मुखेड – मरण हे कुणालाच चुकलेले नाही. अवतारी पुरुष देखील हे जग सोडून गेले आहेत. सत्ता,संपत्ती ही ठायीचे ठायी ठेवून ईश्वराचे बोलावणे आल्यावर आपल्याला हे जग सोडून जावे लागते.पण जिवंतपणी असे काम करावे की मेल्यानंतरही लोकांनी आपले नाव घ्यावे.शिक्षण क्षेत्रात असेच नाव कै. धनाजी पवार गुरुजींनी केले.आपले विद्यार्थी तर घडवलेच पण पाल्य ही घडवले. हे करताना प्रत्येक माणसाने मरणाचे स्मरण सतत असू द्यावे असे प्रतिपादन राजा दापका ता. मुखेड येथील मठाधिपती ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर यांनी कै. धनाजी खेमाजी पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित प्रवचन करताना मुखेड येथे केले.
यावेळी बोलताना आ.डॉ.तुषार राठोड म्हणाले की पवार काकांना प्रसिद्धीची कधीच हाव नव्हती. कोणतेही काम केले तर ते काम मी केले असे कधी सांगायचे नाहीत. मी ही त्यांचा विद्यार्थी आहे. आपण त्यांच्या नावाने ॲकॅडमी स्थापन केली आहे ही स्तुत्य बाब आहे. पण त्या माध्यमातून विविध सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नगरपरिषदेची अभ्यासिका ही आपण निर्माण केली आहे.त्याचाही फायदा घेता येईल. तूम्ही चांगले काम केल्यास येथील विद्यार्थी यशवंत होऊ शकतात.
वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांचे तसेच उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त भगिनींचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
ॲड. खुशाल पाटील म्हणाले की गुरुजी फार कमी बोलायचे पण महत्त्वाचे बोलायचे.मला आमदार साहेबांबरोबर राहण्याचा त्यांनी घरी बोलावून सल्ला दिला होता.त्यांनी आदर्श पाल्य घडवले.ज्यांनी आपल्या मुखेडला आरोग्य सुविधा देण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे.
अध्यक्षीय समारोप करताना या विभागाचे माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड म्हणाले की अशा चांगल्या माणसांची सर्वांनी आठवण ठेवावी. माणसाने बोलावे तसे वागावे असे असले पाहिजे. धनाजी पवार यांनी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन ही असामान्य काम केले. प्रत्येक काम ते कृतीत आणायचे. कर्तव्याला ही माणसे चुकले नाहीत. आपणही चुकू नये. प्रत्येकाने पेटून उठून कामाला लागले पाहिजे. धनाजी पवार यांची विद्यार्थी घडविण्याचे परंपरा चालू ठेवा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी पवार अकॅडमी फार काम्पेटेटीव एक्झामचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी करून कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. ते म्हणाले कोवीडच्या वातावरणामुळे आम्ही ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेतली. यात १६० मुलांनी नोंदणी केली त्यांचे सहा गट करून स्पर्धा घेतली व त्यांचातून अत्यंत निपक्षपातीपणे स्पर्धक निवडले. तसेच तालुक्यातून उत्कृष्ट कार्य करणार्या एका शिक्षकांचाही सत्कार करण्याचे ठरवून तो आम्ही आज करतो आहोत.या अकॅडमी कडून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आम्ही अनेक उपक्रम राबविणार आहोत.
यावेळी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. ज्यात प्रथम ५०००/ रुपयाचे पारितोषिक मुंबई येथील कु.पवार माधवी हीला प्राप्त झाले. द्वितीय ३०००/रुपयांचे पारितोषिक नांदेड येथील तिडके कृष्णा व्यंकटी यांना तर उत्तेजनार्थ २०००/ हजार रुपयाची तीन पारितोषिके बीड येथिल मुंडे यशकुमार अशोकराव, सातारा येथील कु.तिकुदेव प्रेरणा अरूण,कोल्हापूर येथील कु.पाटील प्रीयदर्शनी जयगोंडा यांना प्राप्त झाली.
तसेच यावेळी तालुक्यातून यावर्षीचा कै. धनाजी पवार आदर्श शिक्षक पुरस्कार सौ.शोभा रामराव नलाबले यांना सहपरिवार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप हे ७७५१/ रुपये,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल,ग्रंथ व पुष्पहार असे होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री भारत जायभाये यांनी केले तर आभार माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांनी मानले.
सकाळी १०.०० वाजता कै. धनाजी पवार यांच्या समाधीचे विधिवत पूजन त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. सतीश पवार व त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या सुकन्या प्राचार्य स्नेहलता चव्हाण व त्यांचे यजमान, कनिष्ठ चिरंजीव डॉ. नितीश पवार व त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. धनाजी पवार,गानकोकिळा लता मंगेशकर, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तदनंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. श्रमिक लोकराज्य अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वक्तृत्व स्पर्धा आयोजक प्रा.बळीराम राठोड,प्रा. डॉ.सखाराम गोरे,प्रा.ज्ञानेश्वर शिंदे यांचा तर परीक्षक म्हणून चंद्रकांत गायकवाड, भारत जायभाये, प्रा.संभाजी डावकरे, शिवराज साधु,प्रा.डॉ. महेंद्र होनवडजकर,अकेडमीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हरिदास राठोड ,सचिव प्रा.डॉ. रामकृष्ण बदने, सहसचिव प्रा.डॉ. महेश पेंटेवार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. कविता लोहाळे,सदस्य रमेश गोकुळे आदींचा सत्कार आ.डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डी.बी. चव्हाण यांचाही सत्कार संपन्न झाला.प्रजावानीचे पत्रकार शिवाजी अण्णा कोनापुरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने व पत्रकार प्रतिनिधी म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मंचावर गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे, पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाटील खैरकर, माजी कृषी संचालक शिवाजी पवार हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमास पवार परिवारा वर प्रेम करणारे अनेक आप्तेष्ट,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.