ऊसतोड मजुरांना गोपीनाथराव मुंडे जयंती मंडळाकडून मायेची ऊब ;लोकनेत्याचा वारसा जपत… जयंती मंडळाने केले ऊसतोड मजुरांना “चादर ,स्वेटर” वाटप

माळाकोळी येथे गोपीनाथ राव मुंडे जयंती निमित्त स्तुत्य उपक्रम

माळाकोळी ; एकनाथ तिडके

बोचरी थंडी… उघडी नागडी चिमुकली…. शेकडो किलोमीटर घरदार सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेली ऊसतोड कामगार…. पहाटेपासूनच पोटाची खळगी भरण्यासाठी चा संघर्ष सुरू… थंडीमुळे लहान चिमुकल्यांचे होणारे हाल डोळ्यात साठवून माता सुद्धा आपल्या कामावर जड अंतकरणाने जात होती. … मात्र आपल्या चिमुकल्यांची व कुटुंबाचीही होत असलेले हाल ती कुणालाही सांगू शकत नाही…. याच परिस्थितीत धावले माळाकोळी येथील युवक…. ज्या लोकनेत्यांनी जीवन भर कष्टकरी कामगार यांच्या उद्धाराचा घोष केला

त्याच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माळाकोळी पासून जवळच असलेल्या बेलवडी येथे उत्तर प्रदेशातून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या चिमुकल्यांना मायेची ऊब मिळऊन देण्याचा प्रयत्न केला आहे. बेलवाडी येथे उपस्थित असलेल्या सर्वच ऊसतोड कामगार यांना माळाकोळी येथील गोपीनाथरावजी मुंडे जयंती मंडळाने चादर व लहान मुलांना स्वेटर,कानटोपी वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राहून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.


बोचऱ्या थंडीतही अर्धवट फाटलेल्या कपड्यात काम करत त्याच परिस्थितीत उघड्या माळावर कसल्याही संरक्षणाशिवाय थंडीमध्ये फाटक्या पालात राहत असलेल्या ऊसतोड कामगारांची परिस्थिती पाहिल्यानंतर माळाकोळी येथील लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या जयंती मंडळाने निर्णय घेतला…. ज्या लोकनेत्यांनी जीवनभर कष्टकऱ्यांसाठी काम केले त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डिजे वा इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा या लोकांच्या चेहऱ्यावर काही आनंदाचे क्षण आणण्यास आपण जर समर्थ ठरलो तर तीच खरी लोकनेत्याला श्रद्धांजली ठरेल आणि याच भावनेतून त्यांनी लोकवर्गणी जमा करत या पाड्यावर ऊस तोडणीसाठी आलेल्या सर्वच कामगारांची यादी केली आणि त्या सर्वांना पुरेल एवढी चादर व त्याच प्रमाणे त्या पाड्यावर असलेली सर्व लहान मुले यांच्यासाठी स्वेटर ,कानटोपी, खरेदी करून वाटप केली आणि त्यांना या थंडीमध्ये मायेची ऊब देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.या ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम येथील जयंती मंडळा च्या युवकांनी केले आहे.


माळाकोळी येथील युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पारंपारिक पद्धतीने डीजे लावून नाचत जयंती साजरी करण्याची प्रथा मागे टाकून स्तुत्य उपक्रम राबवत गरजूंना मदत करण्याची चांगली प्रथा सुरुवात झाली याबद्दल ग्रामस्थांनी जयंती मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

मुंडे साहेबांचे नाव आम्ही ऐकले होते आज त्यांच्यामुळे आम्हाला थंडीपासून संरक्षण मिळाले , रोजगार मिळत नसल्यामुळे व गरीबीमुळे आम्ही खूप लांबून याठिकाणी मजुरीसाठी आलो मात्र आमची लेकरं व आम्ही थंडीतच काम करत असल्याचे पाहून जयंती मंडळाने आम्हाला चादर , मुलांना स्वेटर ,कानटोपी देऊन आम्हाला थंडी पासून वाचण्याचे काम केले आहे.                                            -    मेसाबाई इमरत मजूर महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *