आजचा विद्यार्थी व शारीरिक शिक्षण” 25 जानेवारी : शारीरिक शिक्षण दिन

शालेय विद्यार्थ्याच्या वयाचा विचार करता दररोज वाढणाऱ्या शरीराचा आणि त्याच्या क्षमतांचा परिपूर्ण विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षणाची सध्या नितांत गरज आहे. त्यासाठी सुदृढ शरीर आणि निरोगी मन,मस्तक ,मनगट आणि आरोग्य या चारी अंगाचा समतोल साधने अत्यंत आवश्यक झाले आहे .


“शारीरिक शिक्षण हा पूर्णतः कृतीवर आधारित असलेला विषय आहे.” त्यामुळे विद्यार्थ्यात सहासीवृत्ती, सहनशीलता,सहिष्णुता, संघवृत्ती, चंचलता,कौशल्य,आत्मविश्वास,आत्मनिर्भयता या गुणांचा विकास होताना आपणास दिसतो, पण आज आपण फार मोठ्या थाटामाटाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी अनेक शूरवीरांनी,क्रांतिकारकांनी स्वतःचे बलिदान दिलेले आहे.
हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती टिकवण्याची जबाबदारी घेण्यासाठी आजची पिढी सुदृढ असावी लागते. “सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते “यासाठी शरीर बळकट असावे लागते.

शरीर व मन बळकट करण्यासाठी लहानपणा पासूनच प्रयत्न केले पाहिजेत,मानसिक व शारीरिक आपले आरोग्य चांगले राहावेत, आपण निरोगी राहावेत,आरोग्य ही धनसंपदा आहे याची आठवण म्हणून 25 जानेवारी हा ‘शारीरिक शिक्षण दिन’ सर्वत्र पाळला जातो .
त्यासाठीच हा लेखन प्रपंच …..


आज सर्वत्र परिस्थिती अशी दिसत आहे की अनेक पालक मुलांच्या बौद्धिक शिक्षणाबद्दल जागृत असतात,परंतु शारीरिक शिक्षणाविषयी म्हणावी तेवढी जागृती दिसत नाही. सध्या तर शारीरिक शिक्षणाची फारच आवश्यकता आहे. मुलांना चार भिंतीच्या आत शिक्षण देऊन जमत नाही तर त्यांना मोकळ्या मैदानात मुक्तपणे विहार करण्याची बागडण्याची तेवढीच गरज आहे.

मुलांना आज मैदानात विंटीदांडू ,खो, खो कबड्डी,
उंच उडी लांब उडी, मल्लखांब हाॅकी ,क्रिकेट ,धावणे, लगोरी यासारखे खेळ शिकवावे, असे नाना प्रकारचे खेळ खेळले तरच शरीर सुदृढ होते, तर मुलींना फुगड्या, फेर धरणे, झिम्मा खेळणे,धावणे अशी वेगवेगळी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे,त्यावेळी शरीर आपोआप सुदृढ बनते.एखादा मुलगा किंवा मुलगी मैदानावर खेळ खेळते वेळी घसरून पडले तरीही ते डगमगत नाहीत, सरळ उठून पुन्हा खेळ खेळावेत.त्यामुळे बौद्धिक विकासा बरोबर शारीरिक विकास होत असे,या “शारीरिक शिक्षण दिनाच्या निमित्ताने” शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन अनेक उपक्रम राबविले पाहिजेत,काही स्पर्धा वैयक्तिक तर काही स्पर्धा सांघीक घ्याव्यात ,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराचा विकास होतो. सध्या दोन वर्षांपासून मुलांना कोणतीही खेळ खेळता येत नाहीत .त्यामुळे मुले निरागस, व आळशी झाली आहेत.

मित्रमंडळी सोबत बाहेर जाता येत नाही, त्यासाठी अनेक मुलांची कुचंबणा होत आहे .किती तरी मुले आज घरात कोंडून असल्या सारखेच आहेत. बाहेरचे वातावरण सध्या चांगले नाही म्हणून आई -वडील मुलांना घरातच मोबाईल देऊन बसवितात. त्यामुळे मुलांच्या शरीरावर परिणाम होत आहेत मुले लठ्ठ होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे,
असे मला वाटत आहे.’


“मुले ही देवाघरची फुले असतात” त्यांना मुक्तपणे हिंडून फिरून खेळून बागडून येऊ द्यावे लागते.आज मुले घरात बसून कॅरम खेळणे,टीव्ही समोर बसणे ,त्यामुळे कंटाळून गेली आहेत ही मुले त्यामुळेच दिवसेंदिवस कमकुवत व कमजोर होत आहेत.


असे सर्वत्र आढळत आहे आई-वडिलांना मोठ्या बंधूंना कामानिमित्त घराबाहेर जावेच लागते तेव्हा घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नसते, पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती होती,आजही मोठ्या प्रमाणात विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे,त्यामुळे त्याचे अप्रत्यक्ष परिणाम जाणवत आहेत छोटी मुले आजी-आजोबा जवळ असायची, त्यामुळे जेवण वेळेवर मिळत होते, संस्काराच्या चार गोष्टी कानावर पडत होत्या, परंतु काळ बदलला, “हम दो हमारे दो”अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, शारीरिक शिक्षण दिनाच्या निमित्ताने मुलांना व्यायामाची व मैदानी खेळाची अतिशय गरज आहे, आजची मुले कोणता आहार घेत आहेत, त्याच्यावर साधकबाधक चर्चा होणे गरजेचे आहे, पिझ्झा-बर्गर, मेदूवडा, वेफर्स चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न नियम होत आहे,नेहमी व्यायाम केला जात नाही, त्यामुळे मुले धावताना धापा उसासे टाकतात, त्यामुळे लवकरच दमतात आणि धावण्याच्या शर्यतीत मागे पडतात,ऑलम्पिक स्पर्धेमध्ये आपणाला म्हणावे तसे पदके मिळत नाहीत,

आपली लोकसंख्या व पदकाचा हिशोब केला तर आपण फारच मागे आहोत हे सत्य नाकारता येत नाही, म्हणून धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी शरीर सुदृढ असणे अत्यंत गरजेचे आहे , “उत्तम आरोग्य हीच प्रत्येक व्यक्तीसाठी अनमोल संपत्ती आहे, “उत्तम आरोग्य असणारी व्यक्ती सदैव चैतन्यशील
,आत्मनिर्भर असतो.

दीर्घकालीन सुदृढता आणि निरामयता म्हणजे तंदुरुस्ती होय.शारीरिक सुदृढता हे व्यक्तीच्या आरोग्याचे महत्त्वाचे निर्देशक आहे. सुदृढ शरीरासाठी योग्य आहार आवश्यक असतो .चवीपेक्षा पोषण महत्त्वाचे आहे. तेव्हा जीभेसाठी नव्हे शरीरासाठी सर्व प्रकारचे पदार्थ खावे, त्यासाठी खेळाची मैदाने अद्यावत असावीत, काही विद्यालयांना व महाविद्यालयांना खेळाचे मैदान शिल्लक राहिली नाहीत ही खेदाची बाब आहे, विद्यालय तेथे प्रशस्त मैदान हवेत, मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम अतिशय गरजेचा आहे, पावसाळी खेळाच्या स्पर्धा,हिवाळी खेळाच्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याचे काम शारीरिक शिक्षण करते,

सध्या बरेच मुले खेळ खेळत नाहीत, फिरण्यास जात नाहीत त्यामुळे शरीर बेडब झाले आहे. एकुलता एक मुलगा आहे म्हणून ही आई-वडील त्याला रागावत नाहीत. हे योग्य नाही, पण ज्याचे त्याचे शरीर स्वतःला सांभाळावे लागते.शारीरिक शिक्षणासाठी अपुरी साधनसामग्री तसेच बऱ्याच ठिकाणी अपुऱ्या मैदानाअभावी विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता येत नाही या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देणे सध्या गरजेचे आहे. जसे पोहण्यासाठी पाणी आवश्यक आहे, तसे खेळण्यास मैदान गरजेचे आहेत. म्हणून तर हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया आहे.

त्यासाठी सर्व विद्यालयात शारीरिक शिक्षण हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक हवाच, तेव्हा आपली भावी पिढी सुदृढ होईल,आणि आपण ऑलिंपिक स्पर्धा मध्ये सुध्दा जास्त पदके मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करू, शारीरिक शिक्षण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

प्रा बरसमवाड विठ्ठल


साहित्यिक
प्रा बरसमवाड विठ्ठल गणपत खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड भ्रमणध्वनी, 99 21 20 85 63

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *