शिवास्त्र : मुलांना नकार पचवणे शिकवा

शिवास्त्र : मुलांना नकार पचवणे शिकवा

तीनेक वर्षापुर्वी प्रचंड मोठ्या हुद्द्यावरील पतीपत्नी दोघेही आयएएस अधिकारी असलेल्या दाम्पत्यांच्या एकुलत्या एक मुलाने मुंबईत आत्महत्या केली होती.

भय्युमहाराजांसारख्या आध्यात्मिक गुरुंनी अशाच प्रकारे जीवनयात्रा संपविल्याचे सर्वांना ज्ञात आहेच. मागच्या आठवड्यात पालकांनी मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून एका मुलाने आत्महत्या केल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली होती.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने गळफास लावून मृत्यूला कवटाळले. दरवर्षी दहावी – बारावी रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी कमी गुण मिळाल्याने किंवा नापास झाल्याने विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याच्या बातम्या वरचेवर वाढतच चालल्यात.

टिनएजर्सच्या वाढत्या आत्महत्या हा जगभरातील मानसोपचार तज्ञांपुढचा संशोधनाचा विषय बनलाय. अडीच हजार वर्षांपुर्वी जगाला विपश्यना ध्यानधारणा देणाऱ्या सर्वोत्तम भुमिपुत्र तथागत सिध्दार्थ गोतम बुध्दांचे तत्वज्ञान आणि शून्यातून स्वराज्याचे विश्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रम ही जगात ओळख असलेल्या भारतात मानसिकदृष्ट्या एवढ्या कमकुवत पिढया का निर्माण व्हाव्यात.?

जगभरातील मानसशास्त्रज्ञ बुध्दांची विपश्यना आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा या दोन बाबी मनोबल खंबीर करण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे मान्य करतात आणि आमच्या जनुकात बुध्द व शिवराय असताना आमच्या मनात आत्महत्येचा नुसता विचार येणंसुध्दा कपाळकरंटेपणाच.! संकटांवर मात करण्याची खंबीर मानसिकता घडविणे एवढे अवघड आहे का.?

प्रत्येकाच्या आयुष्यात स्थित्यंतरे येणारच, काळाकभिन्न भुतकाळ सर्वांनाच असतो. पण त्यालाच कवटाळुन बसत कन्हत कुथत जीवन कंठणे हा कसला शहाणपणा.? माझ्या मनगटाच्या जोरावर आणि निसर्गाने मला दिलेल्या अमर्याद क्षमतेच्या बळावर पाय रोवून घट्टपणे उभा राहील आणि जग जिंकून दाखवेल हे मनोबल दृढ करणे हा खरा पुरुषार्थ, ही खरी मर्दुमकी.! कमजोर मानसिकता मजबूत करण्यासाठी सकारात्मक व्यक्तीच्या सहवासात राहणे, चांगली पुस्तके वाचणे, सक्सेस स्टोरीज वाचणे, सेल्फटॉक करणे, विपश्यना अनुसरणे हे उपाय योजले पाहिजेत.

जगातील मानसशास्त्रज्ञांच्या मते बुध्दीमत्तेचे चार प्रकार आहेत – बौद्धिक आकलन क्षमता म्हणजेच बुद्ध्यांक (इंटलिजन्स कोशंट आयक्यू) भावनिक बुद्ध्यांक (इमोशनल कोशंट ईक्यू) सामाजिक बुद्ध्यांक (सोशल कोशंट एसक्यू) आणि प्रतिकूल परिस्थिती बुद्ध्यांक (एडव्हर्सिटी कोशंट एक्यू)

१) बुद्धिमत्ता (आयक्यू) हे आपल्या आकलनाच्या क्षमतेचे एकक आहे. गणिते सोडवणे, गोष्टी लक्षात ठेवणे आणि विषयांची आठवण राहणे.
२) भावनिक बुद्ध्यांक (ईक्यू) इतरांशी आदरशील व चांगले संबंध प्रस्थापित करुन ते राखण्याच्या आपल्या क्षमतेचे हे एक मोजमाप. संयमी व जबाबदार असणे, प्रामणिक असणे, संवेदनशील, नम्र व विचारशील असणे, सत्यवचनी वृत्ती, इमानदारी, स्वाभीमान, बाणेदारपणा, इत्यादी स्वभावगुण या प्रकारात येतात.


३) सामाजिक उर्जा बुद्ध्यांक (एसक्यू) आपल्या मित्रांचे विस्तीर्ण जाळे तयार करण्याची आणि बर्‍याच काळासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी असणाऱ्या आपल्या क्षमतेचे मोजमाप.


ज्या माणसांचा चांगला ईक्यू आणि एसक्यू असतो ती माणसे जीवनात ते ज्या क्षेत्रात आहेत त्यात चांगला आयक्यू पण कमी ईक्यू आणि एसक्यू असणाऱ्या लोकांच्या पुढे जाण्याची क्षमता अधिक असते.

आपल्या शिक्षणपध्दतीनुसार बहुतेक शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांचे आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठीचे भांडवल करतात. परंतु ईक्यू आणि एसक्यू दाबण्याचा किंवा नकळतपणे कमी करण्याचा प्रयत्न करतात. उच्च आयक्यू असणारी मंडळी उच्च ईक्यू आणि एसक्यू असणाऱ्या लोकांकडे नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात, जेंव्हा की त्या नोकरी देणाऱ्या व्यक्तीचा आयक्यू त्याच्या तुलनेत कमीच असतो. तुमचा ईक्यू तुमची वागणूक, वर्तणूक, स्वभाव इत्यादी गुण प्रतित करतो.

तुमचा एसक्यू तुमच्यातील सामर्थ्य, वलय, तेज, प्रभाव इत्यादी गुण प्रतित करतो. आपण आपल्या पाल्यांना हे तीन बुद्ध्यांक सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ईक्यू आणि एसक्यू. ईक्यू आणि एसक्यू हे कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम असतात. कृपया आपल्या पाल्यांना केवळ चांगली बुद्धीमत्ता (आयक्यू) विकसित होईल अशीच शिकवण देऊ नका तर चांगली सामजिक (एसक्यू) आणि मानसिक (ईक्यू) क्षमता विकसित करणारे शिक्षण द्या.

मानवी क्षमतेत अजून एक चौथा प्रकार आहे. नवीनच क्यू, चौथा क्यू ज्याला प्रतिकुल परिस्थितीतील क्षमता (एक्यू) संबोधले जाते. एक्यू हे कठीण (उग्र) काळात स्थिर राहून बाहेर पडण्याची क्षमता देते. ज्या काळात आयुष्यात काहीच घडत नाही, त्याला थांबलेला काळ म्हणता येईल.

असा काळ जो ध्यानीमनी नसताना येतो, ज्याबद्दल आपण कधी कल्पना केलेली नसते, तो अचानकच येतो. त्या कठीण काळात स्थिर राहून मनावर ताबा ठेवून सुखरुपतेने बाहेर पडण्याची क्षमता म्हणजे एक्यू. ही क्षमता माणसातील कठीण परिस्थितीत न झुकण्याची, न तुटण्याची वृत्ती दाखवते.

सध्याच्या कोरोना मुळे उद्बभवलेल्या परिस्थितीतून माणसाच्या मनावर फार दूरगामी परिणाम पडत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील भलेभले यशस्वी लोकं देखील मानसिक तणावाखाली येत आहेत. त्यातून अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या, मनावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटना घडताना पहायला मिळतायेत.

यशस्वी लोकं डिप्रेशनमध्ये जात आहेत कारण त्यांनी यापुर्वी अशी परिस्थिती कधीच पाहिलेली नसते, अनुभवलेली नसते आणि विचारही केलेला नसतो. प्रतिकुल काळाशी दोन हात करण्याची खंबीर मानसिक तयारी नसल्यामुळे कमी एक्यू असणारी लोकं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात किंवा वेड्यासारखे अँबनॉर्मल, अस्थिर वर्तन करायला लागतात, अंधश्रध्देच्या अगर व्यसनांच्या आहारी जातात.

आपल्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रांसोबतच इतर क्षेत्रांची ओळख करुन द्या, त्यांना प्रोत्साहन द्या. मुलांना स्वावलंबी करतील अशी कामे, खेळ आणि कला यांच्यात रमायला लावणाऱ्या गोष्टी शिकवा. पाल्यांचे ईक्यू, एसक्यू आणि एक्यू विकसित करा. त्यांनी पालकांपेक्षा स्वतंत्रपणे गोष्टी करण्यास सक्षम, बहुभाषिक, बहुकौशल्यवान, वैचारिक, वैज्ञानिक विचारसरणीचा व्यक्ती बनावे यासाठी प्रयत्न करा. मुलांसाठी रस्ता तयार करू नका, मुलांना उपलब्ध असलेल्या रस्त्यांसाठीच तयार करा. यशासोबतच नकार पचवायला पण याच बालवयात शिकवा. सबका मंगल हो…

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, नांदेड

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, नांदेड
मानसशास्त्र अभ्यासक, समुपदेशक, करिअर काऊन्सिलर, प्रशिक्षक, स्तंभलेखक, वक्ता
[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *