भारतीय संविधान म्हणजे मूल्यांतराची उत्कट अवस्था होय – सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांचे प्रतिपादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चार दिवसांच्या व्याख्यानमालेचा समारोप

नांदेड – आपल्या देशाला स्वातंत्र्य फाळणीसह मिळाले आहे. मुस्लिमांनी पाकिस्तानची मागणी केल्यानंतर हिंदूंनी धर्मधिष्ठित हिंदूस्थानची मागणी केली. जे करोडो अस्पृश्य, शुद्रातीशुद्र यांना यामुळे स्वातंत्र्य मिळणार नव्हतं. क्रांतीचा विचार सतत डोक्यात दृढमूल होत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही. तमाम भारतीयांच्या जगण्याला एक नवा अर्थ, नवा मूल्याशय देण्यासाठी संविधानाची निर्मिती झाली. भारतीय संविधानामूळे देशात व्यवस्थांतराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय अशी नवी मूल्ये भारतीयांना मिळाली. संविधान भारतीयांसाठी मूल्यांतराचा महाप्रकल्पच असून संविधान म्हणजे मूल्यांतराची उत्कट अवस्था असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ते अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

यावेळी महामंडळाचे तथा व्याख्यानमालेचे निमंत्रक प्रशांत वंजारे, समन्वयक प्रज्ञाधर ढवळे, महामंडळाच्या अध्यक्षा सीमा मेश्राम, अमृत बनसोड, संजय मोखडे, शुभांगी जुमळे, सरिता सातारडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

      महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ महापरिनिर्वाण दिनानिमित्त चार दिवसीय 'संविधान सत्र' ही फेसबुक लाईव्ह ऑनलाईन व्याख्यानमाला तीन डिसेंबरपासून आयोजित करण्यात आली होती. यात प्रा. माधव सरकुंडे, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. अनमोल शेंडे यांनी सहभाग घेतला.

समारोप करताना डॉ. मनोहर म्हणाले की, संविधानातील मूल्ये नाकारण्याची प्रक्रिया झुंडशाहीवाद्यांनी, धर्मांधतावाद्यानी सुरू केली आहे. बाबासाहेबांना, त्यांच्या कार्याला, वैश्विक क्रांतीच्या तत्वज्ञानाला वंदन करायचं, मूलभूत पातळीवरुन जगाची निरंतर पुनर्रचना करणाऱ्या तत्वज्ञानास अभिवादन करायचं आणि त्या निमित्ताने त्या तत्वज्ञानाचा जो केंद्रबिंदू असलेल्या भारतीय संविधानाला विरोध करीत राहायचं असं सध्या सुरू आहे.

भारतीय संविधान आणि त्यामध्ये सारांश रुपाने बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वच तत्वज्ञान या संविधानामध्ये बांधलं गेलं आहे. या संविधानामध्ये भारतीयता आहे. भारतीय ही एक महान संकल्पना आहे. ती मोठी अर्थसुंदर आणि आशयसुंदर आहे. मी केवळ भारतीय आणि भारतीयच आहे अशा प्रकारच्या भारतीय नावाच्या संकल्पनेचा संपूर्ण आशय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात भरून ठेवला आहे.

     संविधानमूल्ये  या विषयावर बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, भारतीय संविधान हे मूलतः क्रांतीचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठ्या बुद्धाच्या श्रमण संस्कृतीकडून स्विकारले आहे.  भारतातील लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. 

या देशातील संविधानवाद्यांनी, परिवर्तनवाद्यांनी ही प्रक्रिया अंमलात आणण्याची गरज आहे. श्रेणीविहिन, विषमताविहिन, इहवादी, समतावादी रचना, मूल्यव्यवस्था यामुळे भारतीयत्व प्राप्त होते. सर्वमानवसमभावाचा, विज्ञाननिष्ठेचा संपूर्ण नवा आशय हेच संविधानाचे प्रधान मूल्य आहे. स्वातंत्र्य हे सर्वात श्रेष्ठ संविधानमूल्य आहे. इहवाद, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, निरंतर पुनर्रचना, सममूल्यता ही संविधानमूल्ये इथली परंपरागत वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, अस्पृश्यता, श्रेणीव्यवस्था नाकारतात. ही संविधानमूल्ये विशेष अधिकार देऊन प्रत्येक माणसाला महानायकत्व प्रदान करतात. अशा प्रकारे डॉ. यशवंत मनोहरांनी संविधान मूल्यांची सविस्तर मांडणी केली.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन लाईव्ह पद्धतीने सुरू असलेल्या समारोपीय व्याख्यानास अजय रामटेके, सुरेश खोब्रागडे, गौतम गायकवाड, विजयकुमार गवई, चंद्रशेखर उराडे, सुनिल कुमरे, वंदना सोनावळे, कोंडबा हटकर, शिवाजी कांबळे, सज्जन बरडे, अभय अवथरे, कैलास गोडबोले, शरदचंद्र मानकरी, योगिनी वंजारे, किशनराव पतंगे, संजय मोखडे, दिनेश सोनकांबळे, दिनकर कांबळे, सागर जाधव, पृथ्वीराज चव्हाण, भैय्यासाहेब गोडबोले, नरेश वाहणे, किरण सागर, रमेश जीवने, बंडूजी जीवतोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संविधान हीच आपली एकमेव महाअस्मिता

       भाजपाची आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता आल्यानंतर हिंदू राष्ट्र निर्मितीचा प्रकल्प अत्यंत जोमाने सुरू झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संविधान नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांनाही माहिती आहे की, संविधान सरळ सरळ नाकारता येत नाही. म्हणून संविधानाचा गौरव करीत राहायचं आणि दुसरीकडे संविधानमूल्यांना बगल द्यायचं हे सुरुच आहे. संविधानाला एकप्रकारे निष्प्रभ करीत राहायचं, संविधानातील जी तत्वे आहेत त्या तत्वज्ञानाला नकार देत रहायचं आणि धर्माचं अधिष्ठान मजबूत करायचं षडयंत्र कट्टरवादी लोकांनी सुरू केलेलं आहे.

एक देश, एक भाषा, एक नेता हा कार्यक्रम सुरु झालेलाच आहे. या पार्श्वभूमीवर या देशातील बहुजन, आदिवासी, भटके विमुक्त, सर्व ओबीसी, मुस्लिम ख्रिश्चन, बौद्ध – बौद्धेत्तर दलित या सगळ्या लोकांनी आपल्या अस्तित्वाचा विचार करायचा आहे. तुमचं परावलंबित्व, पारतंत्र्य, वर्णव्यवस्था परत निर्माण केली जात आहे. संविधानाचा सन्मान संविधानासाठी नाही तर स्वतःसाठी करायला हवा. त्यामुळे संविधान कुणी नाकारू शकणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. संविधानाने भारतीयांना या देशाचं अधिनायकत्व बहाल केलंल आहे.

आता एकत्र येऊन, या देशाची सत्ता हस्तगत करुन सिद्ध करावं. या सगळ्या लोकांनी आपापल्या जातींच्या महापुरुषांच्या जून्या अस्मिता विसर्जित करून करुन संविधान नावाच्या एकमेव महाअस्मितेसाठी एका झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे असे आवाहन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. आपण एकत्र आलो तर माणूसकीचं, अस्तित्वाचं, आपल्या सन्मानाचं, अस्मितेचं संविधान कुणी नाकारू शकणार नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *