नांदेड -संघर्ष म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब व गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे संघर्ष असे त्यांचे समीकरण होते. मुंडे साहेबांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले.महात्मा फुले यांच्या कडून विद्येचे महत्त्व लक्षात घेऊन शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केले. तसेच त्यांच्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ही ते सतत प्रयत्न करत राहिले.
राजर्षी शाहू महाराजां प्रमाणे सर्व मागास घटकांना आरक्षण देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून माधवचा मंत्र अमलात आणून बहुजनांना एकत्र संघटित केले.तर आयुष्यभर वंचितांसाठी संघर्ष केला.हा संघर्ष करताना त्यांना स्व-पक्षासी, विपक्षासी, स्वपरिवारासी संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा संघर्ष आजही संपलेला दिसत नाही.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी खऱ्या अर्थाने आयुष्यभर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी नांदेड येथे वंजारी समाजाकडून आयोजित केलेल्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ गणितज्ञ जनार्धन मुंडे गुरुजी म्हणाले की मुंडे साहेब सर्वसामान्यांचे नेते होते. अडचणीत सापडलेल्या प्रत्येक माणसाला आधार देण्याचे काम ते करीत असत. सतत माणसात वावरणारा हा नेता होता. सत्तेचा उपभोग कमी मिळाला असला तरी ही ते जनतेच्या हृदयावर राज्य करून गेले. त्यांना सतत वंचितांच्या विकासाची चिंता होती. माझे आणि त्यांचे पारिवारिक संबंध होते. त्यांच्या जाण्याची उणीव सतत जाणवते आहे.
प्रा.डॉ.ज्ञानेश्वर डिगोळे म्हणाले की मुंडे साहेब उजव्या विचारांच्या पक्षात असले तरी त्यांची कृती डाव्या विचारांसाठी पोषक होती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुःख जाणणारे हे नेतृत्व होते. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी कार्य केले.
प्रा.डॉ. विठ्ठल दहिफळे यांनी मुंडे साहेबांना भेटल्याच्या आठवणी सांगून वंचीतांचा आधारवड मुंडे साहेब असल्याचे सांगितले.
यावेळी पंढरीनाथ आघाव,श्रीकर फड,मयूरेश हामंद, डॉ. प्रवीण मुंडे,संजय बोबडे, डॉ. अतुल चंद्रमोरे,सुकेश मोरे,प्रा.डॉ. दशरथ मुंडे, डॉ.शिवराज केंद्रे आदींची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतराम गीते यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली. यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मंदिर उभारण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी देणग्या जाहीर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय केंद्रे यांनी केले तर आभार संयोजक अशोक गीते यांनी मानले.
तदनंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नियोजित मंदिराच्या जागी वट वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.