पोलादपूरकरांनी वारकरी संचित जोपासले –
मुंबई : (रवींद्र मालुसरे) महाराष्ट्राच्या वैभवशाली संत परंपरेचा मोलाचा वारसा आपल्या भूमीत जन्मलेल्या शेकडो संतांनी जोपासला. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम हा वारकरी संप्रदायातला महत्वाचा टप्पा आणि हेच मराठी माणसाचे संचित आहे, त्याचबरोबर पोलादपूर तालुक्यात दुर्गम खेडोपाडयात जन्मलेल्या वारकरी सांप्रदायातील धुरीणांनी गेल्या शंभर वर्षात आपल्या सुगंधित कार्याने तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात करून दिली आहे. समाजाप्रती केलेल्या त्यांच्या कार्याचे ऋण पुण्यात राहणाऱ्या तुम्हा तालुकावसीयांच्या मनात असल्यानेच त्यांना अर्पण करणारी दिनदर्शिका तुम्ही प्रकाशित करीत आहात हा विचार मला त्यामुळे अधिक मोलाचा वाटतो. असे उदगार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे या संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या धार्मिक दिनदर्शिकेचे प्रकाशन दरेकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी पुण्यात बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित पोलादपूर भवनासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी तात्काळ जाहीर केली. यावेळी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी संघाने केलेल्या ठळक कामांचा आढावा घेतला. पोलादपूर मधिल दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत केली होती. तसेच पुणे मनपाने आवाहन केल्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते असे सांगितले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, शहर संघटक राजू कदम, नगरसेवक पुणे मनपा आदित्य माळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
(सोबत फोटो देत आहे)