आदर्श समाज जीवनाचा ध्यास मनी बाळगून जीवन जगलेले : कै. धनाजी पवार गुरुजी

( आज दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी कै.धनाजी खेमाजी पवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन.त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश.)

मानवी जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन मानले जाते. त्याच माणसाला समाजात गौरवाचे स्थान प्राप्त होते ज्यांनी स्वकष्टातून विश्व निर्माण केले आहे.आयत्या बिळावर नागोबांना  समाजात तात्पुरता मान मिळत ही असला तरी त्याचे मोठेपण जास्त काळ टिकत नाही. ज्यांनी कष्टाने विश्व निर्माण केले ते भलेही भौतिक दृष्टीने काही प्रमाणात मागे असले तरी ही ते  नैतिक दृष्टीने पुढारलेले असतात.या  पद्धतीने कमावलेल्या संपत्तीमुळे त्यांची चिरंतन कीर्ति राहते. मानवाला जीवनात अनेक भूमिकांतून जीवन जगावे लागते पण शिक्षकाच्या भूमिकेतून जगलेले जीवन हे मानवी जीवनाला कृतार्थ करणारे आहे. समाज घडवण्याची प्रक्रिया ही अनेक माध्यमातून होत असते पण सर्वांगाने आदर्श समाज घडविण्याचे काम एक आदर्श शिक्षकच करू शकतो.तसाच आदर्श समाज घडविण्याचा सतत ध्यास घेऊन कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. धनाजी पवार गुरूजी होत.
 त्यांचा जन्म ०९ जून १९३८ रोजी माता रतनबाई व पिता  खेमाजी यांच्या पोटी झाला.घरात गरीबी पाचवीलाच पुजलेली  पण वडिलांची जिद्द की आपला मुलगा शिकला पाहिजे.यासाठी त्यांनी त्यांना खाजगी शाळेत घातले पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही पुढे नळगीर ता. उदगीर येथे त्याकाळचे गुरुजी मुरलीधर जोशी यांना आग्रह करून मुलाला  शाळेत प्रवेश देण्याची विनंती केली पण  वय जास्त असल्यामुळे गुरुजी प्रवेश देण्यास टाळाटाळ करत होते.तेंव्हा त्यांच्या पाया पडून मुलाला प्रवेश मिळवून दिला. हा दिवस खऱ्या अर्थाने पवार परिवाराच्या व मुखेडच्या  शैक्षणिक उंचीसाठी महत्त्वाचा ठरला. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे पडेल ती कामे करून स्वखर्चाने शिक्षण पूर्ण केले. घरी त्या काळी दोन लहान भाऊ, चार बहिणी असा परिवार होता या सर्वांची जबाबदारी  एकट्या वडिलांवर होती. याची जाण ठेवून ते शिकत राहिले. माध्यमिक शिक्षण लातूर येथे घेतले.परिस्थितीने त्यांना कमी वयातच प्रगल्भता आली.पुढे त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली व नंतर सेवांतर्गत पुढील शिक्षण प्राप्त केले. खरे तर त्यांना त्या काळात जर उत्तम सोय उपलब्ध असती तर ते खूप मोठ्या पदावर पोहचले असते. पण त्याची खंत त्यांनी कधीच मनी बाळगली नाही. उलट शिक्षण क्षेत्राचे पवित्र कार्य करायला मिळते याचे त्यांना समाधान वाटत राहीले. आपल्या या क्षेत्रात ते अत्यंत झोकून देऊन काम करत असत. त्यांनी शाळेत प्रामाणिक अध्यापन करून अनेक विद्यार्थी घडविले ते आज मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात मांडवी, किनवट सारख्या दुर्गम भागात राहून अध्यापनाचे काम केले. किनवट येथे  केवळ वीस रुपये पगारावर नोकरी केली.एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते सर्वत्र परिचित होते.शालेय वेळेत तर ते शिकवायचेच पण त्या व्यतिरिक्त देखिल अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे.त्यांच्या घरी राहून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा जिल्हा परिषद नांदेड कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. हे कार्य करताना त्यांना तितक्याच समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी ताई यांचे सहकार्य लाभले.त्या ही शिक्षिका म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आल्या.या दाम्पत्याने आपल्या अध्यापनाने अनेक पीढ्या  घडविल्या. पत्नी मंदाकिनी ताईच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक  राज्य पुरस्कार मिळाला.फुले  दाम्पत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे दांपत्य शैक्षणिक व सामाजिक कार्य करत राहिले. पवार गुरुजींनी  अध्यापनाची सेवा करत करत  एम.ए.बी.एड.च्या पदव्या प्राप्त केल्या. या वरुन शिक्षण प्राप्त करण्याची त्यांची जिद्य लक्षात येते. त्यांना उर्दू व मोडी लिपी येत असे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले. त्यासाठी त्यांनी अशा विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले. शेकडो विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातही चमकलेआहेत. विद्यार्थ्यांना घडविताना केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच केले नाही तर गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे ज्यात कपडे घेऊन देणे, परीक्षा फी भरणे इत्यादी स्वरूपाची मदत केली.त्यांचे घर म्हणजे गोकुळ वाटायचे.इतके विद्यार्थी व नातेवाईक त्यांच्याकडे शिक्षणासाठी असायचे. संयुक्त परिवाराचा हा एक आदर्श नमुना म्हणजे त्यांचे घर होते. माणसांचा कंटाळा या दांपत्याने कधी केला नाही. आपणास शिक्षण घेताना अनंत अडचणी सहन कराव्या लागल्या तशा अडचणी या विद्यार्थ्यांनाही आहेत या गोष्टीची जाणीव ठेवून ते ही मदत करत असत. म्हणतात ना 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे l इतरांची मुले तर घडवलीच पण  स्वतःच्या मुलांकडे ही  दुर्लक्ष होऊ दिले नाही. आपली मुले सुसंस्कारित व विद्वान बनवली. त्यांचा मोठा मुलगा डॉ. सतीश पवार व स्नुषा डॉ. अर्चना पवार या राज्याच्या वैद्यकीय विभागाच्या सर्वोच्च पदावरती  कार्य करताना पहावयास मिळतात तर त्यांची सुकन्या प्राचार्या स्नेहलता चव्हाण व जावयी डॉ. जयपाल चव्हान यांनी ही उत्तम सेवा देत आलेत तर कनिष्ठ चिरंजीव डॉ.नितीन पवार व स्नुषा डॉ. सौ.मना हे दांपत्य वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत.एक सुखी व  उच्चविद्याविभूषित परिवार म्हणून त्यांच्या परिवाराकडे पाहता येईल.मुखेडला शासकिय वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मोहनावतीचे नाव ज्या मोजक्या लोकांनी सर्वदुर पोहचवले आहे त्यात या परिवाराचा क्रमांक वरचा आहे.हे कुणालाही निर्विवादपणे मान्य करावे लागेल. धनाजी गुरुजींनी केवळ शैक्षणिक क्षेत्रा पुरतेच कार्य केले नाही तर सामाजिक क्षेत्रातही ते नेहमी वावरताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण, समाज प्रबोधनाचे कार्य,भ्रष्टाचार निर्मूलन,शेतकऱ्यांना मार्गदर्शन, जातिनिर्मूलन,समता, राष्ट्रप्रेम, बंधुप्रेम इत्यादीबाबत ते आयुष्यभर कार्य करत राहिले.सावरगाव (पी.)येथे अनेक दलित व मुस्लिम बांधवांना कपडे वा अन्य प्रकारची मदत केली.दापका राजा येथे ही अशीच सामाजिक सेवा करत आले. गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते.ते अत्यंत टापटीप राहत असत. त्यांना पाहिल्यावर टापटीपपणा काय असतो ते लक्षात येत असे. अत्यंत मोजके व महत्त्वाचे बोलत असत. माणसांशी बोलण्याचा त्यांना छंद होता. ते माझ्याशी अनेक वेळेस शिक्षण व  साहित्यावर चर्चा करत असत. ते संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांचा ' मानवता ' नावाचा काव्यसंग्रह महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या सौजन्याने प्रकाशित झाला होता.ज्यात त्यांनी अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा, अनिष्ट चालीरीती, यावर संत तुकाराम यांच्या परंपरेत बसणा-या शब्दांचे आसूड ओढले होते. वर्तमानातील परिस्थिती बदलावी व आदर्श समाज निर्मिती व्हावी हा या   लेखनामागचा  उद्येश होता.त्यानंतर त्यांचा 'आपणासी शोधावे आपल्यात' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.ज्यात त्यांनी निसर्ग, माणूस,जन्म-मृत्यू,प्रेम, मन,दुष्काळ,राष्ट्रप्रेम हे विषय हाताळले होते.आदर्श समाज निर्मितीचे स्वप्न पाहताना मानवी मनाला उद्देशून ते लिहितात 

सत्य तू सोडू नको l
खोटे तुं खोडू नको l
पाप तू जोडू नको l
सांभाळी मना ll


माणसाने सत्याची कास धरली तरच प्रगती होईल असे ते सांगत. भ्रष्टाचाराने सारा समाज पोखरला जातोय याचे त्यांना खूप दुःख होत असे.साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या पद्धतीने महत्त्वपूर्ण कार्य केले.
अध्यात्मिक क्षेत्रा बद्दल बोलायचे झाले तर ते ह.भ.प.नामदेव महाराज उंब्रजकर, व ह.भ. प.नामदेव महाराज दापकेकर यांच्या नेहमी सहवासात राहत आले आहेत.येथिल तीर्थक्षेत्री त्यांनी वेळोवेळी अन्नदान केले. एवढेच नव्हे तर वारी ही ते करत असत.

दोन्ही नामदेव महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या परिवाराला सतत लाभत आला आहे. चांगल्या कामासाठी ते सतत पुढे येत असत. ते जेव्हा केव्हा भाषण करायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यातून विवेकनिष्ठा जाणवायची. विषमते बध्दल व अन्याया बद्दल त्यांना नेहमीच चीड होती.ते नेहमी म्हणत असत की सुकर्माने वळत जपून वाटचाल केल्यास रडत बसण्याची पाळी येणार नाही.परिवर्तन रुपी प्रयत्नाने नवनिर्माण करता येते.आप्पलपोटे न बनता सहकार्याची भावना बाळगण्यास कोण्ही मागे राहणार नाही.

राष्ट्रप्रेम, एकात्मता निर्माण करण्यासाठी आपण एक आहोत.तूझे कोणी नाही, ही भावना वाढीस लागली पाहिजे.शेतकरी स्वतः कष्ट करून पिकविलेले धान्य खाण्यामध्ये धन्यता मानतो तद्वतच कष्टाविना खाऊ नये. ही भावना रुजली पाहिजे.अंधारातून उजेडात येणा-यांचे स्वागत करून उजेडातून अंधारात पळणाऱ्यांना किंवा नेणा-यांना रोखले पाहिजे. असे कितीतरी विचार त्यांच्याकडून ऐकायला मिळायचे. ते त्याप्रमाणे वागायचे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीत स्वतः लक्ष देऊन तिची ही सेवा केली.दापका राजा येथे तांड्याची स्थापना केली.

एवढेच नव्हे तर मुखेडला ही त्यांनी पवारनगर निर्माण केले. ते जिथे जात तिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्याच्यात ठेवत. त्यांचे आणि मुखेड मधील राठोड व चव्हाण या नामांकित दोन घराण्यांचे आप्तेष्ठपणाचे संबंध होते.मुळात या दोन्ही घरांण्यांना पूर्वीपासूनच प्रतिष्ठा आहे. आज तर ही घरांणी राजकारणातही अग्रेसर आहेत.असे असले तरी ही गुरुजींनी याबद्दलचा मोठेपणा कधी दाखवला नाही.

ज्यांच्या पोटी इतकी मोठी नररत्ने जन्माला आली ज्या बध्दल तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय ll’एवढे आपापल्या क्षेत्रात विद्वत्तेचे व कार्यकर्तृत्वाच्या पराक्रम निर्माण केले त्यांचा अभिमान नक्कीच वडील म्हणून त्यांना असेल ही आणि असला ही पाहिजे पण अहंकार मात्र मुळीच नव्हता. आमच्या सारख्या शिक्षणावर प्रेम करणा-या माणसाची त्यांना खूप आपुलकी वाटायची.आवडीचा माणूस दिसला की घरी बोलावणे त्याचा यथोचित सन्मान करणे हे या दाम्पत्याचे ठरलेलेच असायचे. हा आदर सत्कार पाहून वाटायचे की आजही समाजात चांगली माणसे आहेत. त्यांना भेटल्यावर आम्ही साहित्यिक व शैक्षणिक चर्चेमुळे कार्यरत व्हायचो.

मागील वर्षी त्यांच्या जाण्याने ही चर्चा थांबली. पण आम्हाला वाटते की ते शरीराने जरी गेले असले तरी ते विचाराने आजही आपल्यात आहेत. त्यांचा विचार समाजासमोर यावा म्हणून ‘धनाजी पवार अकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मुखेड कडून ऑनलाईन खूली वकृत्व स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार यानिमित्ताने घेऊन त्यांची खऱ्या अर्थाने कृतीशील विचार प्रणाली समोर यावी म्हणुन या ॲकॅडमीचे अध्यक्ष ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सर व अन्य सहकाऱ्यांकडून हे उपक्रम घेतले जात आहेत याचे खरोखरच समाधान वाटते.

धनाजी गुरुजींच्या आचार व विचारानुरूप आचरण करण्याचा संकल्प करुन. त्यांना विनम्र अभिवादन करतो व मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.

           



 प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
   ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
           ता.मुखेड जि.नांदेड.
       भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *