कंधार : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून १८ डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो़ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ योजनांची अंमलबजावणी मात्र नुसतीच कागदोपत्री दाखविण्यात येते़ योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच उदासिन असल्याने बहुतांश योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत ऑल इंडिया तंजिम ए इंसाफ संघटनेच्या वतीने व्यक्त करत अल्पसंख्याक दिनानिमित्त कार्यालयात, चर्चा सञ, कार्यशाळा घेऊन साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
विविध अभियानाच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक १८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्र, धार्मिक, भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसंबंधी केलेल्या घोषणेनुसार दरवर्षी १८ डिसेंबर हा दिन अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
सदर दिवशी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे चर्चासत्र, कार्यशाळा इ. कार्यक्रम आयोजित करण्यात येतात पण तालुका स्तरावर कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाही व अल्पसंख्यांक समाजातील कोणालाही बोलावले जात नाही.
तरी आपल्या कार्यालयात मिळणारे योजना/सुविधा तसेच नगर परिषद , पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या योजना व अनुदान अल्पसंख्यांका पर्यंत पोहचत नाहीत तरी येणाऱ्या 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्कदिन आपल्या कार्यालयात,चर्चा सञ ,कार्यशाळा घेऊन साजरा करावा अशी ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे शहर अध्यक्ष सय्यद सादात यांच्या वतीने कंधार तहसील चे तहसीलदार संतोष कामठेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर अॅड शहेबाज खान, हासीब परदेसी, शेख जुबेर, शेख हाजी असिम हाफीज इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.