कंधारचे भूमीपुत्र ओमकार बोधनकर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

कंधार ; महेंद्र बोराळे

कंधार तालुक्याचे भूमीपुत्र ओमकार धोंडोपंत बोधनकर यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,पर्यावरण आदी क्षेत्रांच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेवून गुरुगौरव कमल पुष्प पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थ्याचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उत्कर्ष व राष्ट्र उभारणीत असाधारण योगदान असल्यामुळे लोहा तालुक्यातील जि.प.प्रा.शा. गोळेगाव येथिल शिक्षक ओमकार बोधनकर यांना सौ.शामला दिनकरराव बोराळकर यांच्या वतीने कमलपुष्प जिल्हा शिक्षक पुरस्कार सन २०२० साठी निवड करण्यात आली होती.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी कुसुम सभागृह, आय.टी.एम. परिसर, नांदेड येथे सदरील पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यापुर्वी माई महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठाण नागपूरद्वारे दिला जाणारा राज्यस्तरीय माझी आई पुरस्कार समाजसेविका कै.डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ओमकार बोधनकर यांना नागपूर येथे वितरीत करण्यात आला होता. त्यांना अनेक क्षेञातील मानाचे पुरस्कार आता पर्यत मिळाले असून या पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात रोवला गेला आहे.

ओमकार बोधनकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोह्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, सरपंच केरबाजी केंद्रे, प्रा. रावसाहेब डांगे, केंद्रप्रमुख बी. जी. डफडे, शाळेचे मूख्याध्यापक पी. डी. पोले, साहित्यिक गोविंद बनसोडे, चंद्रकांत मुलुखपाडे, किरण गव्हाणे, संतोष लोंढे, रामभाऊ माने, लुंगारे माऊली कोरडे,गणपती बोथिकर ,दत्ता पुणेबोईनवाड , प्राध्यापक केंद्रे सर , महेंद्र बोराळे आदीनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *