ओबीसीच्या लेकरांना द्या रे सन्मानाने जगु.


अहमदपूर : ( प्रा भगवान आमलापुरे )

आमची हरकत राममंदिराच्या निर्माणास नाही. आता ते मंदिर पण उभारले जात आहे. परंतु आपल्या देशात ५२ / टक्के ओबीसी समाज असतांना त्यांना केवळ २७ / टक्के आरक्षण दिले आहे. यास आमची हरकत आहे. तेव्हा ओबीसींना त्यांच्या हक्काचे पुर्ण आरक्षण द्यावे,त्यांना सन्मानाने जगु द्यावे अशी आर्त हाक सरकारला आपल्या कवितेच्या माध्यमातून अँड रमेश गायकवाड यांनी दिली. ती अशी…


झाले रामाचे मंदिर
करा मंडल रे लागु.
ओबीसीच्या लेकरांना…
द्या रे सन्मानाने जगु.!


निमित्त होते येथील वाय डी वाघमारे गुरुजी लिखित ,” बहुजनांना ब्राम्हण्यवादाचा धोका……! ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रीतांच्या कविसंमेलनाचे.अध्यक्षस्थानी कवी बालाजी कोटलवार हे होते. यात ११ कवींनी सहभाग घेतला. यात विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, प्रा अनिल चवळे, कवी प्रा अकबर लाला, ग्रामीण कवी बालाजी मुंडे,तबरेज अली सर, नवोदित युवा कवी बलभीम गायकवाड, पत्रकार तथा कवी त्रिशरण मोहगावकर,बालाजी वाघमारे,शाहीर सुभाष साबळे, अँड रमेश गायकवाड, बालाजी कोटलवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांचा सहभाग होता. विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी बहारदार सुत्रसंचालन केले.
एका घरातून दुसऱ्या घरात जातांना खांद्यावरचा गमजा बदलला जातो. गमजाचा रंग बदलला जातो.हे एवढे ठीक आहे. पण गमज्याएवढ्याच सहजतेने राजकारणी आपल्या निष्ठा बदलतात. त्यास निष्ठा म्हणावी काय ? असा प्रश्न आपल्या कवितेतून उपस्थित करतांना कवी बालाजी मुंडे म्हणाले की,


नाचत फिरते जिकडे तिकडे
खुषाल नंगी दुनिया.
अन् तीच उधळते
नको तयावर गुलाल नंगी दुनिया.


आपल्या पहाडी आवाजात कविसंमेलनाचे सुत्रसंचालक विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी आपल्या भावना पुढील रचनेत व्यक्त केल्या. त्या अशा..


रोजंच जळणारे घरदार पाहिले मी
फितूर पळणारे सरदार पाहिले मी.
मुजोर पेशवाई, लोकशाहीत ठोकशाही,
मदिरेत नाचणारे, दरबार पाहिले मी.


प्रतिथयश कवी प्रा डॉ अकबर लाला यांनी आपल्या मुक्त छंदातील रचनेतून अहमदपूर तालुक्यात घडलेल्या एका वास्तविक घटनेवर आधारित कविता सादर केली. त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच लेकरांना संस्काराची नितांत आवश्यकता आहे. हा संदेश दिला.


पर्यावरणवादी तथा व्रक्षप्रेमी कवी प्रा अनिल चवळे सरांनी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आणि वाढते जागतिक तापमान कमी करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. या कामी झाडे खूप खूप महत्त्वाचे आहेत. हे आपल्या कवितेतून सांगितले. ते असे…


सावलीसाठी झाड नाही
पाण्यासाठी आड नाही.
नाही अंबरी पाखरांचा थवा
करपतो अंकुर उगवण्यापुर्वीच नवा.


प्रा भगवान आमलापुरे यांनी आपल्या ,” फिडेल राजा ” या कवितेच्या माध्यमातून भारतीय मिडिया मध्यंतरी कसा सजग आणि तत्पर झाला होता ? हे उपस्थित श्रोत्यांच्या लक्षात आणून देतांनाच जर अधिकारी आणि पदाधिकारी बेतालपणे आणि बेजबाबदारपणे वागत असतील तर संविधान त्यास कसे वठणीवर आणते. हे पण सांगितले. ते असे…


तुम्ही लोकशाही बघलात
तुम्ही लोकशाही जगलात.
ज्या लोकशाहीनं दिले
त्या लोकशाहीनं नेले.
किंबहुना………
संविधानानं दिलं
संविधानानं नेलं.


कविसंमेलनाचे अध्यक्ष बालाजीराव कोटलवार यांनी विद्यमान आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. विशेषतः एसटी संपावर अभ्यासपुर्ण विवेचन आपल्या रचनेतून सादर केले. आपल्या रचनेतून तीन तिघाडी आणि काम बिघाडी या राजकीय म्हणीचा प्रत्यय आणून दिला. अध्यक्षांनी आपल्या राजकीय विडंबनात्मक रचनेतून कविसंमेलनात प्रथमतः च हास्याचे फवारे उडवले. ती रचना असी होती…..


मातोश्रीच्या सुता
तुला पवाराचं वरदान.
एकमेकांनी बोला..
उद्धवजीचं गुणगान.


आपल्या अनुभवी विवेचनात जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड यांनी एकदा आम्ही सर्व वंचितांनी एकत्र येऊन कसं समांतर साहित्य संमेलन भरवले. हा विषय आपल्या रचनेतून सांगितला. शिवाय शिक्षण आणि करिअरच्या माध्यमातून एकत्र आलेली आपुलकीची माणसे दुर जातांना…… या विषयावरची रचना भाव खाऊन गेली. ” मोसमाची पाखरं ” ही रचना असी होती.


मोसमात आली ही पाखरं,चरायला इथे
मोसम तो संपेल.
भुर्रकन उडून जातील …
दुर कुठे.
कुणाचे किती रस्ते,
कुणाच्या किती वाटा ?
कुणी राहील याच घरट्यात,
कुणी शोधतील पुढच्या वाटा.

कवी तबरेज अली यांनी उर्दू गझल गायन केले. नवोदित आणि नवतरुण कवी बलभीम गायकवाड यांनी आता आपणच डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले पाहिजे .असी अपेक्षा व्यक्त केली. तर अहमदपूर शाहीर सुभाष साबळे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत सुरेल आवाजात आपली भूमिका मांडली. ती अशी..
जातीचे बंध तुटले, भिमा तुझ्यामुळे
महारांची बौद्ध झाली, भिमा तुझ्यामुळे.

प्रा भगवान आमलापुरे.
फुलवळ , ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी.ता परळी वै

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *