एप्रिल-मे, 1978 मध्ये झालेल्या विद्यापीठांच्या परीक्षेचे निकाल जून-जुलै पर्यंत लागणार होते. त्याकाळी विद्यापीठाचे निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असत. जे विद्यार्थी पास होत, त्यांचे बैठक क्रमांक वर्तमानपत्रात छापून येत असत. ज्यांचा बैठक क्रमांक छापून आला नाही, तो विद्यार्थी नापास झाला असे समजले जात असे. प्रत्यक्ष गुणपत्रिका पाहिल्यानंतर त्याची खात्री होत असे.
जून, 1978 च्या शेवटच्या आठवड्यात नागपूर विद्यापीठाच्या बी.ए.भाग-3 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. आमच्या गावात त्या काळी वर्तमानपत्र येत नसे. कोणीतरी एखादा शहराच्या ठिकाणी गेला, तर त्याला खास करून निकाल असेल तर वर्तमानपत्र आणण्यासाठी विनवणी करावी लागत असे. अन्यथा जवळच्या शेंदुरजना (अढाव) या सहा किलोमीटर अंतरावरील गावी, पायी जाऊन निकाल मिळतो कां, ते पाहावे लागत असे.
त्या दिवशी बी.ए.भाग-3 च्या परीक्षेचा निकाल लागला होता. मला पास होण्याची खात्री होती. तथापि, वर्तमानपत्रात माझा बैठक क्रमांक नव्हता. वर्तमानपत्रात बैठक क्रमांक नाही, याचा अर्थ, मी नापास झालो असाच संपूर्ण गावाने घेतला. अनेकांनी मला खोदून-खोदून विचारले. मी मात्र एकच उत्तर देत होतो. छापून आलेल्या निकालात काहीतरी चूक होत आहे. मी नापास होऊच शकत नाही. एकदाही नापास न झालेला आमच्या गावातील मी एकटाच विद्यार्थी होतो. त्यामुळे वर्तमानपत्रात माझा बैठक क्रमांक नाही, हे पाहून अनेकांना आनंदही झाला होता. आता हा सुद्धा आपल्या पंगतीत आला, असे त्यांना वाटत होते. काही पालकांना तर आपली मुले नापास झालीत याची खंत वाटत नव्हती, तर मी नापास झालो यातच समाधान ही वाटत होते. तथापि, अशांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती.
काही आयांनी तर “नापास होत नाही, नापास होत नाही” असा सांगत आहे. आता “लागलं ना चंदन” असेही शेरे माझ्या तोंडावरच मारले होते. मला ऐकल्याशिवाय काही पर्याय नव्हता. आई-बाबा मात्र, मला धीर देत होते. जे झालं असेल, ते झालं असेल. तू काळजी करू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. लोक काय म्हणतात, त्याकडे लक्षही देऊ नकोस, असे सतत सांगायचे. व्यक्तीश: मला पास होण्याची खात्री असल्यामुळे मी मनातून आश्वस्त होतो.
निकाल लागल्यानंतर सात-आठ दिवसात कॉलेजमधून गुणपत्रिका मिळत असत. माझ्या गावातून मी एकटाच होतो. परंतु, आसपासच्या गावातील अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून गुणपत्रिका कधी मिळणार आहे व कधी घ्यायला जायचे आहे, याबाबत चर्चा करीत होतो. माझेसोबत तारासिंग चव्हाण, पिंपळगाव, मोहन राठोड, कुंभी, सदाशिव भालेराव हे व इतर मित्र पास झाले होते. कॉलेजमध्ये जाऊन एकदा गुणपत्रिका कधी बघतो, यासाठी मी जास्त उताविळ होतो. गुणपत्रिका घेण्यासाठी या सर्वांच्या आधी मी पुसदला पोहोचलो. तेथे गेल्यावर चौकशी केली. असे कळले की, माझा निकाल विद्यापीठाने राखीव ठेवला आहे. आठ-दहा दिवसात निकाल मिळेल. आता मात्र माझी खात्री झाली की, तांत्रिक कारणाने माझा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, मी नक्कीच नापास झालेलो नाही. मनात आशा घेऊन परंतु रिकाम्या हाताने मी परत आलो. माझ्या इतर सर्व मित्रांनी दाखले व गुणपत्रिका घेतल्या व पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशाची तयारी सुरू केली.
सदाशिव भालेराव व मोहन राठोड यांनी नांदेडला तर तारासिंग चव्हाण यांनी अकोला येथे तर इतर अनेकांनी नागपूर येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतले होते. मी माझ्या निकालाची वाट पाहत होतो. सात-आठ दिवसानंतर पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली. माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मी पास झालो होतो. मी गुणपत्रिका घेतली. आपलीच असल्याची खात्री केली. दाखला व इतर कागदपत्रे घेतली आणि कधी एकदाचा घरी जातो, असे मला झाले होते. मी पास झालो हे कधी एकदाचा आई-बाबांना सांगतो असे मला वाटत होते. मी बी.ए. झालो पदवीधर झाल्याचा आनंद होता, कारण आमच्या इंगलवाडी गावातून मी पहिला पदवीधर झालो होतो.
