जाज्वल्य राष्ट्रभक्ती पेरणारे पुस्तक : क्रांतिरत्ने

 (पुस्तक परिक्षण)

    मराठी साहित्यात अनेक नवलेखक आपल्या लेखनाने भर घालत असतात.तर काही लेखक हे होवुन गेलेल्या महान व्यक्तिंच्या चरित्राचा लेखनातून वेध घेवुन नवसमाजाचे  चारित्र्य घडविण्याचा प्रयत्न करतात.असाच प्रामाणिक प्रयत्न लेखक प्रा.विठ्ठल बरसमवाड यांनी त्यांच्या नुकताच प्रकाशित झालेल्या 'क्रांतिरत्ने' या पुस्तकाद्वारे केला आहे. या पुस्तकाला  सध्या चालू असलेल्या अभ्यासक्रमात  इयत्ता, आठवीच्या मराठीच्या पुस्तकात 'गोधडी' हा पाठ ज्यांनी लिहीला त्या नामांकित साहित्यिक

डॉ.कैलास दौंड यांची समर्पक प्रस्तावना लाभलेली आहे. ‘क्रांतिरत्ने’ हे प्रा.विठ्ठल गणपत बरसमवाड यांचे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांच्या जाज्वल राष्ट्रभक्तीची,शौर्याची, बलिदानाची यशोगाथा आहे.
इसवी सन १८१८ ला मराठी सत्तेचा अस्त होऊन इंग्रजांचा एकछत्री अंमल भारतात सुरू झाला. त्या जुलमी इंग्रजी सत्तेचा शेवट करण्यासाठी भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी दाखवलेले शौर्य व स्वीकारलेले हौतात्म्य ‘क्रांतिरत्ने’ पुस्तकातून वाचल्यास पुढील पिढीला निश्चितच स्फूर्ती येऊन जाईल.भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचा इतिहास प्रभावीपणे रोमहर्षक व ओघवत्या शैलीत मांडण्याचे कसब लेखकाने साध्य केले आहे.’
क्रांतिरत्ने’ या छोटेखानी पुस्तकात एकूण नऊ भारतीय शूरवीरांचा व एका विदेशी वीरागंणेचा जीवनपट उलगडताना त्यांच्या बालपणापासून आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटना,प्रसंग चित्रित करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला प्रभाव या पुस्तकांतून अत्यंत प्रामाणिकपणे मांडला आहे. क्रांतिकारकांच्या जीवनातील निवडक प्रसंग घेऊन व्यक्तिरेखा बळकट करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.या लेखनात कुठेही अतिशयोक्ती व पाल्हाळ लावलेले दिसत नाही.कुठेही पुनरुक्ती आढळत नाही.
डाॅ.ॲनी बेझंट यांनी शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मसमभाव परिषदेत भाग घेतला. त्यांनी हिंदू धर्माचा हिंदू संस्कृतीचा संपूर्ण अभ्यास केला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये हिंदवी स्वराज्यावर भाषण केले आणि १९१७ मध्ये भरलेल्या कोलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.म्हणून त्यांचे कार्य अजरामर झाले आहे.
चितरंजन दासांनी स्वदेशी मंडळाची स्थापना केली.अरविंद घोष यांच्यावर अल्लीपूर येथे बॉम्ब खटला चालू होता. त्या खटल्यातून त्यांना निर्दोष मुक्तता करण्याचे महान कार्य चितरंजन दास यांनी केले.१९१४ मध्ये ‘नारायण ‘हे साप्ताहिक बंगाली भाषेत सुरू केले. त्यामुळे तमाम भारतीयांच्या गळ्यातील ते ताईत बनले.बिरसा मुंडाने इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. आदिवासी मुंडा जमातीचे लोक कर्मकांडात रुढी व परंपरेत अडकले होते त्यामुळे त्यांचा विकास खुंटला होता म्हणून बिरसा मुंडानी आदिवासी मुंडा जमातीला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे मुंडा जमातीच्या लोकांचे मत परिवर्तन झाले.आज आपल्या संसदेत जननायक बिरसा मुंडा नावाचे तैलचित्र लावलेले आहे. ते भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील.खान अब्दुल गफार खान यांनी सर्वच दृष्टीने सक्षम व कणखर नेतृत्व केले, नवीन दृष्टी नव्या युगाचे नवे भान त्यांना लाभले.त्यांच्या विचारांमुळे देशप्रेमाचे, स्वातंत्र्याचे मुक्त विचारांचे, मोल सर्वांना कळू लागले. त्यांच्या मनात सामाजिक सुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडू लागले. म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देण्यात आला. क्रांतिकारक मास्टर सूर्यसेन यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उघडलेली मोहीम लेखकाने यथार्थ शब्दांत चित्रित केली आहे.चितगाव शस्त्रगारावरील इंग्रजांचे निशाण काढून टाकले व आपले निशाण त्या ठिकाणी लावले. ही बाब म्हणावी तेवढी सोपी नाही.त्यासाठी वाघाचे काळीज लागते त्यांच्याकडून नवीन पिढीने या गोष्टी शिकाव्यात. स्वाभिमानी जीवन जगावे. मास्टर सूर्यसेनच्या बारा साथीदारांना इंग्रजांनी फाशी दिली तरीही ते तसूभर डगमगले नाहीत म्हणून तर ते आजही युवकांसाठी दीपस्तंभ आहेत. जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाला जनरल ओडवायर आणि जनरल डायर हेच कारणीभूत आहेत. ही खूणगाठ मनाशी बांधली. सरदार उधमसिंगनी स्वतःचे नाव ‘राम मोहम्मद सिंग ‘ठेवले. हे नाव तीन धर्माचे प्रतीक होते. २१ वर्षानंतर इंग्लंडमध्ये जाऊन जनरल ओडवायरवर सरदार उधमसिंगनी गोळ्या झाडल्या. ते जागीच गतप्राण झाले.त्यामुळे सरदार उधमसिंग
