मुखेड -लोकशाही ही भारताला नवीन होती.संपूर्ण जग कस असलं पाहिजे तर ते भारतीय संविधानाप्रमाणे असलं पाहिजे असे मत विद्वानांनी व्यक्त केले. एवढे संविधान महत्वपूर्ण आहे व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नाने निर्माण केले. डॉ.बाबासाहेब नेहमी म्हणायचे मी प्रथमतः भारतीय आहे व अंतीमत: भारतीय आहे. देशात असंख्य भेदाभेद होते त्यात एक सुसूत्रता आणण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले.ज्या देशाची स्त्री प्रगत तो देश प्रगत असे ते म्हणत. या देशातून जातिव्यवस्था व भांडवलशाही नष्ट व्हावी असे त्यांचे प्रयत्न होते.
समतावादी जीवन जगा असे त्यांना वाटायचे. आपण इतरांना स्वातंत्र्य देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. आजही ती आपल्याकडे नाही. सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण व्हावी असे त्यांना वाटत असे. माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे शस्त्र आपल्या हाती दिले.आता मैदानावरील लढाई संपली असून आता ज्ञानाची लढाई सुरू झालेली आहे.
भारताला संसदीय लोकशाही देण्याचे काम त्यांनी केले.या देशाला राष्ट्र म्हणून ओळख डॉ.बाबासाहेबांनी दिली असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालय नांदेड येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.अजय गव्हाणे यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्मा बद्दलचे आकर्षण हे विद्यार्थीदशेपासूनच होते कारण त्यांना दहावीला असताना त्यांच्या गुरूंनी बुद्ध चरित्र वाचायला दिले होते.
त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. संत कबीर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका,संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. त्याचा वापर आपण कसा करतो आहोत याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.नानकचंद रत्तूला ते म्हणाले होते की माझा समाज जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत मला झोपता येत नाही. आपण अशा कार्यक्रमातून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचे काम केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शंकरय्या कळ्ळीमठ यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठी मागची भूमिका विशद केली व विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले.आर्थिक स्थैर्य रुजविण्याचे काम केले. डॉ.बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते असे ते यावेळी म्हणाले.
पाहुण्यांचा परिचय माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांनी करून दिला. सूत्रसंचलन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.पंडित शिंदे यांनी केले तर वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुभाष कनकुटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक संघटनेत सक्रिय असलेल्या प्रा. डॉ.उत्तम सूर्यवंशी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.यावेळी प्रस्तुत विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री वीरभद्र भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीप गायकवाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, वसंतनगर संकुलातील कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.