त्याकाळी गावी जाण्यासाठी दोन मार्ग होते एक दिग्रसकडून जाणारा व दुसरा पुसद, अनसिंग मार्गे वाशिम जाणारा. पुसद वरून अनसिंग करिता त्याकाळी 90 पैसे तिकीट लागायचे व दिग्रसकडून जातांना 4.00 रुपये तिकीट लागायचे. त्यामुळे आम्ही अनसिंग मार्गे जाण्याला अधिक पसंत करायचो. एकदाचा अनसिंगला पोहोचलो. तेथून साधारणत: 12 किलोमीटर पायी जावे लागत असे. अनसिंग ते लाखीपर्यंत गिट्टी टाकलेला रस्ता होता. त्या रस्त्यावरून दिवसातून दोन-तीन फेऱ्या बसच्या धावत असत. लाखी येथून इंगलवाडीपर्यंत मात्र साधा रस्ता होता. 1972 ते 74 या काळात पडलेल्या दुष्काळात रोजगार हमी योजनेची अनेक कामे झाली. त्यात हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र त्यावर गिट्टी-डांबर इत्यादी काहीच टाकलेले नव्हते.
अनसिंग बाजारपेठेचे मोठे गाव होते. तेथून पेढे घेतले आणि मी क्षणाचाही विलंब न लावता गावाकडच्या रस्त्याने एकटाच सुसाट निघालो. 10-12 किलोमीटरचे अंतर मला चालून जायचे होते. अनसिंगला पोहोचायलाच सायंकाळचे 5.00 वाजले होते. दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे पाऊस येण्याचीही भीती होती. त्यामुळे अंधार पडण्यापूर्वी जेवढा रस्ता कमी करता येईल, तेवढा रस्ता कमी करावा हा उद्देश मनात ठेवून मी झपाझप पावले टाकत चालत होतो.
माझ्या गाडीतून उतरलेले 1-2 सहप्रवासी लाखीपर्यंत सोबत झाले होते. पुढील प्रवास मला एकट्यालाच चालत करावयाचा होता. त्याचप्रमाणे पुढील रस्ता जास्त अवघड, जंगल व घाटाचा होता. अंधारात त्यातून जावयाचे असल्यामुळे माझ्या मनावर अनावर दडपणही होते, आई-बाबांना मी पास झालो हे कधी एकदाचे सांगतो याचीही उत्कंठा होती. त्याचप्रमाणे मी नापास झालो याचीच चर्चा मागील 15 दिवस गावात होत होती. त्या चर्चेला पूर्णविराम देवून अनेकांची तोंडे कधी बंद करतो असे मला झाले होते. त्याच प्रेरणेने मी झपाझप पावले टाकत घर जवळ करण्याचा प्रयत्न करीत होतो.
इलखी, लाखी, मेंद्रा असे एक-एक गाव पादाक्रांत करीत पाच तास अथक चालत, मी शेवटी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास पुस नदी ओलांडून गावात पोहोचलो. रात्रीच्या काळोखात गडप झालेले गाव मला दुरूनच खुणावत होते. गाव पाहुन माझ्यात आणखी उत्साह संचारला. पावलांचा मंदावलेला वेग झपाट्याने वाढला. एकदाचा मी घरी पोहोचलो.
आई-वडिलांना मी अशाप्रकारे एवढ्या उशिरा घरी येणे अपेक्षित नव्हते. मला काही बोलू न देता ते माझ्यावर रागावत होते. कुठेतरी मुक्काम करून सकाळी उजाडल्यानंतर का आला नाहीस, असे ते दोघेही वारंवार सांगत होते. त्यांच्या रागावण्यामागे अनामिक काळजी दडलेली होती. थोड्यावेळाने ते शांत झाले. आईने स्वयंपाकासाठी चुल पेटविली. मी माझ्या सोबत आणलेला पेढा प्रथम देव्हाऱ्यात ठेवला व आई-बाबांना दिला. आनंदाने बाबांना मिठी मारीत सांगितले “बाबा मी पास झालो.” त्या दोघांचा आनंद वर्णित करताच येणार नाही. तो आम्हा तिघांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदी क्षण होता. आई बाबांचा राग कुठल्या कुठे पळाला होता.
रात्रीच्या काळोखात गडप होणारे माझे गाव, सकाळी चार वाजताच जागे होत असे. गावात त्याकाळी पिठाची गिरणी नव्हती. त्यामुळे हिवरा (खुर्द) येथे दळणासाठी जावे लागत असे. जास्त दळण आणण्यासाठी तेथे काम थांबवून जाणे शक्य होते. तथापि, अनेक कुटुंबात किलोभर आणणे, दळणे व खाणे असा प्रकार त्यावेळी चालायचा, त्यामुळे त्यांच्या घरच्या बाया, सकाळी चार वाजता उठून जात्यावर दळायच्या. आपल्या चिल्यापिल्यांना त्या माऊल्या कशाप्रकारे घास भरवत होत्या, याची आठवण आली तरी आज मनाची घालमेल होते.