आजही सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. हुतात्मा बाबू गेनूचे बलिदानामुळे भारतीय जनतेला स्फूर्ती मिळाली. इंग्रज सरकारला लोकांनी धारेवर धरले. इंग्रजांना हे कळून चुकले की आता भारतात राहणे शक्य नाही.म्हणून हुतात्मा बाबू गेनूचे बलिदान आपण कधीही विसरु शकणार नाही. शांती घोष व सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी बी.जी. स्टीवन्स यांच्यावर गोळ्या झाडल्या. तो तिथेच गतप्राण झाला.एखाद्या वाघिणी सारख्या सहासी,धैर्यवान व शूर या शाळकरी मुलींनी धाडस दाखवून भारतीय मुलींना आदर्श घालून दिला.
शिरीषकुमार,बाबू गेनू ,जननायक बिरसा मुंडा, मास्टर सूर्यसेन, सरदार उधमसिंग या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचा जीवनपट लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचकांना प्रेरणा देऊन जातो.पुरुषाबरोबर क्रांतिकारी चळवळीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून काम करणाऱ्या सुनीती चौधरी व शांती घोष यांचे उत्कृष्ट चित्रण ‘क्रांतीरत्ने ‘तून केलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे’ क्रांतिरत्ने’ पुस्तक लिहून लेखकांनी योगायोग साधला व हरवू पाहणारे देशप्रेम जागृत केले. नमनालाच घडाभर तेल न लावता थेट विषयाला सुरुवात करून अल्पक्षरत्वातून संपूर्ण इतिहास उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे लेखकाच्या व्यासंगाचा, चिंतनाचा, प्रतिभाशक्तीचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना ठायी ठायी जाणवतो.
हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या लढवय्या बाण्याच्या थोर भारतमातेच्या सुपुत्राची प्रेरणादायी यशोगाथा आहे. “आपल्या कर्तृत्ववाने आणि पराक्रमाने ज्या लोकांनी इतिहास घडविला त्या असामान्य व्यक्तीचे स्मरण व्हावे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नवीन पीढीला व्हावी, त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व त्यांच्या सारखे असामान्य कार्य नवीन पिढीच्या हातून घडले जावे, पारतंत्र्याच्या जुलमी गुलामगिरीतून आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा आदर्श आपण घ्यावा व त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची मधुर फळे चाखताना त्यांच्या पराक्रमाचे गोडवे या पुढील पीढीने गावेत “लेखकाची ही मनोकामना पुस्तक पूर्ण करीलच. सध्याच्या स्वार्थपर आणि विवेकशून्य स्पर्धेच्या गर्दीत हे पुस्तक मातृभूमी आणि स्वातंत्र्याचे भान आणून देण्याचा प्रयत्न पूर्वक संस्कार करते. या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
सर्व स्तरात आणि सर्व वयोगटांकडून या पुस्तकाचे स्वागत होईल असा विश्वास वाटतो. आपल्या कडे समाज माध्यमांचा वाचन संस्कृतीवर विपरित परिणाम झाल्याचे चित्र असताना अशा प्रकारच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा जीवन परिचय घडवणाऱ्या पुस्तकांना मात्र भरपूर वाचकवर्ग आहे. थोरांचे जीवन कार्य वाचून थोर होण्याची प्रेरणा मिळते .विद्यार्थ्यांना भाषणे करण्यासाठी या ‘क्रांतिरत्ने’ पुस्तकातील लेख उपयुक्त आहेत .ज्ञान आणि माहितीचा वेधक मिलाफ हे वैशिष्ट्ये असणारी हे पुस्तक आबालवृद्धांना नक्की आवडेल.उगवत्या पिढीला काही चांगले वाचायला मिळावे म्हणून स्वतः लेखणी घेऊन पुढे सरसावणा-या धडपडणाऱ्या प्रा. विठ्ठल बरसमवाड यांना या पुस्तकासाठी व पुढील लेखनासाठी शुभेच्छा देतो.वाचक या पुस्तकाचे भरभरून स्वागत करतील.पुस्तक खरेदी करून राष्ट्रप्रेम जीवंत असल्याचे दर्शवतील या अपेक्षेसह माझा शब्दप्रपंच थांबवतो.

                क्रांतिरत्ने

लेखक -प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
खैरकावाडी,ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी -९९२१२०८५६३
गणराज प्रकाशन,अहमदनगर
मूल्य-८० रुपये पृष्ठे -५२

      परीक्षक 
-प्रा.डॉ.रामकृष्ण बदने                               
   ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
        ता.मुखेड जि.नांदेड
     भ्रमध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *