मुखेड: (दादाराव आगलावे)
सासर आणि माहेर या दोघांनीही नाकारलेल्या एका स्त्रीने पुढे इतिहास घडवला. अभागी जन्मदात्यांनी टाकून दिलेल्या अनेकांना त्यांनी मायेचा ओलावा आणि आश्रय दिला. आज माईंची अनेक लेकरं अभिमानाने जगत आहेत. त्यांचं कुटुंब म्हणजे हजारो अनाथ बाळे, शेकडो जावाई , सुना आणि नातवंडे, एवढा मोठा पसारा लेकरांच्या राशनसाठी भाषण करून पै-पै जमवून अनाथ लेकरांच्या ओठी चिमणीप्रमाणे घास भरवून त्यांच्या पालक विरहित जीवनाला समर्थपणे उत्तुंग भरारीचं बळ दिलं. आईंनी टाकून दिलेली बाळं आज तुमच्या जाण्याने ‘माई, माई’ असा टाहो फोडताना पाहून मन विदीर्ण होत आहे अशी भावपूर्ण श्रद्धांजली वहातांना डॉ. दिलीप पुंडे बोलत होते.
सुप्रभात मित्र मंडळ च्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सुप्रभात चे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, डॉ. आर.जी. स्वामी डॉ. वीरभद्र हिमगिरे, सुप्रभातचे संघटक अशोक कोतावार, उत्तम अण्णा चौधरी, नंदकुमार मडगुलवार, शिवाजी कोनापुरे, लक्ष्मीकांत चौधरी, मनोज जाजू, प्रविन कवटीकवार, एस. पी. कपाळे, उत्तम कुलकर्णी, सचिन देबडवार, दिनेश चौधरी यांची उपस्थिती होती.
डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, निसर्ग प्रत्येकाला एक विशेष गुण प्रदान करतो, तो प्रत्येकाला हेरता येत नाही. मात्र त्या स्वःपारखी होत्या. त्यांचा गोड गळा जीवन नकोसे वाटण्याच्या काळात त्यांना जगण्याचा लळा लावून गेला. भिक मागत आयुष्य जगत असतांना वेदनेच्या संवेदनेतून या स्त्रिला जगण्याचं बळ मिळाले.
त्या उभं राहाण्यासाठी भटकंती करताना भिकारी, भटके यांचे दुःख जवळून पाहत होत्या. या अनाथांनीच त्यांना संरक्षण कवच पुरवले. आपल्या संवेदी मातृ-हृदयात त्यांच्या वेदनेप्रति पाझर फुटणे स्वाभाविकच होतं. यातूनच त्यांना अनाथांची आई होण्याची प्रेरणा मिळाली, हजारो निष्पाप जीवांच्या त्या माई बनल्या. त्यांना आपलं नाव लावून ओळखही प्रदान केली.
अभागी जन्मदात्या मायबापांना नकोशा वाटणाऱ्या बालकांना वाढवून, सुशिक्षित आणि संस्कारित करून त्यांनी त्यांच्यात हिमतीने जगण्याचं बळ पेरलं. देवाला सगळीकडे लक्ष देता येत नसावं म्हणून त्यांना अथांगसिंधू मातृ हृदय बहाल करून देवी रूपानेच पृथ्वीतलावर पाठवलं असावं. माईंचा जीवनप्रवास म्हणजे करुणा, मातृभाव, वेदना, संघर्ष आणि समर्पण यांचा संगम होय. अनेकांसाठी तो प्रेरणादायी आहे. यावेळी डॉ. आर.जी. स्वामी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दादाराव आगलावे यांनी केले. शेवटी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.