा करून शहनिशा केली.हाच रस्ता प्रजिमा-59 असल्याचे सिध्द केले.त्यामुळे चोंडी गावाहून प्रजिमा-59 हा रस्ता असल्याचा वारंवार आव आणणारे लोह्याचे उपअभियंता श्री.जोशी व कनिष्ठ अभियंता वैजनाथ धाडगे हे तोंडघशी पडले.आता या दोन्ही अधिकार्यांविरुध्द वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? कंधार व लोहा तालुक्यातील असे किती रस्ते या अधिकार्यांनी वळविले आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिगंबर मेकाले यांनी शेवटच्या दि.21.10.2021 च्या निवेदनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.हे आमरण उपोषण दि.22.11.2021 रोजीपासून करण्याचा इशारा दिला होता.तत्पूर्वी, प्रत्यक्षात काम दि.17.11.2021 रोजीपासून बंद करण्यात आल्याचे नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.कंञाटदाराने काम बंद केले.मुख्यमंञ्यांचे मुंबईहून जिल्हाधिर्यांना आलेले पञ,बांधकाममंञी अशोकराव चव्हाण यांचा पालकमंञी म्हणून दबाव,प्रादेशिक मुख्य अभियंत्यांचा चौकशीसाठी ससेमिरा,यामुळे यंञणेवर दबाव आला.
नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिस अधीक्षक आणि बांधकाम खात्याच्या नांदेडमधील अधिकार्यांना पञव्यवहार करून तात्काळ उपोषणार्थींची दखल घेण्याचे आदेशित केले.तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानंतर माञ 22 नोव्हेंबर 2021 चे उपोषण थांबवायचे कसे? उपोषणार्थींना उपोषणापासून परावृत्त कसे करायचे ? असा प्रश्न लोह्याचे सा.बां.उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांसमोर पडला.नांदेड व लोहा येथील अधिकार्यांनी उपोषण थांबवा,अशी विनवणी सुरू केली.त्यावर उपोषणार्थींनी काम कधी होणार ? याबाबत लेखी पञ द्या,अशी मागणी केली. त्यावर अधिकार्यांनी बोलतो,पाहतो,भेटतो,लेखी पञ घेऊन येतो,असे म्हणत टोलवाटोलवी व फिरवाफिरवी सुरू केली.
त्यानंतर माञ उपोषणार्थींनी चिडून ठरलेल्या दिवशी म्हणजेच दि.22 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.उपोषण सुरू झाले. तेव्हा कुठे दुपारी वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी प्रजिमा-59 या रस्त्याचे काम करण्याविषयी लेखी पञ देण्याचे मान्य केले.
दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी म्हणजेच उपोषणाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होती.ही बैठक संध्याकाळी 7.45 पर्यंत चालली.त्यानंतर बांधकाममंञी अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ.बिपीन इटनकर यांच्या हस्ते उपोषणार्थींना मार्च 2021 पर्यंत काम करण्याचे लेखी पञ देण्यात आले.या वेळी बांधकाममंञी अशोकराव चव्हाण यांनी अधिकार्यांना फैलावर घेत ज्या मार्गावर काम मंजूर झाले त्याच मार्गावर काम करा. माळाकोळी-नागदरवाडी-घोनातांडा-मजरेसांगवी-दगडसांगवी ते कुरूळा या प्रजिमा-59 मार्गावरच काम झाले पाहिजे,असे ठामपणे सांगितले.बांधकाममंञ्यांच्या मध्यस्थीने हा हरवलेला रस्ता सापडला.
या रस्त्याचे काम 2019 मध्ये मंजूर झाले असून हाच रस्ता प्रजिमा-59 आहे.तो मजरेसांगवी मार्गेच करण्यात येईल. रस्त्याचे काम मार्च-2021 पर्यंत सुरू करण्यात येईल,अशा आशयाचे पञ उपोषणार्थींना देण्यात आल्याने या परिसरात जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन बांधकाममंञी अशोकराव चव्हाण यांच्याच हस्ते व्हावे,अशी भावना या भागातील जनतेची आहे. असे तक्रारदार दिगंबर रामचंद्र मेकाले, प्रकाश भगनुरे पाटील यांनी सांगितले.