संपूर्ण गाव पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी नदीवरच अवलंबून होते. डोक्यावर हंडे घेऊन पुरुष व स्त्रिया नदीवर पाण्यासाठी जायचे. नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंधरा-वीस मिनिटे थांबले तर साऱ्या गावची वार्ता समजून जायची. साऱ्या गावात त्याकाळी कोणाच्याच घरी शौचालय नव्हते. सारा भार नदी-नाले व शेतावर होता. मी सकाळी उठलो. घराबाहेर पडलो व नदीच्या मार्गाने लागलो. अनेकांनी कधी आलास व आली का मार्कलिस्ट अशी विचारणा केली. मी त्यांना पास झाल्याचे सांगितले. अगदी अर्ध्या तासात संपूर्ण गावात मी पास झाल्याची वार्ता पोहोचली. अनेकांच्या डोक्यात असं कसं झालं असेल हा प्रश्न होताच.
गावातील एका श्रीमंत व्यक्तीला वडिलांनी, पोरगा पास झाला तर थोडेफार पैसे देण्याबाबत आधीच शब्द टाकून ठेवला होता. त्यांनी त्यांना होकारही दिला होता. शेतात कामाला जाण्यापूर्वी बाबा मला सोबत घेऊन त्यांच्याकडे गेले. नमस्कार झाल्यावर मुख्य विषयाला हात घातला. हा “राम” पुढे कॉलेजला ऍडमिशन घेतो म्हणतो. काही पैसे हवे आहेत. मी हंगामात परत करेन. अशी विनंती केली. आमच्या पोहोचण्यापूर्वीच मी पास झालो. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांच्या वागण्यावरून त्यांना ते आवडले नाही, असे जाणवत होते. त्यांनी बाबांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. बाबांनी फार मोठ्या रकमेची मागणी केली नव्हती, 100/- रुपये मागितले होते. त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. जवळ काहीच नव्हते. बाबांनी मला घरी पाठवून दिले व अन्य काही ठिकाणी जाऊन येतो म्हणून मला सांगितले. तासाभरात बाबा आले आणि सांगितले, तू तयारी कर सायंकाळपर्यंत पैशाची तजवीज होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकात माझा बैठक क्रमांक समाविष्ट नसणे, ही तशी किरकोळ बाब. परंतु, त्यावेळी कोणतेही कारण नसतांना मोठा विषय झाला होता. त्यामुळे त्याची गावभर चर्चा होती. अनेकांच्या क्रिया प्रतिक्रिया त्यावर व्यक्त होत होत्या. यावर कांहीजण गंभीरपणे तर कांहीजण कळत-नकळत लक्ष ठेवून होते. त्यातील एक माझे हितचिंतक होते आदरणीय श्री. बळीराम डोंगरसिंग राठोड. बाबांना कदाचित खात्री असेल, त्यामुळे बाबांनी त्यांना गाठले. सत्य परिस्थिती सांगितली. तशी सांगायची गरजच नव्हती, त्यांना माहीतच होती. त्यांनी मी पैसे दिले हे कोणालाही न सांगण्याच्या अटीवर बाबांना पैसे दिले. खरे म्हणजे त्यांचीही आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, परंतु जगाकडे पाहण्याची दृष्टी चांगली होती.
मी प्रथम नांदेडला गेलो तेथील दोन्ही मोठ्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला नाही. निकाल विलंबाने लागल्यामुळे दोन्ही कॉलेजमधील प्रवेश पूर्ण झाले होते. मी निराश होऊन परत आलो. पुन्हा शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे प्रवेशासाठी प्रयत्न केला. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. परंतु, कॉलेजच्या वस्तीगृहात मात्र प्रवेश मिळाला नाही. एका प्रश्नाची सोडवणूक झाली होती. परंतु, त्यातूनच दुसरा प्रश्न निर्माण झाला होता.
आज आमच्या इंगलवाडी गावातून अनेक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, एवढेच नाही तर पी.एच.डी. धारक विद्यार्थी आहेत. गावातील डॉ. श्याम जाधव व डॉ. मनोज राठोड हे दोन पी.एच.डी. धारक इंगलवाडी या गावाने दिले आहेत. हे सांगतांना, बोलतांना मन अभिमानाने भरून येते. मात्र त्याच गावाला पहिला पदवीधर मिळायला 1978 पर्यंत वाट पहावी लागली होती.
आता गावातील कोणत्याही पालकाला मुलं शाळेत पाठवा हे सांगावे लागत नाही. गावातच इयत्ता दहावी पर्यंतची शाळा आहे. वाहतुकीच्या साधनांची रेलचेल आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अडचणींना तोंड द्यायची गरजच उरली नाही. खरे म्हणजे आताची पिढी भाग्य घेऊनच जन्माला आली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
राम पवार
सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक
अमरावती
भ्रमणध्वनी : 9284196496